|| डॉ. अद्वैत पाध्ये

सविताताई आज पुन्हा माझ्याकडे सल्ला मागायला आल्या होत्या. त्यांना काही सुचत नव्हते, कसे बोलायचे ते कळत नव्हते. शब्दच फुटत नव्हते तोंडातून. चेहरा अगदी दुर्मुखलेला दिसत होता, खांदे झुकलेले, डोळ्याभोवती काळी वर्तुळे. काही महिन्यांपूर्वीच त्या माझ्याकडे आल्या. निराश वाटत होते. झोप येत नव्हती. भूक लागत नव्हती. सतत मनात नकारात्मक विचार यायचे. काही सुचायचे नाही. आपण कमी महत्त्वाचे आहोत, असा न्यूनगंड मनात असायचा. त्यावेळेस त्यांना औषधे चालू केली, समुपदेशन सुरू केले होते. सीबीटीच्या साहाय्याने त्यांना खूप बरे वाटले. खूप काळ त्या व्यवस्थित होत्या. त्यामुळे औषधे व समुपदेशन हळूहळू थांबवण्यात आले होते.

त्यानंतर आता त्या माझ्याकडे आल्या होत्या. परत का तर त्या नैराश्यात गेल्या होत्या. याचा विचार करणे गरजेचे होते. खूप व्यवस्थित पुन्हा एकदा त्यांच्याशी बोललो, त्यांनी पण थोडे शांत वाटल्यावर सर्व काही सांगितले. मागच्या वेळेस त्यांना बरं वाटण्याच्या काळातच काही काळासाठी नोकरीच्या निमित्ताने दुसऱ्या ठिकाणी त्यांचे पती राहाण्यास गेले होते. त्या वेळी घरात फक्त त्या व मुले होती. आणि त्या नंतर तो मधला काळ तिकडेच असायचा. पण परत बदली झाल्यामुळे आता तो पुन्हा घरी राहण्यास आला होता आणि तिथून पुन्हा सविताताई नैराश्याकडे झुकू लागल्या होत्या. त्यांच्या पतीचा स्वभाव अतिशय कडक, व्यवस्थितपणा, वक्तशीरपणा, हेकेखोरपणा असायचा. वर्चस्व गाजवणारा स्वभाव होता, तर सविताताईंचा स्वभाव अतिशय शांत पण भित्रट, त्यातल्या त्यात सर्वाना मिळून घेणारा, पतीशी पडतं घेणारा होता. आधी बराच काळ त्या नोकरी करत होत्या. त्यामुळे सततचा संपर्क कमी असायचा, पण नंतर नोकरी सोडून त्या घरी बसल्या, त्यामुळे सतत घरी असल्यामुळे पतीचा हट्ट अट्टहासात रूपांतरीत झाला होता. म्हणूनच त्या नैराश्यात गेल्या होत्या. आणि नंतर नोकरीनिमित्ताने बदली झाल्यामुळे पती दूर गेल्यामुळे त्या लवकर बऱ्या झाल्या. पती पुन्हा परत आल्यामुळे त्या पुन्हा नैराश्यात गेल्या होत्या. थोडक्यात घरातील आंतरव्यक्तिसंबंध त्यांना पुन्हा नैराश्यात जायला कारणीभूत होते. काही प्रमाणात त्यासाठी दोघांचे स्वभावदोष त्याला कारणीभूत होते.

अशा प्रकारच्या आंतरव्यक्तीसंबंधावर काम करणारे आद्य संशोधक मानसतज्ज्ञ हॅरी सुलिवान यांनी सर्वप्रथम विचार केला होता. सिग्मंड फ्रॉइडच्या मनोविश्लेषणाच्या सिद्धांतापेक्षा वेगळा सिद्धांत त्यांनी मांडला होता. त्यांच्या मते मानव हा समाजप्रिय आहे, ते सर्व एकमेकांशी असलेल्या संबधांमुळे आहे. माणसासाठी दोन मूळ गोष्टी आहेत, एक म्हणजे समाधान जे अन्न, आपुलकीचे घर, लैंगिक संबंधातून मिळते आणि दुसरी सुरक्षितता, जी आत्मसन्मान, आत्मविश्वास, मिळून-मिसळून राहाण्याची क्षमता, संवादक्षमता यांमुळे येते कुटुंबातून व्यक्ती फक्त भाषा व संस्कृती शिकत नाहीत. स्वप्न व वास्तव यातील फरक, स्वत:चा आत्मसन्मान, समायोजन शिकत असतात.

