19 November 2017

News Flash

बाल आरोग्य : माझं बाळ का रडतं?

मध्यरात्री रडणाऱ्या बाळांच्या ओपीडीचे कॉल हे प्रॅक्टिस सुरू झाल्यावर नित्याचेच असतात.

डॉ. अमोल अन्नदाते | Updated: July 13, 2017 12:22 AM

मध्यरात्री रडणाऱ्या बाळांच्या ओपीडीचे कॉल हे प्रॅक्टिस सुरू झाल्यावर नित्याचेच असतात. त्या दिवशी ज्योत्स्ना तिच्या ३ महिन्यांच्या रडणाऱ्या बाळाला घेऊन अशीच रात्री २ वाजता आली. गंमत म्हणजे गेली दोन-अडीच तास रडून रडून घर डोक्यावर घेणारं बाळ चक्क शांत झोपलं होतं. हेही या रडणाऱ्या बाळांचं विशेष असतं. त्यालाही एक विशेष कारण असतं. ‘डॉक्टर अहो खरंच एवढा रडत होता ना, नाहीतर एवढय़ा रात्री तुम्हाला उठवणार नव्हतो आम्ही.’ मी बाळाचे पोट तपासले आणि माझ्या चेहऱ्यावर फारसं काही नसल्याचे भाव पाहून ज्योत्स्ना म्हणाली, ‘डॉक्टर नीट पाहा हो, खूप रडत होता. गेल्या आठवडय़ात दुसऱ्यांदा झालंय असं आणि संध्याकाळी किंवा रात्रीच होतं असं. बाळ दूध पितं का, ताप आहे का, नीट सू-शी करतं का, या नेहमीच्या प्रश्नावलीची उत्तरे मला ठाऊक होती, तरीही ही उत्तरं पुन्हा तपासणं गरजेचं असतं. ‘डॉक्टर बाकी काही त्रास नाही हो. फक्त तेवढं संध्याकाळचं आणि रात्रीचं रडणं सोडलं तर बाकी काही त्रास नाही बघा.’ एवढं एक वाक्य निदानासाठी पुरेसं होतं.

हे बघा हे रडणं तसं सामान्य असतं. याला आमच्या बालरोगशास्त्राच्या भाषेत ‘इव्हनिंग कोलीक’ असे म्हणतात. शक्यतो तीन आठवडय़ांपासून ते तीन महिन्यांपर्यंत हे जास्त प्रमाणात आढळून येतं. आठवडय़ातून तीन वेळा आणि कधी दिवसातून तीन तास असं या रडण्याच्या लक्षणांना तीनचा नियम म्हणजे ‘रूल ऑफ थ्री’ असे संबोधतात. प्रत्येक केसमध्ये हा नियम जसाच्या तसा लागू होत नाही. काही बाळांना सहा महिने किंवा वर्षांपर्यंतही त्रास होऊ  शकतो. खरं तर याचे असे काही विशेष कारण नसते. थोडाफार काही गोष्टींचा संबंध आढळून येतो आणि काही उपायांनी बरे वाटते. ‘डॉक्टर गॅसमुळे हे होत असेल का हो?’ बघा, बऱ्याचदा या रडण्याचं खापर हे गॅसवर फोडलं जातं. पण  गॅस हे खरंतर आईच्या मानगुटीवर बसलेलं एक भीतीचं भूत असतं. हो एवढं आहे की पाजल्यावर नीट खांद्यावर घेऊन बाळाला थापटलं तर दूध चांगलं पचतं आणि रडण्याचं प्रमाण कमी होतं. यातही दोन वेळा थापटण्याची एक पद्धत वापरली तर त्याने अजून फायदा होतो. बाळ दूध पिताना सुरुवातीला काही वेळेत जास्त दूध पिते आणि नंतर हळूहळू दूध पिते. सुरुवातीचे दूध पिऊन झाल्यावर एकदा आणि नंतर असे दोन वेळा प्रत्येक वेळी पाच मिनिटे थापटल्यास बाळाच्या रडण्याचे प्रमाण कमी होते. मी तुम्हाला काही औषधे लिहून देत आहे. पण एक लक्षात ठेवा की बाळाला काही आजार नाही. ‘डॉक्टर यासाठी अजून काय करावं?’ यासाठी एक सर्वोत्तम उपचार सांगू? बाळाला घेऊन फिरणे किंला त्याला गाडीवर मोकळ्या हवेत फिरवून आणणे.

‘डॉक्टर, बाळ रडत असताना हे गंभीर नाही, असे तुम्ही म्हणताय हे मला पटले. पण मग हे रडणं गंभीर आहे हे कसं ओळखायचं?’ मला सांगा तुमचे बाळ रडत असले तरी नंतर झोपते की नाही? ‘हो, इतर वेळी काही त्रास नसतो.’ हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. काहीतरी गंभीर असेल तर बाळ झोपणारही नाही आणि दूधही पिणार नाही. दूध नीट प्यायले नाही तर त्याला सू-शी नीट होणार नाही, तसेच त्याबरोबर न थांबणाऱ्या उलटय़ा, ताप अशी काहीना काही लक्षणे नक्की असतील. या वयामध्ये रडण्याचे सर्वात जास्त प्रमाणात आढळणारे कारण म्हणजे ओले डायपर.

ज्योत्स्ना गालातल्या गालात हसली. हे रडणे सामान्य आहे याबद्दल आता तिची पूर्ण खात्री झाल्याचेच ते लक्षण होते.

amolaannadate@yahoo.co.in

First Published on July 13, 2017 12:20 am

Web Title: children evening colic baby colic