भारतातील सुप्रसिध्द अशा साड्यांपैकी एक म्हणजे माहेश्वरी साडी. या साडीचे उत्पादन मुख्यतः माहेश्वर या मध्य प्रदेशातील शहरात होते. या साडीचा इतिहास १८ व्या शतकापासून सुरू होतो. राणी अहिल्याबाई होळकर यांनी राजेशाही परिवारांना व नातलगांना भेट देण्यासाठी माहेश्वरी साडी खास तयार करवून घेतली होती. मूळ रेशमी धाग्यांनी बनवलेली ही नऊवारी साडी राजपरिवारातील स्त्रिया नेसत. बदलत्या काळानुसार ही साडी सुती त्याचबरोबर सुती आणि रेशमाच्या मिश्रणातून तयार केली जाऊ लागली.
डिझाईन आले कुठून?
माहेश्वरी साडीचे डिझाइन हे माहेश्वर किल्ल्याच्या भिंतींवरून प्रेरित आहे. भिंतींवर कोरलेल्या फूलांच्या, हिऱ्यांच्या आकृत्या, चटईचे डिझाइन आजही माहेश्वरी साडीत दिसून येते. पूर्वीच्या काळात माहेश्वरी साडी ही फक्त गडद रंगांत तयार केली जायची, जसे की लाल, हिरवा, जांभळा, काळा, इ. स्थानिक लोकांमध्ये परिचयाची नावे म्हणजे डाळिंबी, गुलबक्षी, अंगूरी, तपकीरी, आम्रक इ. आजकाल ही साडी हलक्या व फिक्या रंगांतदेखील पाहायला मिळते.
पदरावर पट्टे किंवा चौकोनी डिझाइन असलेली साडी अत्यंत साधी असते. साडीच्या काठावर चटइचे डिझाइन, पानांचे व फूलांचे चित्रण आढळून येते. माहेश्वरी साडीचा पदर विशेष पद्धतीने विणलेला असतो. यावर तीन रंगीत आणि दोन पांढऱ्या रंगाचे पट्टे असतात. पदरांचे विविध प्रकार असलेली ही साडी विविध नावांनी ओळखली जाते.
ही आहे खासियत
‘चंद्रकला’ अत्यंत साधी दिसणारी ही साडी निळ्या, जांभळ्या (बैंगनी) व काळ्या रंगात बनवली जाते. ‘चंद्रतारा’ चंद्र व ताऱ्यांचे डिझाइन असलेल्या या साडीत एकाआड एक पट्टे विणलेले असतात. तिसरा प्रकार ‘बेली’ यामध्ये सहा पट्टे आणि दोन रंग वापरले जातात. शेवटचा प्रकार ‘परखी’ मध्ये पट्ट्यांऐवजी चौकोनी डिझाइन वापरले जाते.
माहेश्वरी साडीची खासियत म्हणजे, विणण्याच्या विशेष पद्धतीमुळे ही साडी दोन्ही बाजूंनी नेसता येते. आकर्षक रंगांत व विविध प्रकारात मिळणारी ही साडी समारंभात नेसण्यासाठी उत्तम आहे. ही साडी अतिशय हलकी असल्याने कोणत्याही ऋतूमध्ये ती नेसता येते. या साडीची किंमत १ हजार ते ५ हजारपर्यंत आहे.
साडी जुनी झाल्यास काय करु शकता?
हल्ली साड्या नेसण्याचे प्रमाण कमी झाले आहे. तसेच तीच ती साडी नेसून महिलांना कंटाळा येतो. अशावेळी जुन्या माहेश्वरी साडीला नवा लूक देऊन त्याचे काहीतरी हटके बनविता येते. या साडीचा एखादा छान कुर्ता किंवा स्कर्टही करता येतो. एखाद्या कॉन्ट्रास्ट किंवा काळ्या रंगाच्या प्लेन टॉप या स्कर्टवर खुलून येतो. यासोबत चांदीचे किंवा अॅंटीक सिल्व्हरचे झुमके घालावेत.
वल्लरी गद्रे, फॅशन डिझायनर
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Traditional maheshwari sari shrawan special desine and speciality
First published on: 26-07-2017 at 10:00 IST