यावर आणखी काही मानसशास्त्रज्ञ कॅरेन हॉर्नी, डोनॉल्ड केस्लर यांनी विचार करून मानसोपचाराच्या पद्धती ठरवल्या. त्यातून आंतरव्यक्ती संबंधांवर काम करणारी त्या व्यक्तींना त्याविषयी अधिक प्रबोधन करून, जाणीव जागृत करून बदल घडवण्यास प्रवृत्त करणारी मानसोपचार पद्धत त्यांनी अवलंबायला सुरुवात केली.

त्यात आणखी बदल जेराल्ड क्लेरामम यांनी केले आणि कालबद्ध मानसोपचार पद्धती तयार केली. त्यामध्ये त्या मनोविकारांच्या कारणाचा ऊवापोह करण्याऐवजी तो विकार बळावण्यास किंवा परत परत होण्यास कारणीभूत ठरणाऱ्या सामाजिक कौटुंबिक आंतरव्यक्ती संबंधावर आणि ते सुधारण्यावर भर दिला गेला. त्यामध्ये त्यांनी तीन पायऱ्या सांगितल्या आहेत.

पहिल्या पायरीवर पाच सत्रे घेतली जातात. ज्यात त्या मनोविकारा संदर्भातील पूर्ण माहिती जाणून घेणे, मानसोपचाराची पद्धती आणि त्यामागचे कारण रुग्णाला व्यवस्थित समजावून सांगणे, आंतरव्यक्ती संबंधातील प्रश्नावली देऊन आताच्या संदर्भात आंतरव्यक्ती संबंधातील अभ्यास करणे, भूतकाळातील नातेसंबंधाची माहिती घेऊन अभ्यास करणे आणि त्याप्रमाणे पुढील पद्धत ठरवणे, असे काम केले जाते.

पुढच्या पायरीवर सहा ते काही वेळा पंधरा सत्रे घेता येतात. अभ्यासाअंतर्गत जी समस्या आढळून आली आहे. आंतरव्यक्ती संबंधांबाबत  धोरण ठरवले जाते आणि ती सोडवण्याची ध्येये निश्चित केली जातात. मनोविकाराची लक्षणे आणि आंतरव्यक्तीसंबंधातील घटना यांचे नाते उलगडवून सांगणे आणि ते सुधारण्यासाठी त्यावर काम करणे अशी ध्येये असतात. त्यांचे स्वभावदोष बऱ्याचदा या ठिकाणी जबाबदार असू शकतात, मग ते दोष कमी करण्यासाठी कसे बदल करायचे ते त्यांना प्रत्येक सत्रात सांगितले जाते, त्याप्रमाणे त्यांनी काम करून फरक दिसायला लागल्यावर मग पुढच्या पायरीवर जाता येते.

त्या पुढील पायरीवर चार सत्रे असतात (एकूण तीन पायऱ्यांवर २० सत्रे ) त्यात समुपदेशन आता संपत आले हे सांगितले जाते. प्रत्येकाला त्यांच्या भावना आणि परस्परांच्या भावना ओळखणे आणि आधीच्या पायरीवर घेतलेल्या सत्रांची उजळणी करणे आणि भविष्यात होऊ  शकणाऱ्या समस्यांना ओळखणे आणि त्यावरचे उपाय असे सर्व सांगून सत्रे संपवतात शेवटी समुपदेशकांच्या बरोबरीने रुग्ण व नातेवाईक यांनी आपणहून मेहनत घेतली तर बरेच काही सकारात्मक बदल होऊ  शकतात.

जसे सविताताईच्या बाबतीत त्यांच्या आणि पतीच्या आंतरव्यक्तीसंबंधावर काम करणे, त्यांच्या स्वभाव दोषांवर जे विकार बळावायला कारण ठरणार होते त्यावर काम केले आणि त्या दोघांनी ते मनापासून आत्मसात केले. त्या दोघांनी ते मनापासून आत्मसात केले तर खूप फरक पडणार होता.

स्वभावाला औषध आहे

फक्त ते रोज घ्यायचं असतं

अधीरातला ‘अ’ सोडून

थोडं धीराने घ्यायचं असतं

मनातला हट्ट सोडून

नातं घट्ट करायचं असतं

Adwaitpadhye1972@gmail.com