पिझ्झा, बर्गर आणि डोनट यांसारख्या पदार्थामुळे उद्भवणाऱ्या आजारावर नियंत्रण आणण्यासाठी केरळच्या राज्य सरकारने या पदार्थावर १४.५ टक्के फॅट कर लावण्याचा निर्णय घेतला. साखरेवर अतिरिक्त कर लावण्याचा विचार केंद्रातही सुरू आहे. कर लावल्यामुळे शारीरिक आरोग्याचा किती फायदा होईल हे सध्या सांगणे कठीण असले तरी यानिमित्ताने पुन्हा एकदा मैदायुक्त पदार्थाच्या दुष्परिणामांकडे लक्ष वेधले गेले आहे.

पिझ्झा, बर्गर आणि डोनट या पदार्थाची मागणी जगभरात वाढत असली तरी याचे आपल्या आरोग्यावर दुष्परिणाम होत असतात. भारतातही या पदार्थांची लोकप्रियता वाढली असून शहरांपासून गावापर्यंत एका चौरस किलोमीटरच्या परिसरात अनेक फास्ट फूड केंद्र उभी राहिली आहेत. त्या तुलनेत पोहे, उपमा, इडली यांसारखे पारंपरिक आणि आरोग्यास चांगले पदार्थ मागे पडत चालले आहे. मैदायुक्त पदार्थ सहज उपलब्ध होत असले तरी आरोग्याच्या दृष्टीने ते नेमके किती व कसे घातक आहेत व त्या तुलनेत पारंपरिक पदार्थ नेमके कुठे आहेत त्याची माहिती घेतली तर आपण नेमके काय खायला हवे ते वेगळे सांगण्याची गरज पडणार नाही.

मैदा आरोग्यास घातक

पिझ्झा, बर्गर आणि डोनट हे पदार्थ मैद्यापासून तयार होतात. मुळात मैदा पचण्यासाठी जड असून गहूधान्यातील तंतू बाजूला काढून उरलेल्या घटकांपासून मैदा तयार केला जातो. या मद्यामध्ये कबरेदकांचे प्रमाण अधिक असल्यामुळे यातून फक्त उष्मांक (कॅलरी) मिळतो. असे पदार्थ शरीरास कुठलेही पोषक द्रव्ये पूरवत नाहीत तर यातून शरीराची जाडी वाढणे, लठ्ठपणा, वजन वाढणे, बद्धकोष्ठता, पचनक्रियेत बिघाड असे अनेक दुष्परिणाम होतात. मैद्यामुळे शरीरातील शर्करा वाढते आणि यातूनच मधुमेहासारखे आजार होण्याची शक्यता वाढते. त्याबरोबरच पावामध्ये बेंजाईल पेरॉक्साइडचा वापर यामुळे त्वचेचा कर्करोग होत असल्याचे संशोधनातून दिसते. मैदा बनविताना सोडिअम मेटासल्फेटचा वापर केला जातो तो गर्भवती स्त्रियांसाठी हानीकारक असतो.

जंकफूडचे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम

जंकफूडमुळे रक्तात आम्लता वाढते हे शरीरासाठी अपायकारक आहे. कारण आम्लता वाढल्यामुळे शरीरातील क्षारांचा साठा कमी होतो आणि त्यातून चिडचिडेपणा, स्मरणशक्ती कमी होणे, सर्दी, सांधेदुखी, रक्तदाबाचे विकार बळावू लागतात. त्याशिवाय पिझ्झासारख्या पदार्थामध्ये चीजचे प्रमाण अधिक असते. यातून लठ्ठपणा वाढतो. तर बर्गरमधील टिक्की अनेक तास साठवून ठेवलेली असते आणि ऐनवेळी तळून ती वापरात आणली जाते. हे साठवणुकीतील पदार्थ शरीरासाठी अधिक हानीकारक असते. चॉकलेट केक हा उष्मांकाचा बॉम्ब असून यात साखर आणि मैदा याचे प्रमाण अधिक असते. त्याबरोबरच पिझ्झामध्ये वापरण्यात येणाऱ्या मोझेरेला चीजमध्ये मिठाचे प्रमाण अधिक असते. मात्र इतक्या मिठाची गरज शरीराला नसते. चण्याच्या डाळीमध्ये प्रोटीन असते मात्र तळल्यानंतर हे पीठ पचायला जड जाते. तर बाहेरील बटाटे वडे तळण्यासाठी त्याच तेलाचा वापर केला जात असल्यामुळे या तेलात ऑक्सीडेशन निर्माण होते.

