अशोक रावकवी – rowkavi@gmail.com

समिलगी व्यक्तींबाबतच्या कलम ३७७ मध्ये बदल करून न्यायालयानं आपला प्रागतिक दृष्टिकोन दाखवला. मात्र मिळालेल्या या स्वातंत्र्याचा आनंदोत्सव साजरा करत असतानाच दुसरीकडे या समुदायाला टोकाच्या प्रतिक्रिया आणि त्रास अनुभवाला येतो आहे. काहींना नोकरीवरून काढून टाकलं आहे, तर काहींना राहती जागा सोडायला सांगितलं गेलंय. एका लेस्बियन मुलीवर तर तिच्या भावाकडूनच बलात्कार करण्यात आलाय. हे परिणाम फार भीषण आहेत..

भारताच्या सर्वोच्च न्यायालयानं कलम ३७७ बाबत दिलेल्या निकालाची शाई जेमतेम वाळते न वाळते तोच आपल्या देशात दोन्ही प्रकारच्या टोकांच्या बातम्या येऊ लागलेल्या आहेत. त्यातल्या नकारात्मक बातम्या िहसक घटनांच्या आणि संवेदनशील माणसांच्या भावनेला हात घालणाऱ्या आहेत. एकीकडे एलजीबीटी समुदाय रस्त्यावर आनंदानं नाचतो आहे. अखेर आपल्याला हवं ते स्वातंत्र्य मिळालं याबद्दल सुटकेचा नि:श्वास सोडतो आहे. मात्र, अगदी याचवेळी मुख्य धारेतल्या समाजातली कुटुंबं, कार्यालयं आणि महाविद्यालयंदेखील याबाबत काय करावं याबद्दलचा संताप आणि हिंसक प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत.

न्यायालयाच्या या निर्णयानंतर एका समिलगी कर्मचाऱ्यानं आपल्या कार्यालयात पेढे वाटले. त्यावरची प्रतिक्रिया म्हणून त्याच्याकडून लगेचच राजीनामा घेण्यात आला. म्हणजे प्रत्यक्षात त्याला कार्यालयातून हाकलूनच लावण्यात आलं. ‘आता तो कार्यालयातल्या लोकांशी ‘तसले’ संबंध ठेवेल,’ अशी भीती त्याच्या व्यवस्थापकाला वाटू लागलेली होती. दुसऱ्या ठिकाणी एका महाविद्यालयानं, ‘गे किंवा लेस्बियन विद्यार्थ्यांनी कोणत्याही प्रकारचा गोंधळ केलेला चालणार नाही. आम्ही महाविद्यालयामध्ये न्यायालयाच्या या निर्णयाबद्दल कोणत्याही प्रकारचा आनंदोत्सव मुळीच साजरा करू देणार नाही.’ असं आपल्या विद्यार्थ्यांना बजावलेलं आहे. तिथल्या विद्यार्थ्यांच्या संघटनेला आपल्या सदस्यांसाठी समिलगी व्यक्ती सामोऱ्या जात असलेल्या प्रश्नांबाबत माझं व्याख्यान ठेवायचं होतं. ते अचानक रद्द करण्यात आल्यामुळं मला ही गोष्ट कळली. खरंतर हे व्याख्यान सर्वासाठी खुलंही नव्हतं. आणि मुख्य म्हणजे हा कुठल्याही प्रकारचा आनंदोत्सव तर अजिबातच नव्हता. पण महाविद्यालयानं मुलांना हा कार्यक्रम रद्द करायला लावला तो लावलाच.

