17 December 2017

News Flash

जीवनशैलीजन्य आजारांचा विळखा मध्यमवर्गालाही!

या जीवनशैलीजन्य आजारांमुळे देशाचे अतोनात आर्थिक नुकसान होते, जे टाळणे शक्य आहे.

वैद्य अश्विन सावंत | Updated: June 15, 2017 12:53 AM

अमेरिका, ब्रिटन यांसारखे विकसित देश मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, कर्करोग अशा जीवनशैलीजन्य आजारांचा सामना करत आहेत, तर सोमालिया-टांझानिया यांसारखे अविकसित देश संसर्गजन्य क्षय (टीबी), एड्स, मलेरिया अशा आजारांशी लढत आहेत. मात्र आपला भारत हा जगातला एक असा देश आहे, जो संसर्गजन्य आणि असंसर्गजन्य अशा दुहेरी आजारांच्या कचाटय़ात सापडला आहे.

स्वाइन फ्लू वा बर्ड फ्लू यांसारख्या संसर्गजन्य आजारांमुळे होणारे मृत्यू तुलनेने कमी असले तरी वृत्तपत्रांमध्ये या मृत्यूंविषयी छापून येते, चर्चा होते, त्याचा गाजावाजा होतो. मात्र जीवनशैलीजन्य आजारामुळे लाखो नव्हे कोटय़वधी लोक ग्रस्त असताना त्याकडे म्हणाव्या तितक्या गंभीरतेने पाहिले जात नाही. हे जीवनशैलीजन्य आजारांनी घातलेल्या भीषण विळख्याची समाजाला अजूनही तितकीशी कल्पना आलेली नाही, याचे द्योतक आहे.

जीवनशैलीजन्य आजारांबाबत चित्र असे आहे की, समाजाच्या सर्वात वरच्या स्तरामधील लोकांनी आपल्या आहारामध्ये, जीवनशैलीमध्ये बदल करून या आजारांपासून हळूहळू दूर जाण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे यापुढे मध्यमवर्गामधील आणि निम्नस्तरामधील लोकांनाच जीवनशैलीजन्य आजार, हृदयरोग यांसारखे लोक त्रस्त करतील, नव्हे तशी सुरुवात झालीच आहे. ज्यामुळे भारतामधील संसर्गजन्य व इतर आजारांमुळे होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण १५ टक्क्यांनी कमी झालेले असताना जीवनशैलीजन्य आजारांमुळे होणाऱ्या मृत्यूंमध्ये १८ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

या जीवनशैलीजन्य आजारांमुळे देशाचे अतोनात आर्थिक नुकसान होते, जे टाळणे शक्य आहे. मात्र आजारांना प्रतिबंध करणे तर सोडा, उलटपक्षी मधुमेह, हृदयरोग यांसारख्या आजारांचे प्रमाण भयावहरीत्या वाढत चालले आहे. आज भारतामध्ये होणाऱ्या एकूण मृत्यूंपैकी ५३ टक्के मृत्यू हे जीवनशैलीजन्य आजारांमुळे होतात. चार भारतीयांपैकी निदान एक जण हृदयरोग, मधुमेह, लकवा व कर्करोग या जीवनशैलीजन्य आजारांमुळे मृत्युमुखी पडतो.

जीवनशैलीजन्य आजार : शहरी?

भारतामध्ये अजून तरी शहरी लोकांच्या तुलनेमध्ये गावामधील लोकांना जीवनशैलीजन्य आजार होण्याचे प्रमाण एक चतुर्थाशाने कमी आहे, जे औद्योगिकीकरण व परिणामस्वरूप ताणाच्या जीवनशैलीमुळे जीवनशैलीजन्य आजार बळावतात, हे सिद्ध करते. दुर्दैवाने मुंबईसारख्या महानगरांमधील लोकांचे अनुकरण मोठी शहरे करतात. मोठय़ा शहरांमागून लहान शहरे जातात आणि लहान शहरांच्या पावलावर पाऊल टाकतात गावाकडील मंडळी.. अशा क्रमाने त्या गावाचा विकास होवो वा न होवो, तिथे औद्योगिकीकरण होवो वा न होवो, पण संपूर्ण समाज हळूहळू शहरी जीवनशैली अनुसरतो, मग त्याची गरज असो वा नसो, जे भारतामध्ये वेगाने घडत आहे. त्यामुळेच तर मागील काही वर्षांमध्ये शहरांबरोबरच लहान शहरांमधील आणि गावांमधील समाजातील निम्नस्तरातील समाजही जीवनशैलीजन्य आजारांना बळी पडू लागला आहे.

जीवनशैलीजन्य आजार श्रीमंतांना?

