18 November 2017

News Flash

पिंपळपान : एरंड

बून काढलेले तेलच औषधात योग्य आहे.

वैद्य प. य. वैद्य खडीवाले | Updated: May 18, 2017 1:48 AM

 

उदंड माजला एरंड! अशी एकेकाळची म्हण नेहमीच कोणत्या तरी निमित्ताने साध्या चर्चेतही वापरली जात असे. एक काळ शहराच्या बाहेर, खेडोपाडी मोकळय़ा मैदानात, बांधावर तसेच रस्त्याच्या कडेला एरंडाची भरपूर झाडे दिसत असत. आता आपल्याकडे वाढत्या शहरीकरणामुळे मोकळय़ा जागा संपल्या आहेत. त्यामुळे ऐन बहरात आलेल्या एरंडाला लागलेले पुष्पगुच्छ व बहर आलेल्या एरंडफळाचे नेत्रसुख कसे मिळणार?

एरंडाच्या दोन जाती आहेत. एक लहान व दुसरी मोठी. लहान एरंडाची मुळे व बियांचे तेल व मोठय़ा एरंडीची पाने प्राचीन काळापासून विविध रोगांत औषध म्हणून वापरण्याचा प्रघात आहे. एककाळ एरंडीचे तेल बी उकळून किंवा बिया दाबून काढले जात असे. दाबून काढलेले तेलच औषधात योग्य आहे. कारण उकळून अधिकृतरीत्या फक्त  आधुनिक औषधे विकणाऱ्या केमिस्टकडेच मिळते. आमच्या लहानपणी मिळणाऱ्या एरंडतेलाला किंचित निळसर रंग व खूप उग्र वास असे. त्यामुळे आईवडिलांनी आमचे पोट साफ होण्याकरिता एरंडेलाची बाटली बाहेर काढली की, पोटात धस्स होत असे. ज्यांना एरंडेल घेऊन होणाऱ्या जुलाबाची भीती वाटते त्यांच्याकरिता एका पोळीच्या कणकेमध्ये एक चमचा खायचे एरंडेल तेल मोहन म्हणून वापरल्यास सुखाने पोट साफ होते. एक काळ कच्चे एरंडेल तेल इतर तेलांच्या तुलनेने खूप स्वस्त होते. त्यामुळे विविध मशिनरींकरिता इंडस्ट्रियल एरंडेल तेल म्हणून वंगणार्थ उपयोग होत असे.

एरंडेल तेल सौम्य संस्त्रन, दाहशामक, स्तन्यजनक व वाताहर आहे. संस्त्रनवर्गात बहावामगज, भेंडी, काळय़ा मनुका, उंबराची फळे, अंजीर असा अनेकांचा समावेश आहे. ज्यांचा कोठा खूप खूप जड आहे, अशांना एरंडेल तेलाशिवाय पर्याय नसतो. एककाळ आपल्या शहरात कारकुनी काम करणारी मंडळी शनिवारी रात्री किंवा रविवारी पहाटे दोन-तीन चमचे एरंडेल तेल घेऊन खात्रीने पोट साफ करून घेत. एरंडेल तेलाने आतडय़ातील श्लेष्मल त्वचेस मृदुपणा येतो व त्यामुळे मळाच्या गाठी सैल होऊन खाली निसटतात. एरंडेल तेलाचे कार्य लहान आतडय़ावर होत असते. यकृतावर त्याचा अजिबात परिणाम होत नाही. आतडय़ांत दाह किंवा इजा होत नाही. एरंडेल तेलाबरोबर आल्याचा रस हे उत्तम अनुपान आहे. अलीकडे दुर्धर आमवात विकाराने तरुणाईसुद्धा खूप खूप पिडलेली दिसते. त्यांच्याकरिता तीन भाग सुंठचूर्ण व एक भाग एरंडेल तेल असे मिo्रण सौम्य अग्नीवर परतले असता आमवातापासून नक्कीच छुटकारा मिळतो. भारतभर एरंडेल तेलावर परतलेले हिरडा चूर्ण म्हणजे गंधर्व हरितकी घेण्याची सार्वत्रिक प्रथा आहे. एरंडाची पाने खूप खूप मुलायम म्हणजे गंधर्वाच्या तळहातासारखी असतात. म्हणून या चूर्णाला गंधर्व हरितकी चूर्ण असे नाव स्वाभाविकपणे पडले आहे. ज्या कृश व्यक्तींना मलावरोधाची तक्रार आहे व वजन वाढवायचे आहे, त्यांच्याकरिता उत्तम औषध एरंडपाक आहे. ज्यांना एरंडेल तेलाचा नॉशिया आहे त्यांनी ताज्या एरंड बियांची साले काढावी. त्या बिया दुधात वाटून थोडे साखर व तूप टाकून लापशी करावी. एति एरंडपुराण!

First Published on May 18, 2017 12:16 am

Web Title: erand tree benefits of erand tree