या क्षेत्रात काम करणाऱ्या काही स्वयंसेवी संस्थांना जागा मालकांनी त्यांची कार्यालयं सोडायला सांगितलेलं आहे. ‘आता कायदा झाल्यावर तुम्ही इथं लैंगिक स्वैराचारच सुरू कराल’ असं जागा मालकांचं म्हणणं आहे. स्त्री-पुरुष एकत्र काम करत असलेल्या कार्यालयात कितपत लैंगिक स्वैराचार घडतात, याकडं मात्र मालक सोयीस्कर दुर्लक्ष करतात. व्यक्तींच्या स्तरावर बोलायचं झालं, तर काही कुटुंबांमध्ये तर परिस्थिती याहीपेक्षा भीषण आहे. माझ्या माहितीतल्या मुंबईमधल्या दोन कुटुंबांनी आपल्या समिलगी अपत्यांना घर सोडून ‘दुसरीकडे राहायला जा’ असं सांगितलेलं आहे. आपल्या घरात समिलगी व्यक्तीने ‘तसल्या प्रकारचे लोक’ आणू नयेत, असं या कुटुंबीयांना वाटतं. एका समिलगी पुरुषाच्या बाबतीत आणखी वेगळंच घडलं. त्याच्या आईवडिलांनी त्यानं एका मुलीशी लग्न करावं म्हणून प्रस्ताव आणलेला आहे. ‘जर तू या लग्नाच्या प्रस्तावाला होकार दिला नाहीस, तर तुला कुटुंबासोबत राहता येणार नाही, तुला हे घर सोडून जावंच लागेल’ असा निर्वाणीचा इशारा त्याला देण्यात आला आहे. विशेष बाब म्हणजे, या मुलाच्या आईवडिलांनी त्याच्या आजीआजोबांच्या उपचारांना ठाम नकार दिलेला असल्यानं हा मुलगा स्वत:च त्यांच्या सगळ्या वैद्यकीय उपचारांचा खर्च करतो.

एका लेस्बियन मुलीची गोष्ट तर आणखीनच धक्कादायक आणि हृदयद्रावक आहे. इंदौरमध्ये राहणाऱ्या या मुलीवर तिच्या सख्ख्या आणि चुलतभावानं ‘तिच्या वडिलांनी दिलेल्या सूचनांप्रमाणे’ वारंवार बलात्कार केला. यामागचं कारण काय होतं? ‘असा बलात्कार केल्यानं तिचा समिलगी असण्याचा आजार बरा होईल आणि पुरुषच ‘अधिक चांगले’ जोडीदार आहेत, हे तिला लक्षात येईल.’ असले विचित्र तर्क करून उपाय केले जात असल्यामुळे जवळचे लोकसुद्धा किती वाईट पद्धतीनं विचार करू शकतात, हे सामोरं येते आहे.

मुख्य धारेतल्या समाजाला एलजीबीटी समुदायाचं वागणं म्हणजे ‘अनियंत्रित, समाजविघातक लैंगिक वर्तन’ असं वाटत असतं. खरंतर हा एका मानवी लैंगिक वर्तनाचा सर्वसामान्य म्हणजे नॉर्मल प्रकार आहे. याआधीच्या माझ्या स्तंभांमधे लिहिल्याप्रमाणे ‘हा कोणताही आजार नाही’. अगदी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या खंडपीठानंसुद्धा असंच म्हटलेलं आहे. न्या. चंद्रचूड या न्यायमूर्तीनी तर लोकांना समलैंगिकतेबद्दल जागरूक करणं ही सरकारची जबाबदारी असल्याचंही नमूद केलेलं आहे. मग सरकार हे महत्त्वाचं काम आपल्या हाती का घेत नाही? भारतात सुमारे साडेसात कोटी नागरिक समिलगी असल्याचे म्हटले जाते. आता त्यांचं आयुष्य आणि स्वातंत्र्य धोक्यात आलेलं आहे. ते जन्मत:च विशिष्ट जनुकीय प्रभावाखाली घडलेलं असल्यामुळं त्यांना अशा प्रकारची हीनतेची वागणूक दिली जाण्याचं काहीच कारण नाही.

