30 September 2020

News Flash

सुसंस्कारच!

माझ्या रागाचं कारणही सांगतो. वाचकहो, कृपया माझ्याशी जरा चांगुलपणानं वागाल का?

आजचा स्तंभ मी काहीसा राग आणि काहीसा उद्वेग या दोन्हीही भावना मनात ठेवून लिहितो आहे. पण त्याबद्दल बोलण्याआधी तुम्हा वाचकांच्या उदंड प्रतिसादाबद्दल आभार!

माझ्या रागाचं कारणही सांगतो. वाचकहो, कृपया माझ्याशी जरा चांगुलपणानं वागाल का? तुम्ही लिहिलेल्या पत्रांतून माझ्यावर अशिष्ट प्रकारे टिप्पणी केलीत, तर त्यामुळं माझ्याऐवजी अशा लोकांची संस्कृती कशी आहे, ते कळतं. ‘हा स्तंभ मी तुमच्या कुटुंबाचा किंवा एकूणच हिंदू समाजातल्या पारंपरिक मूल्यांचा विनाश करण्यासाठी लिहितो आहे’, अशा प्रकारच्या कुठल्याही प्रकारच्या आरोपांचा मी मनापासून निषेध करतो. मीदेखील या भारतीय संस्कृतीचाच एक भाग आहे. मी माझ्या गुरूंच्या म्हणजेच रामकृष्ण मिशन आणि मठातील एका स्वामींच्या सल्लय़ानुसार सत्याचा शोध घेण्यासाठी प्रवास करणारा एक प्रामाणिक साधू आहे. ‘मी खरोखरीच कोण आहे’ याबद्दल माझ्या गुरूंनी माझ्याशी सखोल चर्चा केली होती. त्यांनी मला ‘स्वत:शी प्रामाणिक राहायला’ सांगितलं. आजही मी अगदी तेच करतो आहे. पण काही खोडसाळ लोकांनी चिकित्सा आरंभली आहेच, तर आज मी ‘आमच्या व्यक्तिगत आयुष्याबद्दल’ आडपडदा न ठेवता सांगतोच.

माझ्या समलिंगी मित्र परिवारातील सर्वच पुरुष आपल्या कुटुंबाची उत्तम प्रकारे जबाबदारी घेणारे आहेत. आपला आपल्या भावंडांबद्दल आणि आई-बाबांबद्दल असणाऱ्या कौटुंबिक जबाबदाऱ्यांबाबतचा ‘धर्म’ ते व्यवस्थित पार पाडतात. (धर्म या शब्दाचा खरा अर्थ कर्तव्य, जबाबदारी असा आहे). माझ्या सर्वात प्रिय व्यक्तीला, माझ्या आईला, ‘आमच्या सोबत येऊन एखादा दिवस घालवाल का,’ असे तिला तिच्या एकाही विवाहित मुलानं किंवा त्यांच्या आधुनिक विचारांच्या पत्नीनं कधीही प्रेमानं विचारलेलं नाही. माझी आई मला कधी कधी दु:खानं तुझा वंश पुढे कसा जाणार’ असं विचारायची. चारचौघांसारख्या नसणाऱ्या मुलांवर आई वैतागणं साहजिकच होतं. मात्र क्वचित कधीतरी ती असं म्हणत असली, तरी तिचा माझ्यावर खूपच जीव होता. आपल्या अखेरच्या दिवसांत तिची काळजी घेणाऱ्या विमलाला तिनं म्हटलं होतं, ‘‘माझा हा मुलगा नेहमीच बंडखोरी करत आला असला आणि कुटुंबात तो सगळ्यांपेक्षा वेगळाच असला, तरी त्यानंच अखेपर्यंत माझी काळजी घेतली गं. माझे सारे आशीर्वाद त्यालाच आहेत.’’

