महागड्या केबल आणि DTH कनेक्शनमुळे हैराण झालेल्या ग्राहकांना भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (ट्राय) नववर्षाच्या सुरूवातीला चांगली बातमी दिली आहे. कारण आता तुम्ही 130 रुपयांमध्ये 200 चॅनल पाहू शकणार आहात. नव्या नियमानुसार ब्रॉडकास्टर 15 जानेवारीपर्यंत त्यांच्या चॅनलच्या दरांमध्ये बदल करतील. 30 जानेवारीपर्यंत पुन्हा सर्व चॅनलच्या दरांची यादी जाहीर केली जाईल. त्यानंतर 1 मार्च 2020 पासून नवे दर लागू होतील. एप्रिल 2019  मध्ये ट्रायने डीटीएच आणि केबल टीव्ही ग्राहकांसाठी शुल्काबाबत नवीन नियम लागू केले होते. मात्र, वापरकर्ते या नियमांमुळे काहीसे नाराज झाले होते.  नेटवर्क कॅपेसिटी फी (एनसीएफ) मधील बदल हे दर महाग होण्यामागचे कारण होते.

160 रुपयांत सर्व ‘फ्री टू एअर चॅनल’ :
नव्या नियमामुळे ग्राहकांना दिलासा मिळेल असं ट्रायचं म्हणणं आहे. ट्रायने बुधवारी केबल आणि प्रसारण सेवांसाठी नवी नियमावली जारी केली. याअंतर्गत केबल ग्राहक कमी किंमतीत अधिक चॅनल्स पाहू शकतील. विशेष म्हणजे सर्व ‘फ्री टू एअर’ चॅनलसाठी आकारल्या जाणाऱ्या मासिक दरांची कमाल मर्यादा 160 रुपये ठरवण्यात आली आहे. याशिवाय, ट्रायने एकाच घरात किंवा ऑफिसमध्ये एकाहून अधिक कनेक्शन घेणाऱ्यांना 40 टक्के सवलत देण्याचे म्हटले आहे.

आतापर्यंत 100 फ्री चॅनल्स :
आतापर्यंत टीव्ही ग्राहकांसाठी 130 रुपयांमध्ये केवळ 100 ‘फ्री टू एअर’ चॅनल मिळायचे. करासहीत यासाठी 154 रुपये मोजावे लागत होते. यामध्ये 26 चॅनल केवळ प्रसार भारतीचेच होते. पण, नव्या नियमानुसार ब्रॉडकास्टर 12 रुपयांपेक्षा कमी दराचे चॅनलच पॅकेज ऑफरमध्ये देऊ शकणार आहेत. याशिवाय सूचना आणि प्रसारण मंत्रालयाने अनिवार्य घोषीत केलेले चॅनल्स एनसीएफ चॅनलच्या यादीत मोजता येणार नाहीत असंही ट्रायने स्पष्ट केलं आहे. सध्याच्या 100 वाहिन्यांऐवजी 200 वाहिन्यांसाठी नेटवर्क कॅपॅसिटी शुल्क (एनसीएफ) 130 रुपये आकारण्यात येणार आहे. एनसीएफ शुल्क हे डीटीएच किंवा केबल ऑपरेटरला चॅनेल दाखवण्यासाठी दिले जाते. यात वापरकर्त्यांना वाहिन्यांसाठी दरमहा पैसे द्यावे लागतात.