फ्लेम ऑफ द फायर, असे खुद्द इंग्रजांनी ज्याचे आदराने वर्णन केले आहे तो पळस सध्या चोहीकडे मोठय़ा प्रमाणात बहरला आहे. लाल, केशरी आणि क्वचित पांढऱ्या रंगाच्या फुलांनी बहरलेली पळसाची झाडे सध्या सर्वाचे लक्ष वेधून घेत आहेत. विदर्भातील विविध भागातील डोंगर-दऱ्या आणि शेताचे बांध फुलांनी लगडलेल्या पळसाच्या झाडाने शोभून दिसत आहेत.
शिशिराची थंडी ओसरायला लागली, पानगळीने उघडी पडलेली वृक्षराजी नव्या पालवीचे लेणे अंगावर मिरवायला लागली की वसंताची चाहुल लागते. या वसंतात फक्त रंगांची उधळण, रंगोत्सव सुरू होतो निसर्गाचा. शिशिरात बोडक्या झालेल्या शेताला केशरी, लाल रंगात न्हाऊ घालणारा पळस बहरला आहे. वसंताचे स्वागत करण्यासाठी पळस नटलेला चोहीकडे पाहण्यास मिळत आहे. झाडाच्या प्रत्येक फांदीवर लगडलेली फुले विस्तवाच्या गोळ्यांसारखे दिसत आहेत. २०-२५ फूट उंच असणाऱ्या पळसाला संस्कृतमध्ये पलाश म्हणतात. याचा अर्थ फुलांनी डवरलेले झाड असा होतो. पळसाची फुले श्री सरस्वती आणि कालिमाता या दोन्ही देवींच्या पूजेसाठी मुद्दाम भक्तिभावाने वापरले जातात. कुठेही गेले तरी पळसाला पाने तीनच, अशी म्हण प्रचलित आहे. पळसाची पानेही फार उपयोगी आहेत. पूर्वी या पानांपासूनच मोठय़ा पंगतीला जेवण देण्यासाठी द्रोण आणि पत्रावळ्या बनविल्या जात. आता काळ बदलला तरी त्याचे महत्त्व कमी झालेले नाही.
पळस हा डोंगराळ भागात किंवा शेताच्या धुऱ्या-बांधावर दिसणारा वृक्ष. त्याची उंची जास्त नसते आणि तो पानगळी वृक्ष आहे, खोड आणि फांद्या वेडय़ावाकडय़ा असतात; तर साल खडबडीत राखाडी रंगाची असते. पाने आकाराने मोठी असतात म्हणूनच त्याचा द्रोण, पत्रावळी बनविण्यासाठी वापर करतात. सर्व पाने गळून गेल्यानंतर पळसाला फुलांचे घुमारे फुटतात. सध्या पळसाची झाडे लाल, केशरी, भगवा आणि पिवळा अशा रंगांच्या फुलांनी लगडलेली दिसत आहेत. शेतात जाणाऱ्या प्रत्येकाचे लक्ष वेधून घेताना तो दिसत आहे. बहरात आलेला पळस तर अक्षरश: ज्वालेसारखा दिसू लागला आहे, तर काही पळस युद्धात जखमी होऊन रक्तबंबाळ झालेल्या सैनिकासारखे दिसत आहेत.
पूर्वी धुलिवंदनाला एकमेकांच्या अंगावर टाकण्यासाठी उपयोगात येणारा रंग बनविण्यासाठी पळस फुलांचा वापर केला जात असे. तर आयुर्वेदिक औषधी वनस्पती म्हणूनही याचा वापर होत असे. पळसाची फुले पाण्यात टाकून स्नान केले तर त्वचारोग नाहिसा होतो, असेही आयुर्वेदात म्हटले आहे. पळसाच्या बियांचाही औषधीसाठी वापर केला जातो. अशा बहुगुणी आणि त्याच्याकडे लक्ष जाताच पाहणाऱ्याच्या डोळ्यांना भुरळ घालणारा पळस सध्या लाल गडद झाला असून शेतांमध्ये कडक ऊन असतानाही डोळ्यांना थोडा का होत नाही, पण दिलासा देणारा म्हणूनच ओळखला जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Use of multipurpose butea monosperma flowers
First published on: 04-04-2014 at 01:00 IST