तिनं मला नेमका काय आशीर्वाद दिला, हे मला ठाऊक नाही, पण तिनं मृत्यूअगोदर व्यक्त केलेल्या इच्छेप्रमाणं मी थेट हरिद्वारला जाऊन एकाचवेळी तिच्यासाठी, १९७४ मध्ये मृत्यू पावलेल्या माझ्या बाबांसाठी, माझी आत्या प्रेमाक्का आणि (मृत्यू पावलेले) माझे दोन धाकटे भाऊ – या साऱ्यांसाठीच अंतिम धार्मिक विधी केले. विशेष म्हणजे कुटुंबासाठी असणारे हे सारे विधी करायला अखेर एक समलिंगी मुलगाच कामी आला.

आमच्या ‘हमसफर ट्रस्ट’चे मुख्य मॅनेजर, विवेक आनंद अविवाहित आणि समलिंगी आहेत. आपल्या वडिलांच्या आजारपणात त्यांनी अगदी पार मूत्र-विष्ठा स्वच्छ करण्यापासून सर्व प्रकारची सेवा केली. त्यांचे वडील कट्टर आर्यसमाजी होते. एरवी ते आपल्या मुलाला, ‘‘लग्न करून माझी सेवा करण्यासाठी पत्नी न आणल्याबद्दल’’ रात्रंदिवस नावं ठेवत असत. इतर मुलांनी केलेल्या दुर्लक्षाकडे मात्र ते सोयीस्करपणे कानाडोळा करत. ‘हमसफर ट्रस्ट’चे सहसंस्थापक सुहैल अब्बासी हे माझे अत्यंत जवळचे मित्र आहेत. त्यांच्या वयोवृद्ध वडिलांना म्हातारपणामुळं विस्मृतीचा रोग झाल्यानं सुहैलना एका टीव्ही चॅनलच्या संचालकपदावरून वेळेआधीच निवृत्ती घ्यावी लागली. त्यांचे वडील जवळजवळ वस्त्रहीन अवस्थेतच घराबाहेर धावत सुटत असत. एकेदिवशी बिचाऱ्या सुहैलना अंधेरी रेल्वेस्टेशनवरून त्यांना केवळ अंगावर लुंगी असलेल्या अवस्थेतून उचलून घरी आणावं लागलं होतं. शेवटी सुहैलच्या मांडीवरच त्या वृद्ध माणसानं आपले प्राण सोडले, तेव्हा त्याच्या भावा-बहिणींपैकी कुणीही तिथं उपस्थित नव्हतं.

माझा समलिंगी, मराठी तरुण मित्र पल्लव आपल्या एम.बी.ए.च्या करिअरमध्ये उच्च क्षेणी मिळवून उत्तीर्ण झालेला आहे. तो आपल्या अस्थिरोगानं ग्रस्त असलेल्या वृद्ध आईची  काळजी घेत असतो. पल्लव एका अमेरिकन मल्टिनॅशनल कंपनीमध्ये उच्चपदावर आहे. दररोज काम संपताच तो घाईनं आपल्या आईची काळजी घ्यायला घरी धावत सुटतो. कुणा नातेवाईकांकडून कसलीही अपेक्षा न करता. शिवाय स्वत:चं आयुष्य आणि बॉयफ्रेंड अशी कसरत त्याला करावी लागते, ती निराळीच.

माझ्या जवळजवळ सर्वच समलिंगी मित्रांची गोष्ट थोडीबहुत अशीच आहे. जोडीदाराच्या मृत्यूनंतर एकटय़ा उरलेल्या आईचं किंवा बाबांचं पालकत्व त्यांना एकटय़ालाच स्वीकारावं लागतं. त्यांची तथाकथित ‘नॉर्मल’ (भिन्नलिंगी आकर्षण असणारी) मुलं मात्र घराबाहेर पडून आपल्या वृद्ध पालकांना आणि अन्य नातेवाईकांना विसरून आपापलं आयुष्य अगदी मनाप्रमाणं जगत असतात. ज्या वाचकांनी ‘हिंदू समाजाची पारंपरिक मूल्यं आणि थोर परंपरा असणारी कुटुंबव्यवस्था यांवर आघात करण्याबद्दल’ मला अगदी शेलक्या शिव्या घातलेल्या आहेत, त्यांनी कृपया मला सांगावं – मी जरी एक अविवाहित, समलिंगी पुरुष असलो, तरी कुटुंबासाठीच्या सर्व जबाबदाऱ्या मी नीटपणे पार पाडलेल्या आहेत. मग आयुष्याच्या उतरणीत, वयाच्या ७०व्या वर्षी तुमचा रोष मला झेलावा लागणं योग्य आहे का?

