23 January 2018

News Flash

मना पाहता! : पलीकडची हिरवळ

हिरवळीवर उभ्या असलेल्या माणसाला त्या बाजूची हिरवळ जास्त हिरवीगार दिसते.

डॉ. मनोज भाटवडेकर | Updated: July 6, 2017 12:31 AM

 

‘‘माझ्या सगळ्या मैत्रिणींची मुलं मी बघते. सगळी मुलं तशी बऱ्यापैकी शिस्तीत आहेत. आपापले अभ्यास सांभाळतात. घरात काहीतरी मदत करतात. याचं वागणं इतकं विचित्र आहे. दहावीत आल्याचं काही सोयरसुतक नाही त्याला. अभ्यास कर म्हणून सांगावं लागतं. सारखं लक्ष मोबाइलमध्ये असतं. ते झालं की कॉम्प्युटर उघडून फेसबुक चालू. सारखा अभ्यास करून करून कंटाळा येतो म्हणे. सारखा अभ्यास तो करतो कधी, हा प्रश्न पडतो मला. शाळा आणि क्लास हा दिनक्रम सगळ्याच दहावीच्या मुलांचा असतो नाही का? मी म्हटलं ना तुम्हाला, माझ्या इतर मैत्रिणींना विचारलं तर त्यांच्या मुलांचा अभ्यास झालेला असतो. त्या सगळ्याजणी त्यामुळे आनंदात आणि आरामात असतात. आमच्याकडे कायम ताणाचं वातावरण असतं.’’

‘‘आईने तुमच्याकडे माझ्या तक्रारी केल्या असतील. मला माहीत आहे. मी अभ्यास करत नाही, मोबाइलवर चॅटिंग करतो वगैरे वगैरे. मी तुम्हाला सांगतो, माझे सगळे मित्र चॅटिंग करतात. फेसबुकवर असतात. सगळ्यांनाच अभ्यासाचा कंटाळा येतो. येणारच ना.. काहीतर टाइमपास नको का? माझ्या सगळ्या मित्रांच्या आया मी बघतो. त्या एकदम कूल आहेत. त्या कुणी अशा मुलांच्या मागे लागत नाहीत. सारखं अभ्यास अभ्यास करत नाहीत. माझ्या बेस्ट फ्रेंडची आई त्याला सिनेमाला पण जाऊ  देते. दहावीचं वर्ष असूनही.. हे सगळं बघितलं ना की आणखीनच कंटाळा येतो अभ्यासाचा..’’

आई आणि मुलगा या दोघांच्याही कथनातलं समान सूत्र काय? आमच्याकडे काय ती समस्या आहे, इतर ठिकाणी सगळं आलबेल आहे. खरं म्हणजे ज्यांची मुलं दहावीत आहेत, अशा घरोघरी थोडय़ाफार फरकाने तेच चित्र दिसत असते. इतरांशी तुलना हा आपल्या एकूणच विचारप्रक्रियेचा स्थायीभाव आहे. अशा प्रकारची तुलना करण्याची वास्तविक पाहता गरज आहे का हेच मुळात तपासून पाहायला हवं.

एक मूलभूत सत्य लक्षात येतंय का? आतापर्यंतच्या मानवी इतिहासात एका व्यक्तीसारखी दुसरी व्यक्ती झालेली नाही. प्रत्येक व्यक्ती वेगळी असते. तिची आपापली बलस्थानं असतात, आपापल्या उणिवा असतात. अगदी दोन एकसारखी दिसणारी जुळी भावंडंसुद्धा वेगळी असतात. या दृष्टिकोनातून बघितलं तर दोन व्यक्तींच्या आयुष्याची तुलना करणं मूलत: निराधार आणि निर्थक आहे, तरी आपण ती करतो. तुलनेच्या मुळाशी आंतरिक स्पर्धा, ईर्षां जबाबदार आहेत. साध्या साध्या गोष्टींमध्ये ही तुलना आपल्या नकळत आपण करतो. इतरांना आपल्यापेक्षा जास्त सुख मिळत नाहीये ना ही असुरक्षितता आपण बाळगून असतो. दुसऱ्याचं दु:ख बघून कधी कधी आपल्या मनाचा एखादा कोपरा आपल्या नकळत सुखावतो हेही नाकारून चालणार नाही. ही तुलना जेव्हा जास्त तीव्र होते, तेव्हा तर बघितलेल्या आई आणि मुलासारखी गत होते. वरच्या उदाहरणातील मुलाच्या ‘बेस्ट फ्रेंड’ला विचारलं तर तो याच्या घरी कसं सगळं छान आहे आणि स्वत:च्या घरी कसं ठीक नाही हेच सांगेल कदाचित. त्याच्या आईला विचारलं तर तीही कदाचित हे सांगेल की त्याचा मित्र त्याच्यापेक्षा किती चांगला वागतो!

थोडक्यात काय, या बाजूला हिरवळीवर उभ्या असलेल्या माणसाला त्या बाजूची हिरवळ जास्त हिरवीगार दिसते. त्या बाजूला गेल्यावर कळतं की ती तितपतच हिरवी आहे! आयुष्यात आनंदी व्हायचं असेल तर प्रत्येकाने आपापल्या हिरवळीचा आनंद घ्यावा हे उत्तम. पटतंय का?

drmanoj2610@gmail.com

First Published on July 6, 2017 12:31 am

Web Title: family issue relationship children
  1. No Comments.