What Is Sugar, What Happens When We Quit Eating Sugar: “साखर म्हणजे पांढरं विष”, “जगायचं असेल तर साखर सोडच”, तुम्हीही ही वाक्य खूप वेळा ऐकली असतील ना? जगाने साखरेला आपल्या आयुष्यातील व्हिलनची भूमिका देऊनच टाकली आहे. खरं सांगायचं तर, साखरेचे सेवन व रोग यांच्यातील दुवा वेगवेगळ्या अभ्यासांमधून आजपर्यंत समोर आला आहे. या सगळ्या अभ्यासांमध्ये कमी अधिक प्रमाणात साखरेचे नकारात्मक प्रभाव अधोरेखित केलेले आहेत. अलीकडेच झालेल्या एका संशोधनात हृदयरोग, लठ्ठपणा, टाइप 2 मधुमेह, दात किडणे अगदी कर्करोगापर्यंत अनेक आजारांमध्ये फ्रूक्टोजच्या रूपातील साखरेचे सेवन कसे योगदान देऊ शकते हे सांगण्यात आले आहे. आज आपण याच अभ्यासातील काही महत्त्वाचे तपशील पाहणार आहोत. साखर म्हणजे नेमकं काय? साखरेचा आरोग्यावर कसा प्रभाव होतो आणि साखर खाल्ली नाही तर आपण सुदृढ राहू शकतो असा निष्कर्ष काढावा का? अशा विविधांगी प्रश्नांची सोपी सरळ उत्तरे पाहूया..

साखर म्हणजे काय?

Conversation वृत्तसंस्थेच्या हवाल्याने इंडियन एक्सस्प्रेसने दिलेल्या लेखात साखरेविषयी माहिती दिली आहे, मुळात, साखर हा फळे, भाजीपाला, वनस्पती आणि सस्तन प्राण्यांच्या दुधात आढळणारा नैसर्गिकरित्या गोड-चविष्ट रेणूंचा एक गट आहे. नैसर्गिक स्त्रोतांमधून प्रक्रिया करून साखर काढली जाते. साखरेचे विविध प्रकार आहेत. जसे की.

१) आपण नियमित आयुष्यात सुक्रोज (साखर) वापरतो ज्यामध्ये गोड चवीचे ‘ग्लुकोज आणि फ्रुकटोज’ हे रेणू असतात. याचे प्रमाण साधारण १: १ च्या सरासरी मध्ये असून रासायनिकदृष्ट्या जेव्हा हे रेणू एकत्र आणले जातात तेव्हा साखर तयार होते, अनेक प्रक्रिया केलेल्या पदार्थांमध्ये सुद्धा हे सुक्रोज वापरले जाते.

२) प्रक्रिया केलेल्या पदार्थांमध्ये वापरला जाणारा दुसरा घटक म्हणजे उच्च फ्रुकटोज असणारे कॉर्न सिरप, हे सुद्धा ग्लुकोज आणि फ्रुकटोजचे मिश्रण असते. पण यात साधारणपणे ४५% ग्लुकोज आणि ५५% फ्रुकटोज असे मिश्रण असते.

३) सुक्रोज आणि उच्च फ्रुकटोज असलेल्या कॉर्न सिरप हे प्रक्रिया केलेल्या पदार्थांमध्ये अधिक केंद्रित असतात. केवळ गोड चवीसाठी नव्हे तर रंग, पोत सुधारणे, आंबवण्यासाठी मदत करणे, पदार्थ खराब होऊ नये यासाठी सुद्धा या दोन्ही अतिरिक्त साखरेच्या प्रकारांचा फायदा होऊ शकते. याउलट फळे आणि भाज्यांमध्ये या स्वीटनर्सचे प्रमाण मर्यादित असते. तुम्हाला माहित आहे का? कोका-कोलाची ३०० मिली बाटली किंवा २४० मिली उसाच्या रसात सुमारे ३० ग्रॅम साखर असते

४) आपण खात असलेल्या पदार्थांमध्ये इतरही नैसर्गिक शर्करा आढळतात. दुधात असणारी साखर ही मुख्यतः ग्लुकोज आणि गॅलेक्टोज या रेणूंच्या १:१ च्या सरासरी प्रमाणात असते. हे प्रमाण सस्तन प्राण्यांच्या दुधात आढळते. बाळाला पोषण देण्यासाठी नैसर्गिकरित्या शरीरातूनच याचे उत्पादन होते. हेच प्रमाण चीज आणि आइस्क्रीम सारख्या इतर दुग्धजन्य पदार्थांमध्ये सुद्धा आढळते.