खरं तर पाश्चिमात्य आणि पौर्वात्य एलजीबीटी चळवळींमध्ये हाच एक मुख्य फरक आहे. अमेरिका, युरोप आणि ब्रिटनमध्ये गे किंवा लेस्बियन मुलांना घराबाहेर पडावं लागतं किंवा त्यांचे पालकच त्यांना घराबाहेर हाकलून देतात. परदेशात १४-१५ वर्षांच्या मुलामुलींना त्यांच्याच आईवडिलांनी असं घराबाहेर काढलेलं पाहून मला खूपच धक्का बसलेला होता. भारतात सहसा केवळ जी तृतीयपंथीय मुलं असतात, त्यांनाच असं वाऱ्यावर सोडून दिलं जातं किंवा ती घरातून पळून जाऊन मग हिजडय़ांच्या घराण्यामध्ये प्रवेश करतात. समलिंगी अपत्यं मात्र ‘घरीच’ राहातात. ती अर्थातच अविवाहित राहात असल्यामुळं समाजाच्या दृष्टीनं ‘आपल्या पालकांचं एक शेपूट’ याशिवाय त्यांना वेगळं अस्तित्वच नसतं. मलाही लग्न किंवा तत्सम धार्मिक समारंभांना क्वचितच आमंत्रण येतं. आमच्याकडची सारी आमंत्रणं ‘श्रीमती शोभा रावकवी आणि परिवार’ अशी असतात.

आजच्या स्तंभाचा शेवट मी आईनं आपल्या समलिंगी मुलाच्या बाजूनं कसा लढा दिला, या गोष्टीनं करणार आहे. एक दशकभरापूर्वी माझ्या धाकटय़ा भावांनी त्यावेळचे शिवसेनेचे जेष्ठ नेते (आता दिवंगत) यांच्याकडे ‘माझ्या समलिंगी चळवळींमुळं मी कुटुंबाचं नाव कसं खराब करतो आहे’ अशी माझ्याबद्दल तक्रार केलेली होती. या नेत्याच्या ‘सांस्कृतिक चळवळी’ यांबद्दल साऱ्यांनाच ठाऊक आहे. ते एक नियतकालिक चालवत असत. या नियतकालिकामध्ये बँकॉकमधल्या बारगर्ल्स आणि असल्याच प्रकारच्या विषयांवर विस्तृत तिथल्या संस्कृतीचं वर्णन करणारे लेख असत. ‘तिथल्या संस्कृतीचं चित्रण ते अशा प्रकारे का करत आहेत’ याबद्दल कुणी त्यांना छेडलं, तर त्यांचं उत्तर असे – ‘‘आपली थोर संस्कृती आणि थायलंडची भ्रष्ट संस्कृती यांमधला मोठा फरक दाखवण्यासाठी मी असं करतो.’’ त्यांचं हे धारिष्टय़ खरं तर वाखाणण्याजोगं म्हटलं पाहिजे. माझ्या कुटुंबाचा बाळासाहेबांशीही चांगल्या प्रकारे, अगदी व्यक्तिगत परिचय होता. असं असूनदेखील या नेत्याने ‘मी आमच्या कुटुंबाचं नाव खराब करतो आहे’ अशा प्रकारचा हल्ला माझ्यावर अनेकदा चढवलेला होता.

