News Flash

पिंपळपान : चंदन

प्रत्यक्षात चंदनाच्या झाडाच्या वरच्या लाकडाला श्रीखंण्ड व गाभ्याला पीतचंदन असे नामाभिधान आहे.

‘‘श्रीखण्डं शीतलं स्वादु तिक्तं पित्तविनाशनम्। रक्तप्रसादनं

वृष्यमन्तंदहि पहारकम्।। पित्तस्त्रविषतुइ. दाहकृमिघ्नं गुरू रक्षणम।।’’ (ध. नि.)

मी अष्टांग आयुर्वेद महाविद्यालयात शिक्षण घेत असताना अनेक श्रेष्ठ, ज्ञानी गुरूजनांच्या मार्गदर्शनाचा मला लाभ झाला. द्रव्यगुणशास्त्र शिकवणारे महर्षिनगर येथे राहणारे वैद्यराज गो. शं. तांबे हे रोज सकाळी मोठय़ा भक्तिभावाने उत्तम चंदनाचे खोड उगाळत. त्यांच्या दाट गंधाच्या गोळय़ा करून, देवपूजेत देवांना अर्पण करत. त्यानंतर त्याच गोळय़ा संध्याकाळी रुग्णमित्रांच्या उष्णता, मूत्राघात अशा विकारात देत असत.

श्रीखण्ड (संस्कृत), चंदन (बंगाली, तेलुगू, मल्याळम), श्रीगन्धदमर (कन्नड), श्रीगांध (कोंकणी), गंधतरूक (तेलुगू) अशा विविध नावांनी चंदन ओळखले जाते. प्रत्यक्षात चंदनाच्या झाडाच्या वरच्या लाकडाला श्रीखंण्ड व गाभ्याला पीतचंदन असे नामाभिधान आहे. औषधात पीतचंदन वापरतात. कारण त्यात तेल फार असते आणि तोच भाग खरोखर उपयोगी आहे. चंदनतेल म्हैसूरकडे चांगले मिळते. चंदनाचे तेल उत्तम मूत्रजनन, मूत्रनलिकेस पूतिहर व मूत्रपिंडास उत्तेजन देणारं आहे. याने मूत्रपिंडास कोणतीही इजा होत नाही. हे त्वग्दोषहर आणि कृमिघ्न आहे. पाण्यात उगाळलेले खोड, कडवट, शीतल, स्वेदजनन, दाहशामक, पिपासाहर, ग्राही, हृदयसंरक्षक आणि रक्ताभिसरणास शांतिकर आहे. याने आमाशयाची क्रिया बिघडत नाही. तेल फुप्फूसमार्गे बाहेर पडते.

जगात सर्वात उत्तम दर्जाचे चंदनाचे वृक्ष फक्त म्हैसूर भागात होतात. बंगाल व हिमालय भागात होणाऱ्या चंदनाला तुलनेने निकृष्ट समजले जाते. चंदनाच्या खोडाचे गंध, चंदन पावडर व चंदन तेल अशा प्रकारे विविध उष्णतेच्या, पित्ताच्या, मूत्रसंबंधित विकारांवर तुरंत लाभ मिळण्यासाठी यांचा वापर केला जातो. चंदन कधीही पाण्यात उकळवू नये. उत्तम दर्जाचे चंदनाचे खोड हातात घेतल्यास त्याचे वजन, घट्टपणा व शीतस्पर्श काहीसा वेगळय़ा तऱ्हेने जाणवतो. कारण त्याची घनता खूप असते. त्यावरून खरे चंदन ओळखता येते. चंदनाच्या खोडाच्या गंधाची मात्रा एकावेळेस एक मोठा चमचा व चंदनाचे तेल अंदाजे पाच ते दहा थेंब साखरपाण्यात द्यावे.

ज्यांना विविध प्रकारच्या उष्णतेच्या विकारांचा त्रास आहे, त्यांना चंदनापासून सत्वर गुण मिळतो. चंदनाच्या वापराने हृदयाची गती कमी होते आणि ज्वरासारख्या विकारात अतिशय उष्णतेपासून संरक्षण होते. ‘घ चंदन शुण्ठयंऽबु पर्पटोशीर साधितम्’ असा साधासोपा सिद्धचजलाचा उपाय, कोणत्याही प्रकारच्या ज्वराकरिता शास्त्रकारांनी सांगितला आहे. अती जोराच्या ज्वरात चंदनगंध घेतल्याबरोबर घाम सुटतो, अंगाचा दाह कमी होतो. नारळाच्या रसात चंदनाचे खोड उगाळून दिल्याने फाजील तहान थांबते.

दरुगधीयुक्त कफप्रधान विकारात चंदन दिल्यास कफातून रक्त पडणे लगेच बंद होते. रक्तासिरात चंदनाचा उत्तम उपयोग होतो. उपदंश विकारात शेवटच्या अवस्थेतही चंदनाचे तेल वापरल्यास मृत्रेंदियामध्ये हळूहळू सुधारणा होते. बाह्य़त्वचेची सूज, धावरे, लहान गळवे, घामोळे अशा पित्तप्रधान विकारात चंदनाचे खोड उगाळून; त्यात किंचित कापूर मिसळून लावल्यास रुग्णाची तगमग कमी होते. उष्णतेमुळे खरूज, नायटा, गजकर्ण झाले असल्यास चंदनाची बाह्य़ोपचारार्थ व पोटात घेण्यासाठी मदत घ्यावी. जगभर चंदनापासून बनवलेल्या ‘चंदनसव’ या औषधाची खूप चलती आहे. त्याचा उपयोग जरूर होत असावा, असे सत्य आहे. तरीपण ‘चंदनाचे आसव’ हा ‘वदतो व्याघात’ आहे असे मला वाटते. कारण बाटलीभर चंदनासवात चंदनाचे प्रमाण किती असणार? मग त्यापेक्षा चंदनखोड उगाळून त्याच गंधाच्या गोळ्या का देऊ नये? म्हणूनच मी पुण्यातील गाडीखाना या नगरपालिकेच्या दवाखान्यात एड्स रुग्णांकरिता चंदन गोळ्या दीर्घकाळ वापरल्या. हरी परशुराम औषधालयाच्या विविध औषधात चंदनाचा आवर्जून समावेश आहे. चंदनदिवटी, चंद्रकलारस, दशमूलारिष्ट, अश्वगंधपाक, धात्रीरसायन, चंदनबलालाक्षदि तेल, नस्य तेल, इरेमदाददि तेल, सुवर्णमुखी चूर्ण व चंदनगंधादि गोळय़ा यात चंदन वापरले जाते. चंदनाचे गंध आवर्जून वापरतात आणि स्वत:च्या कपाळावरही चंदनाचे गंध लावतात.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 17, 2017 12:55 am

Web Title: information on sandalwood
Next Stories
1 स्तनपान का व कसे?
2 बाल आरोग्य : गलगंड
3 पंचेद्रियांचे आरोग्य : दात आणि जिभेची स्वच्छता
Just Now!
X