हृदयरोगाचा धोका संभवतो

जंकफूडमध्ये मेद मोठय़ा प्रमाणात असून यामुळे रक्तातील वाईट कॉलेस्टेरॉल वाढण्याची शक्यता असते. या पदार्थाच्या पचनक्रियेमध्ये अधिक वेळ लागतो. तसेच या पदार्थामुळे रक्तातील साखर कमीजास्त होत राहिल्याने रक्तवाहिन्यांवर देखील त्याचे गंभीर परिणाम दिसून येतात. तसेच अधिक चीज, तेलकट पदार्थ पोटात गेल्यामुळे लठ्ठपणा वाढत जातो आणि यातूनच हृदयरोग बळावण्याचा धोका अधिक वाढतो.

पारंपरिक खाद्यपदार्थ गुणकारी

आंबविण्याच्या प्रक्रियेतून इडली तयार करण्यात आल्यामुळे यात ब जीवनसत्त्व आणि प्रथिन हे घटक मुबलक प्रमाणात असतात. बेसनापासून तयार होणारा ढोकळा उकडून घेतला जातो. ढोकळ्यात रक्तातील साखर वाढविणारे घटक कमी असल्यामुळे मधुमेहीदेखील हा ढोकळा खाऊ शकतात. तर पोहे किंवा उपमा तयार करताना त्यात शेंगदाणे, मटार या पदार्थाचा समावेश असल्यामुळे ही एक पौष्टिक न्याहरी मानली जाते.

पौष्टिक पिझ्झा पारंपरिक पद्धतीने

लहान मुलांमध्ये जंकफूड खाण्याचे वेड अधिक असल्यामुळे पिझ्झा आणि फ्रँकी हे पदार्थ घरातील पौष्टिक पदार्थाच्या साहाय्याने बनविले जाऊ शकतात. पिझ्झा बनविताना बेससाठी नाचणीची भाकरी बनवून त्यावर टॉमेटोची चटणी, भाज्या टाकल्या आणि चीज ऐवजी पनीरचा वापर केला तर हा पदार्थ पिझ्झाप्रमाणेच आनंद देणारा ठरेल. तर बाहेरील मैद्याच्या फ्रँकीऐवजी घरगुती गव्हाच्या पोळीचा वापर करून त्यात भाज्या आणि उकडलेल्या कडधान्याचा वापर केला जाऊ शकतो. बाहेरील वडापाव हा शरीराला घातक असला तरी घरच्या घरी केव्हातरी केलेला बटाटा वडा चालू शकतो. बाहेर अनेकदा एकाच तेलात अनेक बटाटे वडे तळले जातात हे तेल शरीरासाठी घातक असते. हे तेल पोटातील आतल्या त्वचेवर साचते आणि आम्लाची निर्मिती होते.

चीज बर्गर (२०० ग्रॅम)

  • उष्मांक – ४१७
  • फॅट – २१.०८ ग्रॅम
  • कबरेदके- ३५.१९ ग्रॅम
  • प्रथिने – २१ ग्रॅम
  • कॉलेस्टेरॉल – ८० मिलीग्रॅम

 

पिझ्झा (१०० ग्रॅम)

  • उष्मांक – ३२६
  • फॅट – १८ ग्रॅम
  • कबरेदके – ३० ग्रॅम
  • कॉलेस्टेरॉल – २२ मिलीग्रॅम

 

डोनट (१०० ग्रॅ)

  • उष्मांक – ४५२
  • फॅट – २५ ग्रॅम
  • प्रथिने- ४.९ ग्रॅम
  • कबरेदके – ५१ ग्रॅम
  • कॉलेस्टेरॉल – १९ मिलीग्रॅम

 

वडापाव ()

  • उष्मांक – ३००
  • फॅट – ९ ग्रॅम
  • कबरेदके-५५ ग्रॅम
  • प्रथिने – ३ ग्रॅम
  • कॉलेस्टेरॉल – ७० मिलीग्रॅम

 

चॉकलेट केक (१०० ग्रॅ)

  • उष्मांक – ३७१
  • फॅट – १६ ग्रॅम
  • प्रथिने – ५ ग्रॅम
  • कबरेदके – ५३ ग्रॅम
  • कॉलेस्टेरॉल – ५८ मिलीग्रॅम

(लेखातील माहिती आहारतज्ज्ञ डॉ. रत्नाराजे थर आणि डॉ. कांचन पटवर्धन यांनी दिली आहे.)