हल्ली सोशल मीडियावरील किंवा मेलची सुविधा असणारी अकाऊंटस हॅक होण्याचे प्रकार सर्रास घडतात. यामध्ये मोठमोठ्या कंपन्यांच्या महत्त्वपूर्ण डेटापासून ते अगदी एखाद्या व्यक्तीच्या वैयक्तिक अकाऊंटमधील माहिती चोरली जाते. त्यामुळे आपले अकाऊंट सुरक्षित ठेवण्यासाठी योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे. आपल्याकडे मेल पाठवण्यासाठी अनेकांकडून जीमेलचा वापर केला जातो. त्यामुळे हॅकिंगचा धोका लक्षात घेता जीमेलने युजर्सना काही सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. याचा वापर करून तुमचे जीमेल अकाऊंट हॅक झाले आहे किंवा नाही, याची खातरजमा केली जाऊ शकते. त्यामुळे आपला जीमेलचा आयडी कोणी वापरत असेल तर हे आपल्याला समजू शकते. त्यापासून बचाव कऱण्यासाठी काय करावे यासाठी काही खास टिप्स…

१. जीमेलमध्ये अशाप्रकारची काही सेटिंग्ज आहेत की, त्याद्वारे तुमच्या जीमेल अकाऊंटचा कोणी कधी आणि कसा वापर केला हे समजू शकते. इतकेच नाही तर आपले अकाऊंट एखाद्याने किती वेळासाठी वापरले याची नोंदही मिळू शकते.

२. जीमेल सुरु केल्यावर सगळ्यात खाली उजव्या बाजूला डिटेल्स असे लिहिलेले असते. त्यावर क्लिक केल्यास एक नवीन विंडो ओपन होईल. त्यामध्ये कोणत्या सर्व्हरवरुन किती वेळासाठी तुमचा जीमेल वापरला गेला आहे ते दिसू शकेल. यामध्ये ठिकाण, वेळ अशी सगळी माहिती दिसू शकेल. यामध्ये आयपी अॅड्रेसही दिसेल. हा अॅड्रेस आपले घर किंवा ऑफिस याच्या व्यतिरिक्त असल्यास कोणत्या ठिकाणहून तुमचे अकाऊंट वापरेल आहे ते तुम्हाला समजू शकेल.

३. या विंडोमध्येच वरच्या बाजूला ‘साईन आऊट फ्रॉम ऑल अदर सेशन्स’ असा पर्याय दिला आहे. त्यावर क्लिक केल्यास इतर सगळ्या ठिकाणहून तुम्ही लॉगआऊट व्हाल. त्यानंतर तुम्ही पासवर्ड बदलून तुमचे जीमेल अकाऊंट पुन्हा वापरु शकता.