अनेक आजारांचे मूळ बदललेल्या आणि विस्कळीत झालेल्या जीवनशैलीत असू शकते. अशा विविध आजारांवरील उपचारांमध्ये पंचकर्म चिकित्सा उपयुक्त ठरू शकते, तसेच भविष्यात आजार उद्भवू नयेत, यासाठीही पंचकर्माचा उपयोग करून घेता येतो.

जीवनशैली बिघडते तेव्हा..

सध्याच्या गतिमान जीवनामध्ये विद्यार्थी व नोकरी वा व्यवसाय करणारी मंडळी अशा सर्वाचीच जीवनशैली अनियमित आणि विस्कळीत स्वरूपाची झाली आहे. दररोज सकाळ-संध्याकाळ दुचाकी वा चारचाकी वाहनांमधून घाईघाईने करावा लागणारा प्रवास, नोकरीमधील ‘शिफ्ट डय़ुटी’, व्यवसायासाठी करावे लागणारे मोठे प्रवास हे तर आहेच, शिवाय एकाच ठिकाणी खूप वेळ उभे राहाणे किंवा बैठे काम करणे, काम करताना केले जाणारे मलमूत्रवेगांचे धारण, जेवणाच्या अनियमित वेळा, वारंवार बाहेरचे खाणे या गोष्टीही होतात. अभ्यास आणि व्यवसाय या दोन्हीत येणारा मानसिक ताण, मनाविरुद्ध घडणाऱ्या गोष्टींशी तडजोड करावी लागल्याने निर्माण होणारा मानसिक संताप, निराशा, दु:ख हे सारे एकत्रितपणे अनेक शारीरिक व मानसिक आजारांचे कारण ठरू शकते.

आजारांना आमंत्रण असे मिळते

आयुर्वेदाने शरीर व मन अशी दोन आजार निर्माण होण्याची अधिष्ठाने सांगितली असून आजार निर्माण होताना व वाढताना त्यांचे नेहमी एकमेकांशी साहचर्य बघायला मिळते. रोजची पुरेशी चांगली झोप ही शरीराची रोज होणारी झीज भरून काढणारी असते. अनियमित जीवनशैलीमध्ये झोप विस्कळीत होते. त्यामुळे शरीराची पचनक्रिया बिघडते. सकाळी लवकर व नेमाने मलमूत्रवेग विसर्जनक्रिया हासुद्धा नित्य शरीरशुद्धीचा अत्यावश्यक भाग असतो. ही शरीरशुद्धी करण्याची स्वाभाविक शक्ती वरील सर्व कारणांनी हळूहळू मंदावते. खाल्लेले अन्न पचवण्याची शक्तीसुद्धा कमी होते. त्यामुळे शरीरात न पचलेले अन्न व त्यामुळे निर्माण होणारे वात, पित्त, कफ हे दोष शरीरात साठण्यास सुरुवात होते. शरीरातील स्थायी रसादिसप्तधातूंचे पोषण व्यवस्थित न झाल्याने रोगप्रतिकारशक्ती कमी होऊन त्याच वयामध्ये किंवा उतारवयामध्ये अनेक शारीरिक व मानसिक आजारांना निमंत्रण दिले जाते. यात प्रामुख्याने अस्थी व सांध्यांचे, श्वसनाचे, त्वचेचे आजार, अकाली वार्धक्यामुळे उद्भवणाऱ्या तक्रारी- (उदा. केस गळणे/पिकणे, वंध्यत्व/नपुंसकत्व), चयापचयक्रियेचे आजार (उदा. उच्च रक्तदाब, मधुमेह, थायरॉईड, स्थौल्य, स्त्रियांमध्ये ‘पीसीओडी’ व मासिकधर्माचे आजार, पचनविकार इ.), तसेच हृदय, वृक्क, यकृत अशा अवयवांचे असे आजार होऊ शकतात. नराश्य, चिडचिड, शोक, बुद्धिमंदता, स्मरणशक्ती कमी होणे, विषाद, धर्य व सहनशक्ती कमी होणे अशा मानसिक स्वरूपाच्या तक्रारीही जाणवू शकतात.

पंचकर्मचिकित्सा कुठे वापरता येईल?

