शिशिर आणि हेमंत ऋतूत शरीरातील अग्नी प्रदीप्त असल्यामुळे खूप पथ्ये नसतात. या ऋतूत काय खावे याचे काही साधे निकष सांगता येतील. जे खाऊ ते ‘बृहण’ करणारे, म्हणजेच पोषण करणारे हवे. या ऋतूत होणाऱ्या विकारांना दूर ठेवणारे, नैसर्गिकरीत्या सहज मिळणारे व शरीरात उष्णता निर्माण करणारे पदार्थ हिवाळ्यात जरूर खावेत. अशा पदार्थाची काही उदाहरणे देत आहोत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गाजर :

गाजर हे चांगले पोषण करणारे, उष्ण व मधुर रसात्मक आहे. त्यात ‘अ’ जीवनसत्त्वही उत्तम प्रमाणात आहे. त्यामुळे हिवाळ्यात गाजर कोशिंबिरीच्या स्वरूपात किंवा तसेच कच्चे खाता येईल, गाजराचा घरी रस काढून घेता येईल, गाजराचा हलवा हा तर अनेकांच्या आवडीचाच पदार्थ असतो. हिवाळ्यात मूळव्याधीची प्रवृत्ती वाढते. त्याला प्रतिबंध करण्यासाठी गाजर आहारात असलेले चांगले. गाजरात तंतुमय पदार्थ भरपूर असतात. गाजर अग्निदीपन करणारे म्हणजेच भूक वाढवणारे असून ते पोटात तयार होणारी आम्लताही कमी करते. ज्या लहान मुलांचे वजन कमी आहे त्यांना गाजर दुधाबरोबर शिजवून केलेला हलवा जरूर द्यावा, त्याने वजन वाढायला मदत होते.

बार्ली / जव :

बार्ली वा जवाला ‘धान्यराज’ किंवा संस्कृतमध्ये ‘यव’ असेही संबोधले जाते. उत्तर भारतात थंडी खूप असते आणि तिथे हे धान्यही पुष्कळ प्रमाणात खातात. पण आपल्याकडे ते फारसे खाल्ले जात नाही. फार तर ‘बार्ली वॉटर’ किंवा ‘पफ बार्ली’ आपल्याला माहिती असते. जव हे बलकारी, गुरू व मधुर रसात्मक आहे. थंडीत ज्यांना सारखा सर्दी-खोकला होतो, नाक वाहते अशांना आजारांना प्रतिबंध करण्यासाठी आहारात जवाचा समावेश करता येईल. थंडीत शरीर व स्नायू आखडण्याचा त्रासही अनेकांना होतो. त्यावरही जव आहारात असण्याचा प्रतिबंधक म्हणून उपयोग होतो. जवात ‘ब’ जीवनसत्त्व व आवश्यक अमिनो आम्ले भरपूर असून ते पौष्टिक आहे.

बोरे :

हिवाळ्यात बोरे मुबलक मिळतात. बोरे गुणांनी स्निग्ध, बृहण करणारी, पचायला जड (गुरू) व मधुर आहेत. हिवाळ्यात अनेकांना आव पडण्याचा किंवा आमांशाचा त्रास होतो. तो टाळण्यासाठीही बोरे चांगली. बोरे अग्निदीपन करणारी असून ती पित्त व कफ कमी करणारी व सारकदेखील आहेत. त्यामुळे पोट साफ होण्यासाठी बोरे मदत करतात. लहान मुलांसाठी बोरे उत्तम टॉनिकसारखे काम करतात. त्यात मेंदू व मज्जातंतूंचे टॉनिक असल्यासारखे घटक आहेत.

लसूण :

स्निग्ध गुणांचा, बृहण करणारा, उष्ण आणि मधुर गुणांचा लसूण हिवाळ्यासाठी उत्तम आहे. लसणीत कॅल्शियम आणि फॉस्फरसचा चांगला साठा असतो. त्वचेखालच्या लहान रक्तवाहिन्यांचे विस्तारण करून शरीराला उबदार वाटण्याचा अनुभव देणारा लसूण आहे. असा हा लसूण थंडीत विविध सूप्समध्ये वापरता येईल किंवा रोज एक लसूण पाकळी कच्चीच चावून खाल्ली तरी चालते. एक कप पाण्यात लसणीची एक पाकळी किंचित ठेचून घाला व पाणी उकळवून अर्धा कप होईपर्यंत आटवा. असा काढा गाळून दिवसात एकदाच कोमट असताना घेता येतो. अनेक स्त्रियांना रजोनिवृत्तीनंतर वारंवार मूत्रमार्गाचा जंतुसंसर्ग होतो. अशा तक्रारींमध्ये जंतुघ्न असलेला लसूण आहारात ठेवल्यास फायदा होऊ शकतो.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Winter food eat these 4 things in winter scsg
First published on: 25-11-2019 at 15:44 IST