Video Jugaad To Clean Shower: १२ महिने पावसाच्या सरींसारखा आनंद देणारे शॉवर हा हल्ली प्रत्येकच घरामध्ये पाहायला मिळतो. अगदी चाळीपासून बंगल्यापर्यंत शॉवरचे वेगवेगळे फॅन्सी प्रकार असतात. सोशल मीडियावर सुद्धा खास शॉवरचे प्रकार किंवा शॉवर तुमच्या बाथरूमचा लुक कसा ठरवू शकतो अशी माहिती देणारे व्हिडीओ सुद्धा व्हायरल होत असतात. गरम किंवा गार दोन्ही पद्धतीच्या पाण्याचा शॉवर हा दिवसभराचा ताण- थकवा दूर करण्यासाठी खूप मदतीचा ठरू शकतो. पण काही वेळा तुम्हाला त्वचेवर पुरळ उठणे, खाज सुटणे किंवा फोड येणे असे त्रासही शॉवरमुळे होऊ शकतात.
शॉवर व त्वचेचे त्रास यामागचं लॉजिक इतकंच की आपण शॉवर एकदा का फिट केला की तो स्वच्छ करायला अनेकदा विसरतो, डाग पडले तरी त्याला फार फार तर पुसून घेतलं जातं. अशावेळी जेव्हा शॉवरच्या पाईपमध्ये माती किंवा घाण साचत जाते, काही वेळा गंज लागतो आणि तेच पाणी आपण आंघोळीसाठी वापरतो, याचा परिणाम मग त्वचेच्या समस्यांमधून दिसून येतो. हे सर्व टाळण्यासाठी आज आपण अगदी स्वस्त व मस्त असा शॉवर स्वच्छ करण्याचा जुगाड पाहणार आहोत.
शॉवर कसा स्वच्छ करावा? (Tips To Clean Shower)
काही शॉवर्सचे नोजल म्हणजेच पुढील भाग ज्यातून पाण्याचा फवारा येतो तो भाग रबरसारखा लवचिक असतो. अशाप्रकारचे नोजल हे टूथब्रशने घासून स्वच्छ करता येतात.
काही नोजल हे डब्याच्या झाकणाप्रमाणे उघडून वेगळे सुद्धा करता येतात, जर तुमच्या घरच्या शॉवरमध्ये अशी सोय असेल तर तुम्ही पद्धतशीर शॉवर हेड वेगळं काढून घासून स्वच्छ करू शकता.
जर तुम्हाला, शॉवर हेड काढता येणार नसेल तर आपण एका प्लास्टिकच्या पिशवीत पाणी व व्हिनेगर किंवा लिंबाचा रस मिसळून शॉवरला बांधून ठेवू शकता, रबर बँड किंवा चिकटपट्टीने शॉवर हेडच्या वरील बाजूला ही पिशवी लावून ठेवू शकता पण शॉवर पूर्णपणे व्हिनेगरच्या पाण्यात भिजलेला असेल याची खात्री करा. जेव्हा तुम्ही ही पिशवी काढाल तेव्हा काही सेकंद तरी पाणी असेच वाहू द्या जेणेकरून व्हिनेगर पूर्णपणे निघून जाईल. आपण एका स्प्रे बॉटलमध्ये ५०- ५० टक्के अशा प्रमाणात पाणी व व्हिनेगर मिसळून भरूनच ठेवावे जेणेकरून दर आठवड्याला तुम्ही हे पाणी स्प्रे करून शॉवर स्वच्छ करू शकता. हाच जुगाड आपण जेट स्प्रेच्या स्वच्छतेसाठी सुद्धा वापरू शकता.
हे ही वाचा<<२ बटाटे, १ वाटी तांदळाचे पीठ अन् झटपट बनतील कुरकुरीत डोसे; चवीसाठी फक्त मिसळा ‘हा’ ट्विस्ट, पाहा Video
शॉवर हेड हे सतत पाण्याच्या संपर्कात येत असल्याने त्यावर पांढरे डाग पडण्याची चिंता असते ज्यामुळे हळूहळू तुमच्या फॅन्सी बाथरूमचा लुक खराब होऊ शकतो. हे टाळण्यासाठी २ रुपयांची मेणबत्ती शॉवर हेडवर रगडून स्वच्छ करू शकता.