अमेरिकेने व्हिसा देण्यासंदर्भातील नियम अधिक कठोर केले आहेत. यानुसार जर तुम्ही अमेरिकेला जाण्यासाठी व्हिसाचा अर्ज करण्याचा विचार करत असाल तर आता तुम्हाला तुमचे सोशल मीडियावरील तपशील देणे बंधनकारक असणार आहे. अर्ज करणाऱ्या व्यक्तीला यापुढे त्याचे समाजमाध्यमांतील खात्यावर असलेले नाव व गेल्या पाच वर्षांपासून वापरात असलेले ई-मेल व दूरध्वनी क्रमांक हाही तपशील सादर करावा लागणार आहे. अमेरिकेच्या ‘व्हिसा’साठी अर्ज करताना आता सर्वानाच समाजमाध्यमांच्या वापराची माहिती द्यावी लागेल. अमेरिकेत येणाऱ्या परदेशी नागरिकांची सुरक्षेच्या दृष्टीने खातरजमा करण्याबरोबरच दहशतवादी आणि समाज विघातक व्यक्तींना अमेरिकेत प्रवेश करण्यापासून रोखणे असा उद्देश त्यामागे आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने शनिवारी नवे धोरण जाहीर केले. त्यानुसार जवळजवळ सर्वच परदेशी अर्जदारांना त्यांच्या समाजमाध्यम वापराची माहिती द्यावी लागणार आहे. अमेरिकेला तात्पुरती भेट देणाऱ्यांनाही ही माहिती देणे बंधनकारक आहे. सध्या तरी अर्जदारांना प्रमुख समाजमाध्यमांच्या संकेतस्थळांचा उल्लेख अर्जावर दिसेल, पण नंतर सर्वच समाजमाध्यमांच्या संकेतस्थळांचे पर्याय दिले जातील. व्हिसा अर्जदार समाजमाध्यमांचा वापर करीत नसेल, तर तसा उल्लेख त्याला अर्जावरील पर्यायात करावा लागेल. पण एखाद्याने खोटी माहिती दिली तर त्याचे गंभीर परिणाम त्याला भोगावे लागतील, असे परराष्ट्र खात्याच्या अधिकाऱ्याने सांगितले.

अमेरिकेत येऊ इच्छिणाऱ्या परदेशी नागरिकांची पाश्र्वभूमी कोणत्या स्वरूपाची आहे, याची कसून तपासणी करून संभाव्य दहशतवादी कारवाया आणि समाजविघातक कृत्यांना प्रतिबंध करण्याचा उद्देश या नव्या नियमामागे असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. गेल्या काही वर्षांत जगात समाजमाध्यमांचा वापर वाढला आहे. दहशतवादी कारवायांसाठीही त्यांचा वापर करण्यात येतो. त्यामुळे दहशतवाद्यांना हुडकून काढण्यासाठी समाजमाध्यमांचा उपयोग होऊ शकेल. अशा लोकांना अमेरिकेत पायच ठेवता येणार नाही, अशी व्यवस्था करता येईल, असेही अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. अमेरिकेच्या स्थलांतर धोरणात मार्च २०१७ मध्ये वटहुकमाद्वारे अनेक बदल करण्यात आले आहेत. अमेरिकेत येणाऱ्यांची कसून तपासणी करण्याचा उद्देश त्यामागे आहे. मार्च २०१८ पासून हे धोरण लागू करण्याचे परराष्ट्र मंत्रालयाने सूचित केले होते.

दहशतवाद्यांना हुडकून काढण्यासाठी..

आज सर्वच जण समाजमाध्यमांचा मोठय़ा प्रमाणावर वापर करतात. अगदी दहशतवादी कारवाया आणि समाजविघातक कृत्यांसाठीही या माध्यमांचा वापर करण्यात येतो. त्यामुळे दहशतवाद्यांना हुडकून काढण्यासाठी समाजमाध्यमे उपयुक्त ठरतील, असा अमेरिकेचा कयास आहे.

व्हिसासाठी अर्ज करताना..

  • अर्जदाराला समाजमाध्यमांच्या वापराची माहिती द्यावी लागेल.
  • एखादा समाजमाध्यमांचा वापर करीत नसेल तर तो तसा उल्लेख करू शकतो.
  • माहिती दिल्यानंतर त्याला सरकारच्या निरीक्षण यादीत टाकले जाईल.
  • अर्जदार संशयास्पद आढळल्यास त्याला प्रवेश नाकारला जाईल.
  • खोटी माहिती दिल्यास त्याला गंभीर परिणाम भोगावे लागतील.
  • अर्जदाराला कोणकोणत्या देशांमध्ये प्रवास केला, त्याची माहिती द्यावी लागेल.
मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Us demands social media details from visa applicants
First published on: 03-06-2019 at 10:10 IST