मूळव्याध हा गुदमार्गात होणाऱ्या व्याधींपैकी एक महत्त्वाचा व्याधी आहे. सामान्यत: गुदमार्गात तीन मोठ्या रक्तवाहिन्या असतात. यांना वैद्यकीय भाषेत Hemorrhoidal Veins म्हणतात. या घड्याळ्याच्या काट्यानुसार ३,७ आणि ११ वाजल्याप्रमाणे स्थित असतात. चुकीचा आहार व विहार घेतल्याने या रक्तवाहिन्यांना सूज येऊ लागते व त्या फुगतात. यालाच मुळव्याध असे म्हणतात. थोडक्यात सांगायचं झालं तर रक्तवाहिन्यांना आलेली सूज आणि त्यामुळे तयार होणारा फुगवटा यालाच मूळव्याध अथवा पाइल्स म्हटलं जातं. मूळव्याध झाला आहे की नाही हे अनेकदा रुग्णाला समजण्यास वेळ लागतो. मूळव्याध झाल्याची लक्षणं खालीलप्रमाणे आहेत. ती दिसल्यास तात्काळ उपचार करावा.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लक्षणे –
* शौचाच्या ठिकाणी रक्तस्त्राव होणे
* शौचाला आल्यानंतर आग आणि वेदना होणे
* शौचाच्या ठिकाणी खाज येणे
* शौचाच्या वेळेला मांसत भाग बाहेर येणे

कारणे –
* मलाबष्टंभ अथवा बद्धकोष्ठता (Constipation)
* अती तिखट, अती तेलकट तसंच बाहेरचे पदार्थ जास्त खाणे
* मांसाहार, मद्यसेवन, सिगारेट, तंबाखू सेवन
* सततचे बैठे काम
* अती जागरण
* जेवणाच्या आणि कामाच्या अनियमित वेळा
* कोरडे आणि शिळे अन्न खाणे
* अनुवांशिक

– मुळव्याधीचे प्रकार आणि अवस्था
सामान्यत: ज्याप्रमाणे गुदमार्गाच्या आत रक्तवाहिन्या असतात त्याप्रमाणे गुदमार्गाच्या बाह्यभागी सुद्धा छोट्या रक्तवाहिन्या असतात. बाह्य भागातील रक्तवाहिन्यांनाही सूज येऊ शकते. यामध्ये दोन प्रकार असतात. Internal Haemorrhoids आणि External Haemorrhoids.

तसंच काही वेळा रुग्णांमध्ये फक्त शौचाच्या ठिकाणी रक्तस्त्राव होतो व काही वेळा फक्त वेदना आणि आग असते. या लक्षणांवरुन दोन प्रकार पडतात. Bleeding Haemorrhoids आणि Non Bleeding Haemorrhoids.
मूळव्याध झाल्यानंतर रुग्णामध्ये त्याच्या विविध अवस्था बघायला मिळतात. अवस्थेनुसार त्याचे खालील चार प्रकार पडतात.

– प्रथम अवस्था
ही सुरुवातीची अवस्था असते यामध्ये रक्तवाहिन्यांना थोडी सूज येत. हे लक्षण अनेक रुग्णांना समजून येत नाही.

– द्वितीय अवस्था
यामध्ये सूज वाढत जाते. बऱ्याच वेळा शौचाला गेल्यानंतर कुंथावे लागते. कुंथल्याने शौचास होते किंवा वेदना होतात. बऱ्याचदा गुदमार्गाच्या ठिकाणी खाज येण्यास सुरुवात होते.

– तृतीय अवस्था
वरील दोन्ही लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यास वाढलेला मांसाचा भाग हा शौचाच्या वेळी बाहेर हाताला जाणवू लागतो. रक्तस्त्राव वाढतो अथवा वेदना व आग याचे प्रमाण वाढते. वाढलेला मांसत भाग हा शौचानंतर आपोआप आत जातो अथवा ढकलावा लागतो.

– चतुर्थ अवस्था
यामध्ये वाढलेला संपूर्ण मांसत भाग हा गुदरमार्गाच्या ठिकाणी बाहेर येतो व कष्टाने आतमध्ये ढकलावा लागतो. यामध्ये असह्य वेदना होतात. गुदमार्गाचा भाग पूर्ण बंद झाल्यासारखे वाटू लागते. बसणे आणि उठणे कठीण होऊ लागते.

अनेकदा रुग्ण हा तिसऱ्या किंवा चौथ्या अवस्थेत डॉक्टरांचा शोध घेताना दिसतो. रुग्णाला स्वत: पाहता येऊ न शकणाऱ्या या आजाराविषयी सर्वसामान्य लोकांमध्ये अनेक गैरसमज पसरलेले आहेत. त्यामुळे या आजाराचे योग्य निदान व योग्य उपचार होण्यात अडथळे निर्माण होता.

गैरसमज –
* प्रत्येकाला मूळव्याध असतोच
* हा आजार कधीच बरा होत नाही
* ऑपरेशन नंतर खूप असह्य वेदना व रक्तस्त्राव होतो
* ऑपरेशन नंतर शौचावरील नियंत्रण जाते

आयुर्वैदानुसार योग्य आहार, औषधी चिकित्सा आणि उपचार घेतल्यास मुळव्याध बरा होऊ शकतो.

मूळव्याध व त्यावरील उपचार

आहार – विहार –
आयुर्वैदामध्ये उपचार करताना पथ्य आणि अपथ्य याचा खोलवर विचार केला जातो. त्यामुळे आहाराच उष्णता वाढवणारे सर्व पदार्थ वर्ज्य करणे, बद्धकोष्ठता होणार नाही याची काळजी घेणे यावर प्रामुख्याने लक्ष दिले जाते.
विहारांमध्ये सतत बैठे काम न करणे, रात्री जागरण न करणे, नियमित व वेळेवर आहार घेणे महत्त्वाचे आहे.

औषधी चिकित्सा –
प्रथम व द्वितीय अवस्थेत आयुर्वैदिक औषधांनी उपचार केल्याने चांगला आराम मिळतो.

क्षारसूत्रबंधन –
तृतीय व चतुर्थ अवस्थेत विशिष्ट भुलेखाली क्षारसूत्रबंधन ही पद्धती वापरली जाते. काही वेळा बाह्य भागातील मुळव्याधीसाठी सुद्धा ही चिकित्सा उपयोगी पडते.

क्षारसुत्र चिकित्सेचे फायदे –
– रक्तस्त्राव होत नाही
– कुठलीही कापाकापी नाही
– ऑपरेशननंतर रुग्णालयात राहण्याची गरज नाही
– शौचावरील नियंत्रण जाण्याची शक्यता नाही
– कमी खर्च

डॉ भारत भदाणे (आयुर्वैद तज्ञ)
(शाश्वती ऍनो रेक्टल हॉस्पिटल)
Website: http://shashwatiinpiles.com/about.php

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Symptoms causes and treatments for piles
First published on: 01-04-2019 at 12:04 IST