निरोगी आणि सुदृढ आरोग्य हवं असेल तर आहारामध्ये पौष्टीक आणि सकस पदार्थांचा समावेश आवर्जुन केला पाहिजे. यासाठी पालेभाज्या, कडधान्य, विविध प्रकारच्या डाळींचं सेवन करायला पाहिजे. मात्र अनेक वेळा आपण या पौष्टीक पदार्थांना डावलून फास्टफूडला प्राधान्य देतो. त्यामुळे आपल्या सकस आहार घेता येत नाही. तरीदेखील आपली आई, आजी वेगवेगळ्या शक्कल लढवून पालेभाज्या किंवा कडधान्य आपल्याला खायला घालतात. या पालेभाज्यांमध्ये पालक, मेथी, शेपू या भाज्या पाहिल्या की अनेक जण तोंड फिरवून घेतात. मात्र याच भाज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रथिने, खनिजे, लोह यांचा समावेश असतो. त्यातल्या त्यात मेथी ही एक अशी भाजी आहे जी चवीला कडू असली तरी आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची आहे. मेथीच्या पानांचा उपयोग आहारात भाजी म्हणून, तर बियांचा उपयोग मसाला पदार्थांत होतो. दाण्यासारख्या दिसणाऱ्या या ‘मेथ्यां’मध्ये अतिशय आरोग्यकारी गुणधर्म आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मेथ्या खाण्याची पद्धत
मेथ्यांचे दाणे कधीही कच्चे खाऊ नयेत. हे दाणे कायम भिजवून किंवा भाजून खावेत. मेथ्या या चवीला अत्यंत कडू असून अनेक जण त्या भिजवून त्याचं पाणी पितात. तर काही जण त्याची भाजीही करतात.

फायदे
१. मधुमेह –
मेथीमध्ये भरपूर फायबर आणि ट्रायगोनेलिन नावाचे एक द्रव्य असते. यांचा दुहेरी फायदा होतो. यामुळे शरीरात इन्शुलिनची संवेदनशीलता वाढते शिवाय वजनही कमी होते. म्हणूनच मधुमेहाच्या रुग्णांसाठी नियमित मेथीचे दाणे खाणे उत्तम. ज्यांची रक्तशर्करा जास्त आहे अशांना ती नियंत्रित राहण्यास मेथ्यांचा उपयोग होतो.

२. अॅसिडिटी – ज्या लोकांना अॅसिडिटीचा त्रास आहे, त्यांना शरीरातील आम्लता कमी होण्यासाठी मेथ्यांचा उपयोग होतो.

३. बद्धकोष्ठता – सकाळी रिकाम्या पोटी मेथीचे दाणे खाल्याने पोट साफ राहते.

वाचा : अ‍ॅसिडीटीपासून तुम्हाला सुटका हवी आहे? मग वेलची नक्कीच खा

४. वजन कमी होते- मेथ्या खाल्ल्याने मेटाबॉलिक रेटही वाढतो, चरबी कमी होऊन वजन कमी होण्यास मदत होते.

५. त्वचा- मेथ्यांमुळे त्वचेवर येणारी मुरुमे कमी होऊन त्वचेचा तजेला वाढतो.

६. कोलेस्ट्रॉल – रात्री भिजवलेले मेथ्यांचे दाणे सकाळी खाल्ल्याने, रक्तातील चरबीचे प्रमाण कमी होऊ लागते. मेथ्यामध्ये असलेल्या विशेष अमायनो अॅसिड्समुळे हे साध्य होते. परिणामत: उच्च कोलेस्टेरॉलची पातळी कमी होऊन ती नियंत्रित राहण्यास मदत होते. यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो.

७. रक्तदाब- मेथ्यांमुळे उच्च रक्तदाब असणाऱ्यांना फायदा होतो. रक्तदाबाचे वाढलेले प्रमाण कमी होऊन कालांतराने गोळ्यांचे डोस कमी करता येतात.

८. केस गळणे- मेथ्यांचे दाणे रात्रभर पाण्यात भिजवून, सकाळी ते कुटून, त्याची पेस्ट बनवावी. आंघोळीपूर्वी तासभर ती पेस्ट केसांच्या मुळाशी लावून कोमट पाण्याने आंघोळ करावी आणि भरपूर पाण्याने केस स्वच्छ धुवावेत. यामुळे केस गळण्याचे कमी होते आणि केसातील कोंडा दूर होतो.

 

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The major benefits of eating fenugreek ssj
First published on: 02-12-2019 at 13:02 IST