व्होडाफोन आयडिया लिमिटेड या भारतातील आघाडीच्या मोबाईल कंपनीच्या पोस्टपेड कनेक्शन्स व इतर सेवा या ‘व्होडाफोन रेड’ या प्रीमियम ब्रँडच्या नावाखाली ग्राहकांना उपलब्ध केल्या जातील अशी घोषणा कंपनीकडून करण्यात आली आहे. या योजनेची सुरुवात मुंबईपासून होईल आणि येत्या काही महिन्यांत देशातील इतर सर्व परिमंडळांमध्ये ती टप्प्याटप्प्याने लागू करण्यात येईल.

व्होडाफोन व आयडियाच्या सर्व दुकानांमध्ये आणि डिजिटल माध्यमातून ग्राहकांना ‘व्होडाफोन रेड’ पोस्टपेड प्लॅन्स सर्व परिमंडळांमध्ये मिळू शकतील. सर्व नवीन पोस्टपेड कनेक्शन्स ‘व्होडाफोन रेड’च्या नावानेच यापुढे मिळतील, त्याचबरोबर ‘आयडिया निर्वाणा’ या प्लॅनमधील सध्याच्या पोस्टपेड ग्राहकांनाही ‘व्होडाफोन रेड’ या ब्रॅंडमध्ये सामावून घेतले जाईल. ‘एंटरप्राइज आयडिया’ पोस्टपेड ग्राहकांनाही हा बदल लागू असेल. व्होडाफोन आणि आयडिया या दोन्ही ब्रँडची प्रीपेड कनेक्शन्स मात्र त्या-त्या ब्रँडच्या नावानेच सध्यातरी मिळणार आहेत. या प्रीपेड ग्राहकांना त्यांच्या कंपन्यांच्या विविध सेवा या कंपन्यांमार्फतच स्वतंत्रपणे देण्यात येतील.

पाहा फोटो : (पैसा वसूल ठरणारे आठ ‘बेस्ट’ स्मार्टफोन, किंमत १५ हजारांहून कमी)

“व्होडाफोन रेड या योजनेमध्ये सर्व पोस्टपेड ग्राहकांना सामावून घेत एक कंपनी एक नेटवर्क ही संकल्पना आम्ही पुढे नेत आहोत. परवडणाऱ्या दरांमध्ये विविध व्यापक स्वरूपाचे प्लॅन्स ‘व्होडाफोन रेड’मध्ये ग्राहकांना उपलब्ध आहेत. यात अमर्यादित स्थानिक व एसटीडी कॉल्स, भरपूर डेटा, मोफत आंतरराष्ट्रीय कॉल्स, मोफत व्होडाफोन प्ले, ॲमेझॉन प्राईम, नेटफ्लिक्स आणि इतर सेवा यांचा समावेश आहे”, असे कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक अवनीश खोसला म्हणाले.

दरम्यान, डायनॅमिक स्पेक्ट्रम रि-फार्मिंग, (डीएसआर), एम-मिमो, टीडीडी आणि स्मॉल सेल या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने व्होडाफोन व आयडिया या दोन्ही कंपन्यांची मजबूत नेटवर्क एकत्रित आणल्याने, दोन्ही ब्रँडच्या ग्राहकांना उच्चशक्तिशाली अशा ‘टर्बोनेट फोर-जी’ नेटवर्कचा लाभ मिळू लागला आहे. सर्व ग्राहकांना विस्तारित फोर-जी कव्हरेज, अधिक क्षमता, टर्बो स्पीड आणि कमी लॅटेन्सी यांचा समृद्ध असा अनुभव येत आहे. टर्बोनेट फोर-जी हे सध्या चौदा शहरांमध्ये आणि देशातील एकंदरीत  78 टक्के जिल्ह्यांमध्ये (30 सप्टेंबरच्या आकडेवारीनुसार) उपलब्ध झाले असून मार्च 2020 पर्यंत संपूर्ण देशात ते सर्वांना उपलब्ध असेल.