थंडी हा ऋतू तब्येतीसाठी चांगला मानला जातो. भरपूर खाणं, भरपूर व्यायाम यामुळे या ऋतूत फिटनेस उत्तम ठेवता येतो. पर्यायाने मूडही छान राहतो. या मूडला आणखी छान करण्याचं काम तुमचे स्टायलिश पण उबदार कपडे करतात.
पुण्यात आता गुलाबी थंडीही पडू लागली आहे. त्यामुळे स्वेटर्स, स्वेटशर्ट्स, जॅकेट्स कपाटांतून बाहेर येऊ लागले असतील. छान फिटनेसबरोबरच थंडी हा ऋतूही फॅशनसाठी पोषकच असतो. सध्या डोक्यापासून पायापर्यंत उबदार कपडय़ांचं वैविध्य जाणवतं.
पुरुषांसाठी स्वेटर्स, जॅकेट्स, स्वेटशर्ट्र्स, पुलओव्हर्स, कार्डिगन्स, स्कार्फ, मफलर, हातमोजे असे उबदार कपडे आहेत. स्वेटर्समध्ये काळा, राखाडी, तपकिरी अशा टिपिकल मेन्स कलर्सबरोबरच तुम्ही पिस्ता, लाल, पांढरा, निळा अशा वॉर्म कलर्सचेही स्वेटर्स घालू शकता. गोल गळा, बंद गळा, पोलो गळा, व्ही गळय़ाचे हे स्वेटर्स चेक्स, लायनिंग किंवा प्लेन रंगात मिळू शकतात. याशिवाय जॅकेट्स व टोपी असलेले स्वेटशर्ट्स हा अनेकांसाठी उत्तम पर्याय ठरतो. कार्डिगन्सही घालता येऊ शकतात. स्त्रियांसाठी स्वेटर्स किंवा स्वेटशर्ट्सबरोबरच कार्डिगन्स हे सध्या अनेकांच्या पसंतीला उतरत आहेत. हे लोकरीचे नसल्याने कमी थंडीतही घालता येऊ शकतात. तसेच पार्टी, कार्यक्रम या वेळी वरून नुसते अडकवता येतात. यात पुष्कळ रंग उपलब्ध असून डिझाइन्सही अनेक आहेत. रोज वापरायला स्वेटशर्ट्स, पुलओव्हर्स व स्वेटर्सही आता अनेक प्रकारांत मिळतात. फरची टोपी असलेली किंवा नेकलाइनला फर असलेली जॅकेट्स व ओव्हरकोट्स हे कॉर्पोरेट्ससाठी उत्तम ठरू शकतात. सध्या लोकरीने विणलेले किंवा बिनलोकरीचे पोंचो तरुरुणींना भुरळ घालत आहेत. केवळ उबदार कपडेच नाही, तर टॉप्स किंवा टी-शर्ट्समध्येही बंद गळय़ाचे, टर्टल नेकचे, कॉऊल नेकचे असे स्टायलिश कपडे मिळतात. ते थंडीत नक्कीच घालता येऊ शकतात. या सगळय़ासोबतच आता थर्मल वेअर वापरण्याबाबत अनेकांना जाणीव होऊ लागली आहे. त्यामुळे थर्मल कपडय़ांनाही चांगली मागणी सध्या बाजारात आहे.
थंडीतील पोषाखातील दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजे डोके, कान झाकण्यासाठी टोप्या किंवा स्कार्फस. यामध्ये सध्या पश्मिना स्कार्फ्स आणि स्टोल्स, लोकरीच्या विणलेल्या विंटर कॅप्स यांचा ट्रेंड आहे. थंडीची मजा ती अनुभवण्यातच आहे, असं म्हणतात. मग त्यासाठी बाहेर पडायला हवं. त्याचकरिता हे उबदार कपडे थंडीचा स्टायलिश अनुभव तुम्हाला देतील.