गुडघेदुखीचा त्रास केवळ वृद्ध मंडळींनाच होतो असे नाही. वयाच्या ४५ वर्षांनंतर पुरुष व स्त्रिया अशा दोघांमध्ये हा आजार मोठय़ा प्रमाणात दिसतो. त्यातही रुग्णांमध्ये स्त्रियांचे प्रमाण जास्त आहे. ४५ ते ६४ या वयोगटात ३० टक्के, तर ६५ वर्षांनंतर ६८ टक्के महिलांमध्ये गुडघेदुखी आढळत असल्याचे एका पाहणीतून निदर्शनास आले आहे.
गुडघेदुखीची अनेक कारणे आहेत. ते जाणण्यासाठी गुडघ्याची रचना माहीत असणे गरजेचे आहे. चार वेगवेगळी हाडे मिळून गुडघा तयार होतो. याबरोबर मांसपेशी, ‘टेंडन्स’, ‘कार्टीलेज’ आणि ‘लिगामेन्ट्स’ यांचाही गुडघा तयार होण्यात समावेश असतो. त्यावर एक ‘सायनोवीयल सॅक’ नावाचे आवरण असते व ते एक द्रव्य तयार करते. त्याला ‘सायनोवियल फ्लुईड’ म्हणतात. गुडघ्याच्या हालचालींसाठी हे द्रव्य अत्यंत महत्त्वाचे असते. आपल्या शरीराचे संपूर्ण वजन गुडघ्यावर असते.
आजाराचे निदान
गुडघेदुखीच्या कारणाचे निदान करण्यासाठी रुग्णांकडून प्रथम दुखण्याविषयी संपूर्ण माहिती घेणे आवश्यक ठरते. रुग्ण धावत असताना कधी व किती ताण गुडघ्यावर पडला, गुडघ्याला मार लागला काय, गुडघ्यामध्ये ताठपणा जाणवतो काय, आपोआप त्रास उत्पन्न झाला की इतर कारणाने त्रास सुरू झाला हे लक्षात घेतले जाते. रुग्णाच्या रक्ताच्या तपासणीद्वारे दुखण्याचे कारण शोधता येते. शिवाय ‘क्ष-किरण’ तपासणीद्वारे रुग्णाचे हाड मोडले असेल किंवा हाडांची झीज झाली असल्यास ते कळते. ‘क्ष- किरण’ तपासणी केल्यानंतरही शंका उरली तर ‘एमआरआय’ तपासणी करता येते. यात हाडांबरोबर लिगामेन्ट, कार्टीलेज, टेंडन यांच्या संबंधित आजार असेल तर तेही कळू शकते.
औषधोपचार
सर्वसाधारणपणे रुग्णांना प्रथम दुखणे कमी करण्याच्या (पेनकिलर) गोळ्या दिल्या जातात. सोबत गुडघ्याला बर्फाने शेकण्यास सांगितले जाऊ शकते. रुग्णाच्या गुडघ्यात संसर्ग असेल तर प्रतिजैविके दिली जातात. प्रसंगी गुडघ्यातील जखम भरुन येण्यासाठी ‘क’ व ‘ब’ जीवनसत्त्वाचीही मदत घेतली जाते. वयस्क पुरुषांना गुडघेदुखीचा त्रास असल्यास तसेच मासिक पाळी थांबल्यानंतर स्त्रियांनी कॅल्शियमच्या गोळ्यांचे सेवन केल्यास त्यांना लाभ होतो. परंतु कोणत्याही गोळ्या घेण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे. हाड खराब झाल्यास शस्त्रक्रियेद्वारे कृत्रिम गुडघा बसवण्याचा पर्याय देखील असतो.
गुडघेदुखी कशी टाळता येईल
गुडघेदुखीची सगळीच कारणे टाळता येत नाही. पण नियमित व्यायाम, योगासने, लठ्ठपणा कमी करणे, हिरव्या भाज्या व फळांचा समावेश असलेला संतुलित आहार यामुळे काही प्रमाणात संधीवातापासून तसेच दुखण्यापासून दूर राहता येणे शक्य आहे.
गुडघेदुखीची कारणे
* गुडघ्यावर ताण पडणे किंवा मार लागणे
* हाड मोडणे
* लिगामेंट, कार्टीलेज, सायनोवियल सॅकशी संबंधित आजार
* क्षयरोग वा त्यासदृश्य आजाराचा गुडघ्यामध्ये झालेला संसर्ग
* वातसदृश्य आजार
(शब्दांकन – महेश बोकडे)

Yoga for a healthy liver: Here are 3 asanas that work
यकृत निरोगी ठेवण्यासाठी ‘ही’ योगासने फायदेशीर; जाणून घ्या करण्याची सोपी पद्धत
upsc exam preparation tips in marathi
UPSC ची तयारी : पर्यावरण पारिस्थितिकी, जैवविविधता
printed receipts toxic body experts stop you must not touch those printed receipts heres why
खरेदीनंतर मिळणाऱ्या पावतीला स्पर्श करणे आरोग्यासाठी ठरतेय घातक? डॉक्टर काय सांगतात? वाचा
Vote From Home Eligibility and Procedure for Lok Sabha Election 2024 in Marathi
Vote From Home: घरबसल्या मतदान करण्यासाठी कोण पात्र? त्यासाठीचा फॉर्म 12D नेमका कसा भरायचा? जाणून घ्या