Rajasic Tamasic and Sattvic Diet: आपण जे खातो, त्यावरूनच आपले विचार, स्वभाव व आचरण दिसून येते. हल्ली सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या अनेक व्हिडीओंमधून आपल्या दैनंदिन आहाराचे वर्णन केले जाते. निरोगी आणि दीर्घायुष्यासाठी कशा प्रकारचे अन्न खाणे सर्वश्रेष्ठ आहे याबाबतही अनेक जण आपलं मत व्यक्त करतात. त्यामध्ये बऱ्याचदा तुम्ही राजसिक, तामसिक व सात्त्विक यापैकी कोणत्या प्रकारचे अन्न खाता आणि अशा अन्नाचा तुमच्या शरीर आणि मनावर कसा प्रभाव पडतो हे सांगितले जाते. खरे तर, या तीन प्रकारच्या आहारांचे वर्णन आपल्या पौराणिक ग्रंथ आणि आयुर्वेदात केलेले आहे.
तीन प्रकारचे अन्न
आयुर्वेद आणि योगशास्त्रात प्रामुख्याने तीन प्रकारच्या अन्नाचे वर्णन केले आहे. त्यात पहिले राजसिक, दुसरे तामसिक व तिसरे सात्त्विक अन्न आहे.
राजसिक अन्न
पूर्वी राजसिक पदार्थांचे सेवन राजघराण्यांमध्ये केले जायचे. अशा प्रकारच्या अन्नात जास्त मसाल्याचे पदार्थ, मिठाई, चटपटीत पदार्थ, तळलेले पदार्थ अशा प्रकारच्या अनेक पदार्थांचे सेवन केले जायचे. अशा पदार्थांच्या सेवनाने व्यक्तीच्या विचारांना उत्तेजित करते आणि व्यक्तीला ऊर्जा देते.
तामसिक अन्न
तामसिक अन्नामध्ये कांदा, लसूण, मांसाहार, दारू, जास्त शिजवलेले मसाल्याचे पदार्थ अशा अनेक पदार्थांचा समावेश असतो. या आहाराच्या सेवनाने व्यक्तीचे शरीर आणि मन आळशी होते.
सात्त्विक अन्न
सात्त्विक अन्नाला सर्वश्रेष्ठ आणि आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानले जाते. या प्रकारच्या अन्नात कांदा, लसूण, जास्त मसाल्यांचा वापर केला जात नाही. या आहारात जास्तीत जास्त उकडलेल्या भाज्यांचे सेवन केले जाते. पूर्वी ऋषी-मुनी, साधू-संत अशा प्रकारच्या अन्नाचे सेवन करायचे. या अन्नाच्या सेवनाने डोके आणि मन शांत राहते. दैनंदिन पूजा-पाठ करण्यासाठी हा आहार सर्वोत्तम मानला जातो.