झिका विषाणूवरील देशी लसीच्या चाचण्या भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेतर्फे (दी इंडियन काऊन्सिल फॉर मेडिकल रिसर्च-आयसीएमआर) लवकरच केल्या जातील. मध्य प्रदेश, राजस्थान आणि गुजरातमध्ये या विषाणूने बाधित झालेल्या व्यक्ती आढळल्या आहेत. या लसीची मानवी वापरासाठीची सुरक्षितता, तिची परिणामकारकता आणि दुष्परिणाम तपासण्यासाठी या दुसऱ्या टप्प्यातील चाचण्या केल्या जातील, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हैदराबाद येथील भारत बायोटेकने ही लस विकसित केली आहे. या लसीमुळे झिका विषाणूच्या आशियाई आणि आफ्रिकी या दोन्ही प्रकारांपासून होणाऱ्या संसर्गापासून संरक्षण होईल, असा या कंपनीचा दावा आहे. या कंपनीने सुमारे दोन वर्षांपूर्वी ही लस तयार केली होती. त्या वेळी भारतात झिकाची लागण झालेली नव्हती. त्याचा प्रसार तेव्हा लॅटिन अमेरिकेपुरता मर्यादित होता, असे हा अधिकारी म्हणाला.

झिका विषाणूचा वाहक असलेल्या एडिस प्रजातीच्या डासापासून मुख्यत्वे झिकाचा प्रसार होतो. सध्या काही राज्यांत त्याचा प्रादुर्भाव झालेला आहे. तो रोखण्यासाठी डास-कीटक नियंत्रण हे मोठेच आव्हान असते. त्यामुळे या लसीची चाचणी यशस्वी ठरल्यास तिचा वापर हा सर्वोत्तम उपाययोजना ठरेल, असे म्हणणे या अधिकाऱ्याने मांडले. लसीच्या चाचणीसाठी नियामकांच्या परवानग्या घेण्याची प्रक्रिया लवकरच सुरू केली जाईल, असे त्यांना सांगितले. झिका विषाणूची लागण झाल्यानंतर ताप, त्वचेवर पुरळ, स्नायू आणि सांधेदुखी, डोळे लाल होणे आदी लक्षणे दिसून येतात, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

 

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Zika virus vaccine
First published on: 19-11-2018 at 00:04 IST