प्रस्तुत स्तंभाच्या वाचकांनी आपल्या मनातली सहानुभूती जरा जागी करावी. तरुण समलैंगिक व्यक्तींना ते कसेही असले तरी प्रेम आणि आदर मिळण्याची नक्की गरज आहे, हे नीट जाणून घ्यावं. त्यासाठी शाळेमधे लैंगिक शिक्षण देणं अगदी जरुरीचं आहे. आपल्याकडे ‘स्त्री-पुरुष’ असं असणारं तथाकथित द्वैत किंवा या दोघांमधे दर्शवला जाणारा फरक प्रत्यक्षातल्या काहीशा जटिल परिस्थितीला वाजवीपेक्षा जास्त सोपं करून दाखवणारा आहे. खरंतर आपली भारतीय संस्कृती अत्यंत प्राचीन आहे आणि त्यात या लैंगिकतेबाबतच्या साऱ्या गोष्टींचा खूप विचार केला गेलेला आहे. होय, पूर्वीच्या काळीसुद्धा ‘आमच्यासारख्या’ लोकांना आदराची फारशी वागणूक मिळत नव्हती हे मान्य आहे, पण निदान आम्हाला आमचं आयुष्य स्वतंत्रपणे जगण्याची मुभा तरी होती. आधुनिकीकरणाच्या रेटय़ात वेगळ्या प्रकारचा िलगभाव आणि लैंगिकता यांना चक्क समाजविघातक ठरवलं गेलं आहे. अशा व्यक्तींची सतत हेटाळणी केली जाते. अशा दुजाभावाबाबत न्यायालयामधे अनेकदा सुनावणीदेखील झालेली आहे. आम्हाला या देशाचे नागरिक म्हणून समान वागणूक दिली गेली पाहिजे याला अधिकृत मान्यता देण्यात आलेली आहे. मात्र वास्तवात याच्या अगदी उलट घडतं. जेव्हा आम्ही आपल्या कामाच्या ठिकाणी किंवा महाविद्यालयामधे स्वत:च्या लैंगिक प्राधान्यांबद्दल खुलेपणानं सांगतो आणि एक सन्मानाचं आयुष्य जगण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा आम्हाला खूप मानसिक त्रास देण्यात येतो. कधी कधी आमच्यासोबत िहसादेखील केली जाते.

सध्या दिल्लीच्या सगळ्या वृत्तपत्रात झळकणारी एक ताजी बातमी मी तुम्हाला सांगू इच्छितो.  नवीन दास या नावाचा एक छोटा राजकीय नेता होता. त्याचे तयब नावाच्या एका पुरुषाशी गेली दोन वर्षे नातेसंबंध होते. खरंतर तयब नवीन दासवर आर्थिकदृष्टय़ा अवलंबून होता, असंच म्हणता येईल. नवीनला या नात्यात व्यवस्थित ‘वैवाहिक जीवन’ हवं होतं. तयबची त्याला मात्र अजिबातच तयारी नव्हती. गेल्या आठवडय़ात तयबनं मिठाईमधे झोपेच्या गोळ्या मिसळून ती नवीनला खाऊ घातली. मग त्यानं त्याची क्रेडिट आणि डेबिट कार्ड चोरली, या सर्वावर कडी म्हणजे त्याला त्याच्या कारमधे कोंडून, जाळून मारून टाकलं. पोलीस मात्र वेगळं चित्र रंगवत आहेत. तयबला त्यांच्या या नात्याचे अश्लील व्हिडीओ दाखवून कशाप्रकारे ब्लॅकमेल करण्यात येत होतं, याबाबत पोलीस आणि प्रसारमाध्यमं अत्यंत विस्तृत आणि बेजबाबदारपणे माहिती देत आहेत. नवीन दासचं वागणं कसंही असलं, तरी त्यामुळं त्याचा खून करणं कसं न्याय्य ठरेल?

आता नेहमीच्या स्त्री-पुरुष विवाहांमध्येही मोठय़ा प्रमाणावर िहसाचार घडत असतो याची मला पक्की खात्री आहे. मात्र, प्रसारमाध्यमांमध्ये नवीन दासचं वर्णन जसं राक्षसी रूपात केलं जातं आहे, तसं अन्य पुरुषांचं वर्णन नक्कीच केलं जात नाही. आता या खुनाशी संबंधित नसणाऱ्या नवीनच्या आयुष्यातल्या सर्व प्रकारच्या गोष्टीचीही साऱ्या प्रसारमाध्यमांमधे मोठीच चर्चा सुरू आहे. या साऱ्या चिखलफेकीपासून दूर जाण्यासाठी नवीनची बहीण आणि अन्य नातेवाईक दडून बसलेले आहेत. समिलगी व्यक्तींना मृत्यूनंतरही त्रास भोगावा लागतो हेच खरं!

