Chana Dal Quick Papad Marathi Recipe Video: नको बाई तो उन्हाळा, किती उकडतंय.. असं दिवसातून चार वेळा तुम्हीही कदाचित म्हणत असाल,आणि खरोखरच यंदा उकाडा प्रचंड वाढलाय. पण असं असलं तरी ज्यांना वाळवणाचे, साठवणाचे पदार्थ करायची आवड आहे, त्यांच्यासाठी हे ऊन म्हणजे वेगवेगळ्या रेसिपी करून पाहण्याची आयती संधी आहे. मे महिन्यापर्यंत साधारण उडदाच्या डाळीचे, तांदळाचे, पोह्याचे पापड, लोणची, मसाले करून झालेले असतात. पण आता अजून मे चा अक्खा महिना शिल्लक आहे. उन्हाळ्याच्या या उरलेल्या दिवसांमध्ये अजून एखादी पापडाची व्हरायटी करून पाहायची तुमची इच्छा होत असेल तर आज आम्ही आपल्यासाठी खास चणाडाळीचे पापड कसे बनवायचे याचा व्हिडीओ शोधून आणला आहे. फक्त एक वाटी चणाडाळीत आणि मोजून तासाभरात आपण हे पापड तयार करू शकता. चला तर साहित्य, कृती बघूया..

चणाडाळीचे पापड साहित्य

  • १ वाटी चणाडाळ
  • १ चमचा आरारूट/ कॉर्न फ्लोअर
  • पाणी
  • चिली फ्लेक्स
  • कोथिंबीर
  • जिरे
  • मीठ

चणाडाळीचे पापड रेसिपी

१ वाटी चणाडाळ भिजवून मग मिक्सरला बारीक वाटून घ्या. वाटताना दोन लहान पळ्या पाणी घाला. गाळणीने हे वाटण गाळून घ्या. मिक्सरच्या भांड्याला लागलेलं वाटण काढण्यासाठी वापरणाऱ्या पाण्याशिवाय एक मोठी वाटी पाणी घालून घ्या.

डाळीचा जाडसर दळ गाळणीने बाजूला काढून घ्या, नंतर तुम्ही हाच दळ स्क्रब म्हणून वापरू शकता.

पापडासाठी आता आपल्याला एका भांड्यात गाळून घेतलेलं वाटण घालून उकळायचं आहे. उकळताना यामध्ये १ चमचा आरारूट किंवा कॉर्न फ्लोअर घालून पाण्यात मिसळून पेस्ट बनवून घाला. यामुळे पीठाला थोडा घट्टसरपणा येईल.

हळूहळू घट्ट होणाऱ्या वाटणात बारीक चिरलेली कोथिंबीर, जिरं आणि चिली फ्लेक्स घाला. यात चवीनुसार मीठ घाला.

नंतर एका प्लॅस्टिकच्या मोठ्या पिशवीवर तेलाचा हात लावून मग पळीने हे पापड पसरवून घ्या

दोन दिवस कडक उन्हात सुकवल्यावर या पापडांचा रंग चॉकलेटी दिसू लागेल. मग हवे तेव्हा तळून तुम्हीही पापडांचा आस्वाद घेऊ शकता.

हे ही वाचा<< झोपेतून उठताच रिकाम्या पोटी ओव्याचा चहा घेण्याचे फायदे डॉक्टरांनीच सांगितले; फक्त प्रमाण ‘इतकं’ हवं

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

@ammakithali या अकाउंटवर शेअर करण्यात आलेली ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा. तुम्ही सुद्धा या मे महिन्याच्या कडक उन्हाचा फायदा घेऊन ही रेसिपी नक्की ट्राय करून पाहू शकता.