नवजात बाळांना जन्मानंतर दवाखान्यातून घरी नेले की त्यांची काळजी नेमकी कशी घ्यावी हा मोठाच प्रश्न नव्या आई-बाबांना पडतो. बाळाला दूध कधी द्यावे इथपासून त्याला काही दुखते-खुपते आहे हे कसे ओळखावे इथपर्यंतचे सर्वच प्रश्न त्यांच्यासमोर असतात. ‘आबालवृद्ध’च्या मागील भागांमध्ये आपण ‘प्रीमॅच्युअर’ जन्मलेल्या बाळांच्या काळजीविषयी पाहिले आहे. आता व्यवस्थित नऊ महिन्यांनी- ‘फुल टर्म बेबी’ म्हणून जन्मलेल्या बाळांच्या काळजीविषयीच्या काही टिप्स बघू.

* बाळांना योग्य तापमानात ठेवणे आवश्यक असते. सध्या थंडीचे दिवस आहेत. त्यामुळे नवजात बाळांना दुपटय़ात नीट गुंडाळून उबदार ठेवणे गरजेचे. डोक्यावर टोपी आणि पायात मोजे घालणेही तितकेच आवश्यक. खोलीत हीटर लावला असेल तर त्याचा गरम हवेचा झोत थेट बाळाच्या अंगावर जाईल असा ठेवू नये.

Mumbai, Two arrested,
मुंबई : वृद्धाचे सोने लुटणाऱ्या दोघांना अटक
Two houses destroyed, cylinder explosion,
देव तारी त्याला कोण मारी… सिलिंडरच्या स्फोटात दोन घर खाक, तान्हुले बाळ बचावले
byju s starts paying salary of march
‘बैजूज’च्या कर्मचाऱ्यांचे मार्च महिन्याचे वेतन मार्गी
Bail
अयोग्य स्पर्श केल्याने महिलेकडून एकाची हत्या; तीन वर्षांचा कारावास भोगल्यानंतर कोर्ट म्हणतं, “स्वसंरक्षणार्थ…”

* मातेचे दूध हाच बाळांसाठी परिपूर्ण आहार आहे. त्यामुळे बाळाला ते व्यवस्थित मिळू शकत असेल तर इतर कशाचीही- अगदी पाणी प्यायला देण्याचीही गरज भासत नाही. ‘प्रीमॅच्युअर’ बाळांना भूक लागल्याचे कळत नाही, ती जास्त वेळ झोपेत (ग्लानीत) असतात. त्यामुळे त्यांना डॉक्टरांनी सांगितल्यानुसार वेळा ठरवून दूध पाजायला हवे. ‘फुल टर्म’ बाळांचे तसे नसते. ती रडून, हालचाल करून भूक लागल्याचे सांगतात. त्यामुळे अशा प्रकारे बाळांना ते मागेल तेव्हा दूध पाजणे योग्य. गाई-म्हशीचे दूध अगदी नवजात बाळांना देऊच नये. या दुधात खनिजांचे प्रमाण अधिक असल्यामुळे बाळांच्या मूत्रपिंडावर ताण येतो, शिवाय त्यांच्या हाडांची वाढ योग्य होत नाही. गाई-म्हशीचे दूध पाजल्यास त्यातील तुलनेने जड असलेल्या प्रथिनांमुळे नवजात बाळांना शौचावाटे थोडे-थोडे रक्त जाऊन अ‍ॅनिमिया होऊ शकतो. काही जण बाळांना मध चाटवतात, पण तेही टाळलेलेच बरे. नवजात बाळांना पहिले सहा महिने केवळ आईचे दूधच द्यावे.

* बाळ सहा महिन्यांचे झाल्यानंतर आपल्याकडे त्यांना दुधात बिस्किट बुडवून देण्यास सुरुवात केली जाते. पण ते चांगले नाही. बिस्किटात पोषण काहीही नाही. सारखे दूध-बिस्किट खाऊन बाळांना बद्धकोष्ठ होण्याचीच शक्यता अधिक असते. त्याऐवजी बाळांना वरण-भात, भाताची पेज, मऊ खिचडी, वेगवेगळी सूप, फळे असे पदार्थ हळूहळू सुरू करावेत. परदेशात गाई-म्हशीचे दूध बाळांना ती एक वर्षांची झाल्यानंतरच देतात. साधारणत: बाळ ९ महिन्यांचे झाली की नंतरच असे वरचे दूध देऊन चालेल.

* काही लहान बाळांना पूरक म्हणून ‘ड’ डीवनसत्त्व व लोहाचे ड्रॉप्स दिले जातात. त्याबद्दल आपल्या डॉक्टरांशी जरूर बोलून घ्यावे.