एकदा ते आमच्या घरी माझ्या आईला भेटायला आले. ते घरी आल्यामुळं नक्की काहीतरी गडबड आहे, याचा मला अंदाज आला. मग मी माझ्या खोलीबाहेर न पडता आतच थांबून राहिलो. माझ्या प्रिय आईनं, शोभा रावकवी हिनं माझा बचाव केला. त्यांच्यात झडलेला संवाद असा –

नेते : अहो शोभाबाई, तुम्ही तुमच्या थोरल्या मुलाचं काहीतरी केलं पाहिजे.

आई : (आपल्या खास गिरगावी गोड मराठीत) मी नेमकं काय करावं अशी तुमची इच्छा आहे?

नेते : अहो, त्याला जर आपली चळवळ थांबावायची नसेल, तर तुम्ही त्याला स्वत:चं नाव बदलायला तरी सांगा ना. निदान तुमच्या मुला-नातवंडांचं नाव तरी बदनाम होणार नाही.

(माझी आई किती कणखर स्त्री होती, हे मला त्यावेळी कळलं. मी माझ्या खोलीतूनच त्यांचा संवाद ऐकत होतो. आई क्षणभर थांबून म्हणाली).

आई : हे बघा, गेली कित्येक वर्ष रावकवींच्या घरी नेहमी तुमचं स्वागतच होत आलेलं आहे. आमचं शिवसेनेसोबतचं नातं खूप जुनं आणि अगदी भक्कम आहे. जेव्हा जेव्हा तुम्ही माझ्या घरी आलात, तेव्हा चहापानाशिवाय मी तुम्हाला कधीही जाऊ दिलेलं नाही. पण, माझ्या थोरल्या मुलाबद्दल असणाऱ्या तुमच्या दृष्टिकोनामुळं मी खूप व्यथित झाले आहे. आपल्या वडिलांच्या मृत्यूनंतर माझ्या याच थोरल्या मुलानं खस्ता खाऊन आपल्या धाकटय़ा भावंडांचं शिक्षण पुरं केलेलं आहे. त्यामुळं मला असं वाटतं, की (तिच्या जिभेच्या तलवारीला आता चांगलीच धार चढली आहे, हे मला नीटच जाणवत होतं.) या घरातलं हे तुमचं शेवटचं आदरातिथ्य समजा. आणि तुम्हाला निरोप देण्याआधी मी तुम्हाला निक्षून सांगते, की ज्यांनी तुमच्या डोक्यात ही कल्पना भरवली त्यांनीच स्वत:ची नावं बदलावीत. अशोक आणि त्याची चळवळ याबद्दल मला अभिमानच वाटतो.’’

त्यांची आमच्या सांताक्रूझच्या घराला दिलेली ही अखेरचीच भेट. आणि हो, त्यानंतर माझा भाऊ किंवा वहिनी यांनी आम्हाला पुन्हा कधीच आपलं तोंड दाखवलं नाही!

जर असं पाठबळ देणारी आई असेल, तर कुठल्या समलिंगी मुलाला आपण संपूर्णपणे भारतीय संस्कृतीतल्या कुटुंबात वाढल्याबद्दलचा अभिमान वाटणार नाही? माझ्या आईप्रमाणेच मीदेखील आजवर कुठल्याही तहानलेल्या वा भुकेलेल्या माणसाला माझ्या उंबरठय़ावरून कधीही विन्मुख पाठवलेलं नाही. माझ्या आईनं जी संस्कृती माझ्यात रुजवली तिचंच मी आजही नेकीनं पालन करतो आहे. आणि प्रिय वाचकहो, यातच माझ्यावर कोणते ‘संस्कार’ झालेले आहेत याबाबतच्या तुमच्या प्रश्नांना नक्कीच उत्तर मिळालं असेल. होय ना?

अशोक रावकवी

rowkavi@gmail.com

भाषांतर : सुश्रुत कुलकर्णी

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 7, 2018 5:08 am

Web Title: the life of lesbian gay bisexuality and transgender part 5
Next Stories
1 काळोखाकडून प्रकाशाकडे
2 विचारस्वातंत्र्य
3 साहित्यातील प्रतिबिंब
Just Now!
X