Right Time to Add Salt in Food: आपल्या स्वयंपाकघरात मीठ ही सर्वांत साधी; पण अत्यंत प्रभावशाली गोष्ट आहे. जेवणात मीठ योग्य प्रमाणात असेल, तर तेच पदार्थाला जीव देतं, चवीत उठाव आणतं आणि साधं जेवणदेखील खास बनवतं. पण, हे फक्त किती मीठ वापरायचं यावर अवलंबून नसतं, ते कधी टाकायचं हे तेवढंच महत्त्वाचं असतं. कारण- प्रत्येक अन्नपदार्थ मीठ वेगळ्या पद्धतीनं शोषून घेतो आणि त्यामुळे मोठा फरक पडतो. चला पाहू या, कोणत्या पदार्थात मीठ कधी टाकल्याने मिळते परिपूर्ण चव आणि सुवास.

मांस आणि कोंबडीसाठी

मांस किंवा कोंबडी शिजवताना मीठ टाकण्याची योग्य वेळ म्हणजे शिजवण्यापूर्वी, जेव्हा ते कच्चं असतं. मांस शिजवण्यापूर्वीच मीठ लावल्यानं ते मांसाच्या आतपर्यंत जातं, रसाला बाहेर काढतं आणि नंतर शिजताना पुन्हा शोषलं जातं. त्यामुळे मांस अधिक रसरशीत आणि चवदार बनतं. उशिरा मीठ टाकल्यास ते फक्त वरवरच राहतं आणि आतली चव फिकी पडते. कोंबडी किंवा मटणासाठी हलकं मिठाचं द्रावण वापरल्यास मऊपणा वाढतो.

सूप आणि रस्स्यासाठी

सूप किंवा रस्सा बनवताना मीठ टाकण्याचं स्वातंत्र्य थोडं जास्त असतं. कारण- पाण्यात मीठ पटकन विरघळतं आणि प्रत्येक घटकाच्या चवीला खुलवतं. सुरुवातीला थोडं मीठ घातल्यास भाज्या आणि मसाले आपला नैसर्गिक स्वाद सोडतात. मात्र, शेवटी पुन्हा थोडं मीठ टाकून चव तपासणं आवश्यक आहे. असं केल्यानं चव अधिक समतोल राहते आणि अति खारटपणा येत नाही. लक्षात ठेवा, जर तुम्ही तयार स्टॉक, सॉस किंवा सोया सॉस वापरत असाल, तर त्यात आधीच मीठ असतं.

भात आणि पास्तासाठी

भात किंवा पास्ता शिजविताना पाण्यात मीठ आधीच घालणं अत्यावश्यक आहे. कारण- एकदा शिजल्यावर भात किंवा पास्ता आतून मीठ शोषलं जात नाही. म्हणूनच शिजविण्याआधीच पाणी थोडं समुद्रासारखं खारट लागलं पाहिजे म्हणजे नंतर अतिरिक्त मिठाची गरजच पडत नाही.

डाळी आणि कडधान्यांसाठी

हरभरा, चवळी, राजमा यांसारखी कडधान्यं शिजविण्यापूर्वी थोडं मीठ लावून पाण्यात भिजवल्यास ते लवकर मऊ होतात आणि शिजल्यानंतर चव अधिक खुलते. पण, ते शिजवताना पाण्यात मीठ घातल्यास ते कठीण राहतं आणि वेळ जास्त लागतो. त्यामुळे भिजवताना किंवा पूर्ण शिजल्यावरच मीठ टाकणं सर्वोत्तम.

भाज्या किंवा स्टर-फ्रायसाठी

भाज्या परतताना अनेक जण सुरुवातीलाच मीठ घालतात; पण ती मोठी चूक आहे. लवकर मीठ टाकल्यास भाज्या पाणी सोडतात आणि भाजीची चव आणि कुरकुरीतपणा हरवतो. शेवटी किंवा गॅस बंद करण्याच्या आधी मीठ टाकल्यास भाज्या ताज्या, सोनेरी आणि कुरकुरीत राहतात.

मीठ हा फक्त चव वाढवणारा घटक नाही. तो पदार्थाचा रसदारपणा, पोत व संतुलन ठरवतं. प्रत्येक खाद्यपदार्थाची रचना वेगळी असल्यानं मीठ टाकण्याची योग्य वेळही वेगळी असते. म्हणून पुढच्या वेळी जेवण बनवताना, मीठ केवळ प्रमाणानुसारच नाही, तर वेळेवर घालणं लक्षात ठेवा. योग्य क्षणी टाकलेलं मीठ तुमचं रोजचं जेवणही चविष्ट बनवू शकतं.

(सूचना : हा लेख केवळ सामान्य माहितीपुरता आहे. कोणताही सल्ला घेण्यासाठी तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)