५) तसेच, मधमाश्यांद्वारे बनवलेले मध हे प्रामुख्याने ग्लुकोज आणि फ्रुकटोज मोनोसॅकराइड्सचे काही माल्टोज, सुक्रोज आणि इतर कार्बोहायड्रेट्सचे मिश्रण असते.

तुमचं शरीर साखरेचा वापर कसा करतं?

लक्षात घ्या, नैसर्गिकरित्या तयार होणारी शर्करा वनस्पती, मधमाश्या किंवा सस्तन प्राणी त्यांच्या गरजेनुसार तयार करतात. मानवी शरीराला सुद्धा प्रत्येक पेशीसाठी, विशेषत: मेंदूच्या पेशींसाठी इंधन म्हणून ग्लुकोजची आवश्यकता असते. पण आपले शरीर ज्या पद्धतीने फ्रुकटोज वापरते ती पद्धत वेगळी असू शकते. म्हणजे, काही वेळा ते ग्लुकोजमध्ये बदलले जाऊ शकते, इंधन म्हणून वापरले जाऊ शकते किंवा काही वेळा त्यातून फॅट्स निर्माण होतात, ज्याला ट्रायग्लिसराइड्स म्हणतात. आपल्या आहारातुन शरीरात जास्त प्रमाणात फ्रुकटोज जमा झाल्यास मात्र रक्तातील ट्रायग्लिसराइड्स, यकृतातील चरबी, रक्तातील ग्लुकोज, बॉडी मास इंडेक्स आणि इन्सुलिन प्रतिरोधकता वाढते, जे पुढे चयापचय बिघडवण्यासाठी, टाइप 2 मधुमेह आणि नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हरचा धोका वाढवण्यासाठी कारणीभूत ठरते.

जर आपण साखर खाणे सोडले तर काय होईल?

एका अभ्यासात संशोधकांनी, ८ ते १८ वयोगटातील ४० पेक्षा जास्त मुलांनी १० दिवस साखर आणि फ्रुकटोज खाणे बंद केल्यावर नेमके काय घडले याचे तपशीलवार वर्णन केले आहे. यात सहभागींनी ब्रेड, हॉटडॉग किंवा स्नॅक्स खाणे थांबवले नाही. त्यांनी फ्रुकटोज खाणे बंद केले. या गटामध्ये खालील गोष्टी कमी झाल्याचे अभ्यासकांना आढळून आले.

  • नव्याने तयार केलेले ट्रायग्लिसराइड्स (किंवा चरबी)
  • उपाशी पोटी असलेली रक्तातील ग्लुकोजची पातळी
  • रक्तदाब
  • यकृतासह अवयवांवर साठवलेली चरबी
  • इन्सुलिन संवेदनशीलता
  • बॉडी मास इंडेक्स.

जागतिक आरोग्य संघटनेने प्रौढ आणि मुलांसाठी दररोज कितीप्रमाणात साखरेचे सेवन करावे हे सुद्धा सुचवले आहे. त्यानुसार ५८ ग्रॅम किंवा १४ चमचे, किंवा उष्मांकाच्या ५ ते १० टक्क्यांच्या दरम्यान साखरेचे सेवन करता येऊ शकते. आपल्या आरोग्य स्थितीनुसार हे प्रमाण कमी जास्त होऊ शकते.

प्रमाणात साखर खाण्यासाठी काय उपाययोजना कराव्यात?

राविक दिवसात तुम्ही जे खाता त्याचे नियोजन करायला हवे, तुम्ही काय खाता? तुम्ही कधी खाता? आणि किती खाता? याचा मागोवा ठेवा. दुसरे म्हणजे, तुम्ही खात असलेल्या ताज्या भाज्या आणि संपूर्ण फळांचे प्रमाण वाढवून प्रक्रिया केलेल्या पदार्थांचे सेवन कमी करायला हवे.

हे ही वाचा<<बर्ड फ्लूचा धोका वाढला! चिकन खाण्याआधी ‘ही’ काळजी घ्याच; डॉक्टरांनी सांगितली आजाराची लक्षणे व उपचार

महत्त्वाचं म्हणजे , एक साध्य करण्यायोग्य ध्येय सेट करा ज्यामध्ये तुम्ही बदलू शकता अशा एका गोष्टीचा तपशील द्या: 1) तुम्ही खात असलेली संपूर्ण फळे किंवा भाज्या वाढवा किंवा 2) तुम्ही दररोज खात असलेल्या साखरेचे प्रमाण कमी करा.

आपण काय करतोय त्याचा परिणाम काय याची पूर्ण जाणीव असल्यास निर्णय घेणं अधिक सोपं होऊ शकतं.