रोजच्या आमटीत वापरल्या जाणाऱ्या हळदीतील रासायनिक घटक आतडय़ाच्या कर्करोगावर गुणकारी असतात असे आढळून आले आहे. विशेष म्हणजे या नव्या संशोधनात भारतीय वैज्ञानिकाचा समावेश आहे. हळदीत क्युरक्युमिन व सिलीमारिन हे दोन घटक असतात. ते आतडय़ाच्या कर्करोगावर उपयुक्त असतात, असे अमेरिकेतील सेंट लुईस विद्यापीठाच्या संशोधकांनी म्हटले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

क्युरक्युमिन हा हळदीतील एक सक्रिय घटक असून, आमटी व इतर बहुतेक भारतीय पदार्थात हळदीचा वापर केलेला असतो. सिलीमारिन हा दुधातील एक घटक असतो, त्यामुळे यकृत विकारांवर चांगला उपयोग होऊ शकतो. प्रयोगशाळेतील नमुन्यात आतडय़ातील पेशींचा अभ्यास करण्यात आला. क्युरक्युमिनमुळे पेशीवर चांगला परिणाम दिसून येतो. कर्करोगाच्या पेशींशी झुंजण्यात या फायटोकेमिकलचा उपयोग होतो. सेंट लुईस विद्यापीठाचे उदयशंकर इझिकेल यांनी सांगितले की, फायटोकेमिकल आतडय़ाच्या कर्करोगाची वाढ रोखतो व प्रसारही होत नाही. जेव्हा आतडय़ाचा कर्करोग असलेल्या पेशींवर क्युरक्युमिनचा वापर केला जातो तेव्हा त्या मरतात व सिलीमारिनमुळेही तोच परिणाम दिसून येतो. फायटोकेमिकल्स हे कर्करोग उपचारावर आश्वासक आहेत व त्यामुळे केमोथेरपीचे परिणामही टळतात. इझिकेल यांनी सांगितले की, आतडय़ाचा कर्करोग टाळण्यासाठी हळदीतील घटकांचा उपयोग होतो, पण क्युरक्युमिन व सिलीमारिनचे जास्त प्रमाणही घातक असते. त्याबाबत अजून अभ्यास करणे गरजेचे असून जेवण हळदीने युक्त असायला हरकत नाही, कारण त्यातून मिळणारे क्युरक्युमिन हे मर्यादितच असते. जर्नल ऑफ कॅन्सर या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे.

(टीप : आरोग्यवार्तामधील बातम्या या जगभरातील संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर आधारित असतात. त्यामुळे त्यातील मतांशी लोकसत्ताचा संबंध नाही. कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.) 

 

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Turmeric curative on cancer
First published on: 29-07-2016 at 01:36 IST