आरोग्यरक्षणासाठी ऋतूनुसार पंचकर्मचिकित्सा सुचवण्यात आली आहे. वसंत ऋतूमध्ये (मार्च महिना) वमनकर्म हे कफदोषांसाठी (उदा. नेहमी होणारा सर्दी-खोकला, दमा इत्यादी श्वसनाचे विकार, त्वचारोग, चयापचयक्रियेचे विकार, मधुमेह, थायरॉईड, स्थौल्य) करता येऊ शकते. वर्षांऋतूमध्ये (पावसाळा) बस्ती ही वातासाठी म्हणजे अस्थी-सांध्यांचे, पचनाचे विकार, मासिक पाळी, शुक्रधातू व मलमूत्राशी संबंधित आजारांवर उपयोगी पडू शकते, तर शरद ऋतूमध्ये (आक्टोबर हीट) विरेचनकर्म हे पित्तासाठी म्हणजे त्वचारोग, आम्लपित्त, यकृत व रक्ताचे विकार यावर वापरता येते.

आजारांवरील उपचारांपासून भविष्यातील आजार टाळण्यापर्यंत

पंचकर्मचिकित्सा ही वर्तमानकाळातील आजार बरे करण्यासाठी मदत करण्याबरोबरच भविष्यकाळात आजार न होण्याकरिताही एक उपाय म्हणून सांगितली आहे. शिशिर, हेमंत ऋतूमध्ये (थंडी) अभ्यंगस्वेदन (मसाज, स्टीम) व रसायनचिकित्सा म्हणजे प्रकृती व आजारानुसार च्यवनप्राश, ब्राह्मीप्राश, अगस्तिरसायन, वसिष्ठरसायन, नारसिंहरसायन, अश्वगंधादिलेह्य़म्, अमृतप्राश, विदार्यादिलेह्य़म् इत्यादी रसायनांचे सेवन वैद्यकीय सल्ल्यानुसार करता येते.

आजारांवरील पंचकर्म ही रोगमूळनाशक चिकित्सा म्हणून बघायला मिळते. अस्थिसांध्यांच्या, अकाली वार्धक्यजन्य तसेच वातविकारांसाठी अभ्यंगस्वेदन, बस्ती चिकित्सा, स्वेदनामध्ये पत्रपोट्टली (ताजी औषधी पाने गरम करून पुरचुंडीने दिला जाणारा शेक), िपडस्वेद (वनौषधांनी शिजवलेल्या दूधभाताच्या पुरचुंडीने दिला जाणारा शेक) तसेच वनौषधांनी शिजवलेल्या दूधतुपाचे बस्ती, औषधी तेलाचे बस्ती रोग्याच्या प्रकृतीनुसार सुचवले जातात.

श्वसनाच्या, चयापचयक्रियेच्या विविध आजारांवर (उदा. उच्च रक्तदाब, मधुमेह, थायरॉईड, स्थौल्य, ‘पीसीओडी’, मासिकधर्माचे आजार, पचनाचे विकार इ.) वमन म्हणजे उलटीद्वारे कफपित्तादी दोषांना शरीराबाहेर काढणे व विरेचन म्हणजे जुलाबावाटे पित्तकफांना शरीराबाहेर काढणे हे पंचकर्मोपचार वैद्यकीय मार्गदर्शनाखाली सुचवले जातात.

आजार नसलेल्या व्यक्तींचा नित्य कामाचा शारीरिक व मानसिक ताण कमी करण्यासाठी शिरोअभ्यंग (हेड मसाज) व अभ्यंग (बॉडी मसाज) उपयुक्त ठरतो. त्यामुळे शारीरिक व मानसिक थकवा दूर होऊन रसरक्ताभिसरण चांगले सुधारते व शिर, हृदय व मूत्रसंस्था या अवयवांचे बल वाढते. त्याचप्रमाणे वैद्यकीय सल्ल्यानुसार तेलाचा मात्राबस्ती (कमी मात्रेत दिला जाणारा बस्ती) किंवा आजार व प्रकृतीनुसार भूक लागल्यानंतर निम्म्या प्रमाणात औषधी तुपाचे सेवन करणे हेसुद्धा शरीरातील सप्तधातूंचे बल वाढून व रोगप्रतिकारशक्ती वाढवून विविध आजारांपासून संरक्षण करू शकते.

vdrahulkathawate@gmail.com