* बाळांची रोगप्रतिकारशक्ती कमी असते. त्यांना कोणतेही संसर्ग लगेच होऊ शकतात. त्यामुळे बाळांना हात लावण्यापूर्वी हात स्वच्छ धुतलेले चांगले. सतत आणि खूप मंडळींनी बाळांना हाताळणे टाळावे. ज्यांना सर्दी-खोकला आहे त्यांनी बाळांना हाताळताना काळजी घ्यावी, प्रसंगी मास्क वापरावा.

* नवजात बाळांची नाळ सातव्या ते दहाव्या दिवशी आपोआप नैसर्गिकरीत्या गळून जाते. त्यामुळे नाळ लवकर पडून जावी म्हणून त्याला पावडर, माती वा शेण अशा गोष्टी लावणे अतिशय चुकीचे. बाळाला आंघोळ घालताना नाळेची जागाही स्वच्छ करणे व ती कोरडी ठेवणे हे योग्य.

* आपल्याकडे पूर्वीपासून बाळांना तेलाने मसाज करतात. त्याचा बाळांच्या वाढीसाठी फायदाच होतो. मसाजसाठी खोबरे, ऑलिव्ह किंवा सूर्यफूल तेल चांगले. पण तेल लावताना बाळांच्या कानात तेल घालू नये. त्यामुळे कानात अधिक धूळ जमा होऊन संसर्गाची शक्यता असते. बाळाची टाळू भरणे हा प्रकारही टाळावा. बाळाची टाळू ही बाळ दीड वर्षांचे होण्याच्या सुमारास आपोआप भरला जातो. त्यापूर्वी डोक्याची हाडे मेंदूला वाढण्यासाठी जागा करून देत असतात आणि त्यामुळे टाळू भरलेला नसतो. बाळांच्या डोक्याला उगाच जास्त तेल लावले तर डोक्यावर कोंडा व बुरशीचा संसर्ग होऊ शकतो. बाळाच्या नाकातही तेल टाकू नये. रोज २-३ थेंब नाकात टाकलेल्या बाळांना २-३ आठवडय़ांनी ते नाकातून आत गेलेले तेल फुप्फुसात ओढले जाऊन (‘ऑईल अ‍ॅस्पिरेशन’ होऊन) न्यूमोनिया होऊ शकतो.

* बाळांना रोज कोमट पाण्याने आंघोळ घालावी. आंघोळीच्या वेळी एरवीच्या साबणाऐवजी बेबी सोपचा वापर करावा. आंघोळ फार वेळ लाबवू नये. कमी साबण वापरून लवकर आंघोळ उरकावी.

* नवजात बाळांना डायपर घालावे की नको, याबद्दल वेगवेगळी मते असतात. बाळांसाठी लंगोट वापरले तर चांगलेच. पण ते सगळीकडे वापरता येत नाहीत. डायपर वापरायचे असेल तर योग्य काळजी घ्यायला हवी. बाळाने डायपरमध्ये शी-शू केली की लगेच डायपर काढणे आवश्यक. शिवाय लगेच दुसरे डायपर लावू नये किंवा बाळाला सातत्याने डायपर घालून ठेवू नये. डायपर बदलताना मध्ये २०-२५ मिनिटे बाळाला तसेच ठेवावे, म्हणजे ती जागा कोरडी होईल व बुरशीचा संसर्ग टाळला जाईल. काही जण बाळाच्या शी-शूची जागा पुसून घेण्यासाठी बाजारात तयार मिळणारे ‘वेट वाइप्स’ वापरतात. ते शक्यतो वापरू नयेत. त्याऐवजी कापूस गरम पाण्यात बुडवून त्याने ती जागा व्यवस्थित पुसावी व स्वच्छ कापडाने टिपावी.

प्राधान्याने डॉक्टरांकडे कधी जावे? 

’     नवजात बाळांना कावीळ होणे सामान्य आहे, पण पहिल्या आठवडय़ातील बाळांच्या चेहऱ्यावर, डोळ्यात अधिक पिवळेपणा दिसत असेल तर लगेच डॉक्टरांना दाखवायला हवे.

’     बाळ सुस्त पडले किंवा दूध पीत नसेल तर.

’     नवजात बाळाला ताप आल्यास.

’     बाळ जलद श्वास घेत असेल किंवा त्याला दम लागत असल्यास.

’     बाळ निळे पडल्यास. चेहऱ्यावर निळेपणा दिसत असल्यास.

’     बाळ पांढरे पडले तरीही डॉक्टरांना दाखवावे.

डॉ. तुषार पारीख, नवजात बाळांचे तज्ज्ञ

डॉ. तुषार पारीख,  drtusharparikh@gmail.com

(शब्दांकन- संपदा सोवनी)