अशाप्रकारचे नातेसंबंध समाजमान्य असते आणि त्यांना कायदेशीर मान्यता असती, तर नवीन किंवा तयब या दोघांपैकी कुणीही पोलिसांकडे जाऊन परस्परांविरुद्ध घरगुती िहसाचाराबाबतची तक्रार नोंदवू शकले असते. त्यांना पुढं हा प्रश्न न्यायालयात सोडवता आला असता. मात्र समिलगी व्यक्तींच्या विवाहांना कायद्याची मान्यता नसल्यामुळं अशाप्रकारचं काहीच घडू शकलं नाही. वृत्तपत्रात तयब कशाप्रकारे नवीनकडून पैसे उकळत होता, याबद्दलच्याही विस्तृत बातम्या आलेल्या आहेत. ते कदाचित खरंही असेल, पण या बातम्या इतक्या चमचमीत स्वरूपात छापण्याची जरुरी नव्हती.

समिलगी मुलींना कुटुंबीयांकडून सामोरे जावे लागणारे प्रश्न आणखी वेगळे आहेत. नातेवाइकांकडून होणारे बलात्कार, दूरच्या शहरातल्या, त्यांना कुणीच ओळखत नसलेल्या ठिकाणी वृद्ध माणसांशी त्यांची बळजबरीनं लग्न लावून देणं, हे तर नेहमीच घडत असतं. अनेकदा छोटय़ा गावात अशा समिलगी जोडीदारांचे दिवसाढवळ्या खूनही केले जातात. लेस्बियन किंवा गे व्यक्तीकडं ‘कुटुंबासाठी असणारी लाजिरवाणी गोष्ट’ म्हणून पाहिली जाते. याच ‘संस्कारी’ कुटुंबाला त्यांनी कमावलेले पैसे घेण्यात मात्र कोणतीच शरम वाटत नाही. मला ठाऊक असलेल्या एका कुटुंबातला मुलगा ‘बार डान्सर’ म्हणून काम करतो. तो आपल्या कुटुंबाला दरमहा ५० हजार रुपये देतो. असं असलं तरी, कुटुंबाला मात्र ‘त्याच्यामुळं कुटुंबाची इज्जत जात असल्यानं’ त्यानं आपल्या घरात राहू नये असं वाटतं. तृतीयपंथी मुलांना तर आपल्या कुटुंबाकडून कोणताच आधार मिळत नाही. अखेर त्यांना घरातून पळून जाऊन तृतीयपंथींच्या/हिजडा घराण्यात सामील व्हावं लागतं. मग तिथला गुरू त्यांची सगळी काळजी घेतो.

आजच्या स्तंभात मी मुंबादेवीला, माझ्या मुंबाआईला हे सारं थांबवण्याची प्रार्थना करतो आहे. कारण खुद्द सरकार तर हे थांबवू शकत नाहीच, इतकंच काय खुद्द समिलगी समुदाय पुरेसा एकवटलेला नसल्यानं अशा आणीबाणीच्या प्रसंगी परस्परांना मदतदेखील करू शकत नाही. आमच्या ‘हमसफर ट्रस्ट’ची अशा परिस्थितीत साहाय्य करणारी टीम आहे. त्यांना मोठय़ा प्रमाणावर येणाऱ्या टेलिफोन कॉल्समुळं प्रत्येकालाच पुरेशी मदत करता येईल, असं नाही. अन्य स्वयंसेवी संस्थांकडे अशा कठीण परिस्थितीत पोलीस किंवा मुलांचे पालक यांच्याशी संवाद साधण्याचं कौशल्य नाही. आमच्या समुदायानं सर्वोच्च न्यायालयाचा ६ सप्टेंबरचा निकाल आल्यानंतर काहीशी विरोधी प्रतिक्रिया उमटेल, असा अंदाज बांधला होता खरा, पण ती इतकी वाईट पद्धतीची असेल असं आम्हाला अजिबातच वाटलेलं नव्हतं.

प्रिय वाचकहो, ही प्रार्थना मी मुंबादेवीला जरी केलेली असली, तरी ती तुम्हालादेखील केलेली आहे असं समजा. एखाद्या ठिकाणी तुम्हाला चुकीची गोष्ट घडताना दिसली, तर कृपया आमच्या समुदायाला सक्रियपणे साहाय्य करा. एलजीबीटी समाजाला थोडीशी सहानुभूती आणि प्रेम दाखवा, हीच विनंती मी तुम्हाला आजच्या स्तंभातून करतो आहे.

अनुवाद : सुश्रुत कुलकर्णी

chaturang@expressindia.com