प्रकृ‘ती’ : रक्तक्षय: कारणे व उपाय

रक्तस्राव होतो तेव्हा महिला रुग्णास हळूहळू त्रास जाणवू लागतो.

डॉ. रश्मी फडणवीस, स्त्रीरोगतज्ज्ञ

महिला आरोग्यासंबंधित विचार केला तर रक्तक्षय (अ‍ॅनिमिया) ही अवस्था जाणून घेणे महत्त्वाचे आहे. ६० ते ७० टक्ेक महिलांना आयुष्यात कधी तरी या स्थितीतून जावे लागते. किशोरवयीन मुलींमध्ये रक्तक्षय होण्याचे प्रमाण ५० ते ६० टक्के आहे. विशेषत: मासिक पाळी सुरू झाल्यानंतर, गर्भारपणी आणि रजोनिवृत्तीपूर्वी अतिरक्तस्राव होत असेल तर ही स्थिती निर्माण होते. रक्तक्षय का होतो ते कळल्यावर त्यावर उपचार करणे सोपे जाते.

रक्तस्राव होतो तेव्हा महिला रुग्णास हळूहळू त्रास जाणवू लागतो. प्रथम थकवा जाणवतो. चालल्यानंतर धाप लागते, डोकेदुखी जाणवते वा डोके जड होते, चेहरा पांढरा पडू शकतो. काही वेळेस मासिक पाळीच्या वेळेस, गर्भारपणी वा प्रसूती झाल्यानंतर व रजोनिवृत्तीपूर्व अतिरक्तस्राव होतो. काही स्त्रीरुग्णांस छातीत धडधडते, थोडेसे चालून गेल्यानंतर चक्कर येते. काही स्त्रीरुग्णांस बर्फ खाण्याची वा माती खाण्याची इच्छा होते. अशा प्रकारची कोणतीही लक्षणे जाणवल्यास सर्वप्रथम रक्ताची विशेष चाचणी म्हणजे रक्तातील हिमोग्लोबिन, तांबडय़ा रक्तपेशींचा आकार, संख्या, त्यांच्यासमवेत येणाऱ्या इतर घटकांची तपासणी यांनी उपचारात फरक पडतो. यासाठी आपण रक्तक्षयासाठी कारणीभूत घटक समजून घेणे आवश्यक ठरते.

  • रक्तपेशींचा ऱ्हास अधिक प्रमाणात होतो. अशा वेळेस कावीळसदृश लक्षणांनी तो प्रदíशत होतो.
  • रक्तपेशींच्या निर्मितीत घट होते. अशा वेळेस अस्थिसंस्थेत बिघाड(बोन मॅरो सप्रेशन) झालेला आढळून येतो. रक्तपेशीनिर्मितीत तांबडय़ा पेशी तयार होण्याचे प्रमाण कमी होते.
  • काही आनुवंशिक घटकांमुळे रक्तपेशीचा आकार व प्रमाण तसेच प्राणवायूवहनाची क्षमता कमी आढळून रक्तक्षय प्रदíशत होतो.
  • हिमोग्लोबिन या घटकात विशेष फरक झाल्याने रक्तातील प्राणवायू वहनक्षमता कमी होते. हिमोग्लोबिनचे प्रमाण १२ ग्रॅम प्रति डेसिलिटरपेक्षा कमी झाल्यास रक्तक्षयास सुरुवात होते. अगदी ४ ग्रॅम प्रति डेसिलिटपर्यंत हे प्रमाण जाऊ शकते आणि आधी नमूद केलेली लक्षणे जाणवू लागतात.

रक्तक्षय ही अवस्था हळूहळू येणारी असल्याने त्याच्या निदानानंतर प्रतिबंधक उपाययोजना त्वरित सुरू केली तर आराम मिळू शकतो. रक्तक्षय टाळता येण्यासारखा आहे हे महिलांनी विसरू नये तसेच वेळेवर केलेल्या उपाययोजनेमुळे रक्तक्षयामुळे शरीराच्या इतर अवयवांवर होणारे परिणाम टाळता येतात.

रक्तक्षय झाल्यास आहार कोणता घ्यावा?

हिमोग्लोबिन व प्रथिनांचे योग्य प्रमाण यांनी रक्तक्षय टाळता येतो. यासाठी आहारात तेलबिया, सर्वप्रकारच्या साली असलेली कडधान्ये, दूध, पुदिना, लाल भोपळा, शेवग्याच्या शेंगा, गूळ, खजूर, बीट, कोिथबीर तसेच सर्व प्रकारचा मांसाहार यांचा समावेश करावा.

रक्ततपासणी उपचार

हिमोग्लोबिन व इतर घटक यांची तपासणी करून नक्की कोणत्या प्रकारचा रक्तक्षय आहे हे उपचाराच्या दृष्टीने जाणून घेणे आवश्यक ठरते. उपचार करताना जसा आहार महत्त्वाचा तसेच गोळ्या व इंजेक्शन्स महत्त्वाची ठरतात. गोळ्यांमध्ये लोहगोळ्यांसमवेत फॉलिक अ‍ॅसिड, क आणि ब१२ जीवनसत्त्व घेण्याने हिमोग्लोबिन घटक लवकर वाढू लागतात. तसेच काही क्षारही लोहगोळ्यांचे अभिशोषण करण्यास मदत करतात. जेव्हा हिमोग्लोबिन घटक ८ ग्रॅम प्रति डेसिलिटरपेक्षा कमी असेल तेव्हा इंजेक्शन्स घेणे भाग असते. तसेच शिरेतून लोहक्षार दिले जातात. अगदीच जरुरीचे असेल म्हणजे हिमोग्लोबिन ६ ग्रॅम प्रति डेसिलिटरपेक्षा कमी असेल तरच रक्तसंक्रमणाचा विचार करावा अन्यथा अशा रक्तसंक्रमणाने काही वेळा गुंतागूंत होऊ शकते.

का होतो?

  • आहारातील लोहघटकाचे प्रमाण कमी झाल्यास.
  • शारीरिक वाढ होत असताना, मासिक पाळी सुरू झाल्यानंतर शरीराला लोकघटकाची अधिक आवश्यकता असल्यास.
  • शरीरात लोह व तत्सम आवश्यक प्रथिनांचा साठा कमी असल्यास.
  • शरीरातील लोहघटकाचे वा रक्तवृद्धीसाठी लागणाऱ्या घटकांचे पचनसंस्थेत शोषण कमी झाल्यास.
  • मासिक पाळीतील, रजोनिवृत्तीपूर्व व गर्भारपणी होणारा रक्तस्राव सतत होत असल्यास.
  • जंतांचा, मलेरियाचा, डेंग्यूचा प्रादुर्भाव होऊन गेल्यास वा कोणताही आजार ज्यात रक्तपेशींचा क्षय होतो अशी परिस्थिती उद्भवल्यास.

rashmifadnavis46@gmail.com

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Blood loss causes and remedies

ताज्या बातम्या