25 April 2019

News Flash

शुभास्थे पंथान: संतु।

‘‘डॉक्टर, काय झालंय हो माझ्या मुलाला हे? मला तर समजतच नाही आहे. का असा वागतोय हा?’’

|| डॉ. अद्वैत पाध्ये

‘‘डॉक्टर, काय झालंय हो माझ्या मुलाला हे? मला तर समजतच नाही आहे. का असा वागतोय हा?’’

२२ वर्षांचा अरुण गेल्या दोन वर्षांपासून विचित्रच वागत होता. सुरुवातीला तो महाविद्यालयात जाणे टाळू लागला. एकटा एकटाच राहू लागला. अभ्यासात त्याचे लक्ष लागेना. जास्त कोणाशी काही बोलायचा नाही. मग हळूहळू त्याची झोप कमी झाली. नीट झोपायचाच नाही. किती तरी वेळ जागाच असायचा. मग कधी तरी उशिरा झोप लागायची. उशिरा उठायचा. हळूहळू तो खिडक्या बंद ठेवू लागला. स्वत:शी पुटपुटणे सुरू झाले, बडबडणे सुरू झाले. अचानक चिडायचा, शिव्या घालायचा. जेवणात लक्ष नसायचे. अस्वस्थपणे फेऱ्या घालायचा, टीव्हीही पाहू द्यायचा नाही. त्याच्याविषयी टीव्हीत सर्व सांगत आहेत, त्याला मारायला पाठवत आहेत, घरात सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत, असं म्हणून कोणाला घरात घ्यायला नकार द्यायचा. घरातल्या कोणाला घराबाहेर पाठवायचा नाही. असं होऊ  लागल्यावर मग घरच्यांना काही सुचेना. भूतबाधा झाली आहे, असे वाटल्याने सहा महिने ते या त्या भगताकडे ने, दग्र्यावर ने, हा विधी कर, तो विधी कर असं करत होते. लाखो रुपये खर्च करूनही उपयोग झाला नाही, तेव्हा शेवटी ते डॉक्टरांकडे आले होते.

स्किझोफ्रेनियाच्या रुग्णांची ही एक प्रातिनिधिक गोष्ट! यात अनेक वेगवेगळे बदल घडतात, अनेक वेगळी लक्षणे दिसतात. कोणी हिंसक होतं, तर कोणी अन्नपाणी सोडून बसतं, कोणी बराच काळ शांत असल्याने आणि त्रासदायक वर्तन नसल्याने आजार आहे किंवा काही विचित्र प्रकार आहे/विकार आहे हे लक्षातच येत नाही, त्यामुळे कुठे नेलंही जात नाही. (अगदी बाबा-भगताकडेही!) त्यात रुग्णाला स्वत:ला आपण काही विचित्र वागतोय हे कळतच नसते. त्यामुळे उपचार घेण्यासाठी तो तयार नसतोच!  म्हणजे घरच्यांचा हा आजार आहे हे ‘स्वीकार’ करायला वेळ तर लागतोच, त्यात रुग्णाला तयार करणे, तो हट्टी, दुराग्रही, संशयी असेल तर आणखीच वेळ लागतो. या सर्वामुळे  उपचार सुरू व्हायलाच वेळ लागतो! बऱ्याचदा असा उशीर झाल्यामुळे आजार जटिल झालेला असतो. त्यामुळे बराच काळ उपचार घ्यावे लागतात. बऱ्याचदा थोडं बरं झालं की किंवा अनाहूत सल्ला देणाऱ्यांनी ‘औषधांची सवय लागेल, दुष्परिणाम होतील’ अशी भीती घातल्याने उपचार मध्येच थांबवले जातात, त्यामुळे आजार काही काळाने पुन्हा बळावतो. पुन्हा पहिल्यापासुन सुरुवात करावी लागते. या विकारामुळे व्यक्तीची कार्यक्षमता किंवा काम करण्याची वृत्ती कमी होते. कोणाचे शिक्षण पूर्ण होत नाही, कोणी नोकरी नीट करू शकत नाही. यामुळे कुटुंबावर आर्थिक भार पडतो. या सर्वाचा परिणाम- विकाराचा, विकाराच्या लक्षणांचा, रुग्णाच्या वागण्याचा- सर्व कुटुंबावरच होत असतो.

काही वेळा पालकांपैकी एक जण सकारात्मक स्वीकार करतो. एक जण आतून तरी कुढतो किंवा बाहेर चिडचिड दाखवतो किंवा पूर्ण दुर्लक्षच करतो किंवा परिस्थितीला दोष देत राहतो. कोणाला वाटते या जगात फक्त आपल्याच घरात ही समस्या आहे. त्यामुळे वरून आनंदी, पण आतून दु:खी राहतात. कोणी रुग्णाला अति जपतो, तर कोणी दुर्लक्ष करतो, तर कोणी हेटाळणी, सतत निंदा करत राहतो. नातेवाईकांचे घरी येणे-जाणे कमी होते. यांचे बाहेर जाणे कमी होते किंवा केले जाते. असा हा ताण सतत हाताळायचा असल्याने वा त्याचा सामना करायचा असल्याने बऱ्याचशा व्यक्ती विविध मनोकायिक विकारांना बळी पडलेल्या आढळतात किंवा मुळात असेल त्यांचे ते विकार बळावतात. तरुण वयात होणारा हा विकार आहे. त्यामुळे लग्न ही फार मोठी समस्या होते. सर्व सांगून करावे तर लग्न होत नाही किंवा कोणी स्वीकारत नाही किंवा फार वाट पाहावी लागते. न सांगता करावे तर घटस्फोट, फसवणूक या कायदेशीर लढाया लढाव्या लागतात. लग्न करायलाच पाहिजे, आमच्यामागे कोणी तरी बघायलाच पाहिजे, असा अनेकांचा अट्टहास असतो. त्यातूनही बरेच ताण तयार होतात. आमच्यानंतर यांना कोण बघणार? ही समस्या विशेषत: ज्येष्ठ नागरिक झालेल्या मनोविकारांनी त्रस्त व्यक्तींना सतावत असते. या सर्व समजुती-गैरसमजुती दूर करण्यासाठी या संबंधित व्यक्तीचे आणि त्यांच्या पालकांचे समुपदेशन फार महत्त्वाचे असते. वैयक्तिक पातळीवरील समुपदेशनाचा त्यांच्या वैयक्तिक समस्या, हाताळणी याबाबत फायदा होतो. स्वीकार करण्यापासून ते योग्य हाताळणी करण्यासाठी ते महत्त्वाचे असते. स्वमदत गटही महत्त्वाची भूमिका बजावतो. आपल्यासारखेच अनेक आहेत, आपल्यासारख्या समस्या त्यांनी कशा हाताळल्या असे सर्व मार्गदर्शन संवादांमधून मिळते. तसेच त्यांच्या तणाव व्यवस्थापनासाठी त्यांना विविध उपाय करता येतात. असे सर्व व्यवस्थित समुपदेशन करून आणि त्याचा योग्य लाभ घेऊन ‘शुभास्थे पंथा’ला लागणारे शुभंकर या कुटुंब समुपदेशनातून घडवता येतात!

Adwaitpadhye1972@gmail.com

First Published on July 24, 2018 12:36 am

Web Title: schizophrenia