आयुर्वेदाने मधुमेह हा श्रीमंतांना होणारा रोग आहे, असे म्हटले आहे. त्यामुळे तो श्रीमंतांनाच होतो, हा समज आपल्याकडे दीर्घकाळापासून दृढ होता. केवळ मधुमेहच नव्हे तर हृदयरोग, उच्च रक्तदाब हे आजारही श्रीमंतांनाच होतात, असे आपण समजत आलो आहोत, निदान १९व्या, २०व्या शतकापर्यंत तरी! मात्र २०व्या शतकाच्या अंतिम दशकामध्ये आपल्या समाजाची अशी काही प्रगती होत गेली, आहारविहाराची स्थिती अशी काही बदलत गेली, जीवनशैलीने असे काही वळण घेतले की, आज २१व्या शतकात हे जीवनशैलीजन्य आजार गरीब-श्रीमंत असा भेद करताना दिसत नाहीत. त्या परिणामी मागील तीन-चार दशकांमध्ये जीवनशैलीजन्य आजारांनी जवळजवळ प्रत्येक घरामध्ये ठाण मांडले आहे.

असं का घडले?

जीवनशैलीजन्य आजार हे श्रीमंतांचे आजार आहेत, कारण त्यांची कारणे आपल्याला लागू होत नाहीत, असे जे आपल्याला वाटत होते, तीच या आजारांना आमंत्रण देणारी कारणे आज मध्यमवर्गीयांबरोबरच गरिबांनाही लागू होऊ  लागली आहेत, किंबहुना आज चित्र असे आहे की, हळूहळू श्रीमंत प्रयत्नपूर्वक मधुमेहाच्या त्या कारणांपासून दूर जाऊ  लागले आहेत आणि मध्यमवर्गीय व गरीब मात्र त्या कारणांना कवटाळत आहेत. या कारणांमुळे आज तुमच्या कुटुंबांतही हृदयरोग, उच्च रक्तदाब वा मधुमेहाने ग्रस्त एक तरी व्यक्ती असेल.

जीवनशैलीजन्य आजार निम्नवर्गीयांमध्ये जास्त का?

२१व्या शतकामध्ये भारतीय समाजातील निम्नस्तरातील लोकांमध्ये जीवनशैलीजन्य रोगांचे प्रमाण वाढत चालले आहे. इतकेच नव्हे तर जीवनशैलीजन्य आजार लकवा मारणे, हृदयविकार होणे, मूत्रपिंड निकामी होणे, डोळे अधू होणे आदी जीवनास घातक विकृतीचे प्रमाण त्यांच्यामध्ये वाढत चालले आहे. त्यामागची कारणे कळली तर त्यांचा प्रतिबंधही करता येईल.

 • शरीरक्रिया व शरीररचनेने अज्ञान
 • आपल्या आरोग्याविषयी अनास्था
 • योग्य व्यायामाचा अभाव
 • शरीरमेहनतीला पूरक-पोषक आहाराचा अभाव, ज्यामुळे शरीराची होणारी झीज.
 • शरीराला पोषक फळे न खाण्याची सवय किंवा इच्छा असली तरी फळे न परवडणे
 • जीवनसत्त्वे, खनिजे व चोथा पुरवणाऱ्या आरोग्यदायी भाज्यांचे अल्पसेवन (वरील कारणांमुळे व वेळेअभावीसुद्धा)
 • जेवण शिजवण्यासाठी अयोग्य खाद्यतेलाचा वापर
 • रोजच्या कष्टमय-व्यग्र दिनचर्येमध्ये बाहेरचे अन्नपदार्थ खाण्याकडे कल
 • दिवसभरातून काही ना काही कारणाने चार ते पाच वेळा चहापान व नकळत साखरेचे अतिसेवन
 • शिळ्या अन्नपदार्थाचे नित्यसेवन
 • सहज उपलब्ध व स्वस्त अशा बेकरीच्या पदार्थाचे नित्यसेवन
 • एकंदरच रिफाइन्ड कबरेदकांचे व अयोग्य चरबीचे अतिसेवन
 • तंबाखू, गुटखा, सिगरेट, विडी, पानतंबाखू, हुक्का, मशेरी अशा वेगवेगळ्या स्वरूपांमध्ये तंबाखूचे सेवन, जे या समाजामधील कर्करोगाचे मुख्य कारण आहे.
 • मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग या जीवनशैलीजन्य रोगांमध्ये स्थूलत्व हा घातक (आमंत्रक) घटक समजला जातो. स्थूलत्व व जीवनशैलीजन्य आजारांचा एवढा अन्योन्यसंबंध आहे, की एकूण रुग्णांपैकी ८० ते ८५ टक्के रुग्ण हे स्थूल असतात. मध्यम व निम्न स्तरातील समाजामध्ये स्थौल्याचे प्रमाण खूप वाढले आहे.
 • आजार झाला तरी हेळसांड करण्याची वृत्ती
 • जीवनशैलीजन्य आजार झाल्याचे कळले तरी अज्ञानामुळे थातूरमातूर-अयोग्य उपचार घेणे
 • डॉक्टरांनी सुचवलेली औषधे पैशाअभावी खरेदी करू न शकणे.
 • औषध-उपचार अर्धवट सोडून देणे.
 • आजार झाल्यावर औषधांना व्यायाम व योग्य आहाराची जोड न देणे.

drashwin15@yahoo.com

First Published on June 15, 2017 12:53 am

Web Title: lifestyle diseases to middle class people