आहारात टोमॅटो आणि फळांचा विशेषत: सफरचंदाचा समावेश धूम्रपान करणाऱ्यांच्या फुप्फुसांचे नुकसान भरून काढण्यासाठी फायदेशीर असल्याचे एका अभ्यासात आढळून आले आहे. पूर्वी धूम्रपान करणाऱ्यांनी आहारात टोमॅटो आणि फळांचा समावेश अधिक केल्याने त्यांच्यात नैसर्गिकरीत्या फुप्फुसांची कार्यक्षमता ढासळण्याची प्रक्रिया मंदावत असल्याचे अमेरिकेच्या जॉन्स हॉपकिन्स ब्लुमबर्ग स्कूल ऑफ हेल्थ येथील संशोधकांना आढळून आले. जे लोक दिवसाला दोन टोमॅटो किंवा ताज्या फळांचे सेवन करतात त्यांच्या तुलनेने फळांचे कमी सेवन करणाऱ्यांमध्ये फुप्फुसांची कार्यक्षमता मंदावण्याचे प्रमाण जास्त असते. या संशोधनात लोकांच्या इतर आहार सवयींबाबतदेखील विचारणा करण्यात आली होती. या वेळी प्रक्रिया केलेली फळे किंवा भाज्या उदा. टोमॅटो सॉस यांच्या तुलनेत ताज्या भाज्या आणि फळेच फायदेशीर ठरत असल्याचे आढळून आले. त्याचप्रमाणे जे लोक पूर्वी धूम्रपान करीत होते किंवा ज्यांनी कधीही धूम्रपान केले नाही त्यांच्यातदेखील जास्त टोमॅटोच्या सेवनामुळे फुप्फुसांची कार्यक्षमता ढासळण्याचा वेग मंदावत असल्याचे आढळून आले. आहारात फळे आणि भाज्यांचा समावेश केल्याने नैसर्गिकरीत्या फुप्फुसांची कार्यक्षमता कमी होण्याचा वेग मंदावतो, असे जॉन्स हॉपकिन्स येथील सहायक प्राध्यापिका वेनेसा गार्सिया लार्सन यांनी सांगितले. हा अभ्यास श्वसनरोगाचा संभाव्य धोका असणाऱ्यांसाठी योग्य आहार किती महत्त्वाचा आहे याला पाठिंबा देतो. या अभ्यासासाठी संशोधकांनी २००२ मध्ये ६५० लोकांच्या आहार आणि फुप्फुसांच्या कार्यक्षमतेचे मूल्यमापन केले होते. दहा वर्षांनंतर पुन्हा या लोकांवर त्याचप्रकारे मूल्यमापन करण्यात आले. आहारातील पोषक तत्त्वे धूम्रपानामुळे झालेले नुकसान भरून काढण्यास मदत करीत असल्याचे या अभ्यासामुळे समोर आले आहे.