Mogara Plant Garden Tips For Flowers: अलीकडे रीलमध्ये व्हायरल होणाऱ्या कविता आणि चारोळ्यांमुळे गुलाबापेक्षाही मोगऱ्याचा भाव वाढला आहे, असं म्हणता येईल. मोगऱ्याचा गजरा ते मोगऱ्याचे अत्तर इतकंच कशाला यंदाच्या लग्नसराईत मोगऱ्याच्या डिझाईनचे ब्लाउज आणि दुपट्टे सुद्धा भारी ट्रेंडमध्ये आले होते. हे सगळं पाहून आपल्या दारात फार काही नाही तर मोगऱ्याचं लहानसं रोप असावं अशी इच्छा होणं स्वाभाविक आहे. अनेकदा लोक ही इच्छा पूर्ण करायला हौसेने मोगऱ्याची रोपं आणतात, कुंडीत लावल्यावर नाही म्हणायला चार कळ्यांना, चार फुलं येतात सुद्धा पण नंतर रोपं नुसती भरभर वाढतच जातात. नक्की हे मोगऱ्याचंच रोप आहे ना असा प्रश्न पडावा इतकी त्याची अवस्था होते. पण आज आपण एक असा सोपा जुगाडू उपाय पाहणार आहोत, ज्यामुळे अगदी लहानश्या कुंडीत सुद्धा तुम्ही मोगऱ्याचं रोप वाढवू शकता आणि फक्त पानं नाही तर कळ्यांनी सुद्धा रोप भरून टाकू शकता. चला तर मग पाहूया..

@Green_Gold_Garden या युट्युब चॅनेलवर मोगऱ्याच्या रोपासाठी २ रुपयाचा खडू कसा वापरावा हे सांगितलंय. खडूमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असते. जे मोगऱ्याच्या कळ्यांसाठी पूरक ठरते. आपल्याला खडू थोडे जाडसर तोडून घ्यायचे आहेत. अगदी बारीक पावडर केली नाही तरी चालेल. मग आपण कुंडीत थेट ही खडूची जाड पावडर टाकायची आहे. पावडर टाकताना फक्त कुंडीत सुकी पानं, तण किंवा अन्य काही काड्या वगैरे नाहीत ना याची खात्री करून घ्या. कुंडीत खडू घालण्याआधी माती भूसभूशीत असावी. खडू टाकल्यावर हाताने माती व आपली पावडर मिसळून घ्या व मग त्यात पाणी घाला ज्यामुळे माती खडूचे सत्व चांगले शोषून घेईल.

मोगऱ्याच्या रोपाला किती पाणी घालावे?

खडूचे खत टाकून झाल्यावर काही दिवसात तुम्हालळा मोगऱ्याला कळ्या आल्याचे दिसून येईल. जेव्हा अशा कळ्या दिसू लागतील तेव्हापासून आपण रोपात पाण्याचे प्रमाण थोडे कमी करू शकता. जेव्हा आपण भरभरून पाणी घालता तेव्हा त्याचा फायदा पानांच्या व फांद्यांच्या वाढीला होतो त्यामुळे रोप कदाचित भरून पानांनी भरून जाईल पण कळ्या अगदी मोजक्या येतील. हे टाळण्यासाठी अगदी जोपर्यंत मातीचा पृष्ठभाग सुकत नाही तोपर्यंत सतत पाणी घालू नये. यामुळे कळ्यांच्या वाढीला मदत होते.