वात, पित्त व कफ प्रकृती या संकल्पना सर्वानी कुठे ना कुठे ऐकलेल्या असतात. यातही ‘वात वाढला’ किंवा ‘वाताचा प्रकोप झाला,’ अशी तक्रार थंडीत हटकून ऐकायला मिळते. आयुर्वेदानुसार शरीरातील सर्व क्रियांचे, चलनवलनाचे नियंत्रण करणारा तो वात. तो रूक्ष, शीत आणि चल असतो. वात वाढला, कमी झाला किंवा त्याचे कार्य बिघडले की आजार होऊ शकतात. पावसाळ्यात वात प्रकोपित होतो. त्यानंतर येणारा हिवाळा- म्हणजे हेमंत व शिशिर ऋतूंमध्ये वातावरण थंड असत आणि रूक्ष असते. त्यामुळे हिवाळ्यातही वाताचे त्रास जाणवतात.
हिवाळ्यात वाताच्या प्रकोपामुळे होणारे त्रास आणि त्याच्याशी काहीसा दूरचा संबंध असणाऱ्या, पण विशेषत: हिवाळ्यात होणाऱ्या आरोग्याच्या त्रासांविषयी जाणून घेऊ या.
त्वचाविकार
आयुर्वेदानुसार त्वचा हे वाताचे स्थान आहे. त्यामुळे हिवाळ्यात जवळपास सर्वानाच त्वचेच्या तक्रारी जाणतात. त्यातही वृद्ध व्यक्तींमध्ये वात वाढतो, त्यामुळे वृद्धांना त्वचाविकारांचा त्रास या दिवसांत अधिक जाणवतो. त्वचा कोरडी पडणे, फाटणे, त्यातून पाण्यासारखा स्राव येणे, रक्त येणे अशा या तक्रारी असतात. त्यामुळेच थंडीत तेलांचा वापर करून अभ्यंग करण्यास सुचवले जाते. तीळ, जवस, करंज, मोहरी, खोबरे अशा वेगवेगळ्या पदार्थापासून काढलेली तेले अभ्यंगासाठी वापरता येतात. आपली प्रकृती आणि त्वचाविकाराचा प्रकार यानुसार कोणते तेल वापरायचे हे ठरते. विविध तेल एकत्र करूनही वापरता येतात.
सांध्यांचे विकार
शरीरातील वात प्रकोपित झाला की सांधे दुखणे, सांधे आखडणे, त्यातून आवाज येणे, अशा तक्रारी सुरू होतात. दुखऱ्या सांध्यांनाही तेल लावण्याचा फायदा होतो. परंतु हे तेल वातघ्न द्रव्यांनी सिद्ध केलेले असावे. दशमूळ (आयुर्वेदातील दहा विशिष्ट वनस्पती), निरगुडी अशा द्रव्यांनी तेले सिद्ध करता येतात. सांध्यांसाठी ‘स्वेदन’ अर्थात वाफेने शेकण्याचाही चांगला फायदा होतो. हल्ली बाजारात लहान आकाराचे ‘स्टीमर’ मिळतात त्यात ओले फडके ठेवून आपल्याला सोसवेल अशा गरम फडक्याने दुखरा सांधा शेकता येईल. साध्या गरम पाण्याच्या रबरी पिशवीने किंवा इलेक्ट्रिक हॉटपॅडने शेकले तरी चालते. हिवाळ्यात वाताचे नियमन व्हावे यासाठी व्यायामही तितकाच महत्त्वाचा. अर्थात हा व्यायाम आपल्या प्रकृतीनुसार वेगवेगळ्या प्रकारचा असू शकतो. ज्यांना आधीपासून दुखणे आहे त्यांनी या दिवसांत ‘फिजिओथेरपी’ची मदत घेतल्यास फायदा होऊ शकेल. सर्वसाधारणत: व्यायाम किती करावा याबद्दलही आयुर्वेदात काही गोष्टी सांगितल्या आहेत. घाम येतो, श्वासांची वृद्धी होते आणि हातापायांना हलकेपणा येतो, इतका व्यायाम हवा. अति व्यायामही बरा नव्हे. ज्यांना व्यायाम करणे शक्य होत नाही त्यांनी जरूर पायी चालावे. चालण्याच्या व्यायामानेही वाताचे नियमन होण्यास मदत होते.
उच्च रक्तदाब
थंडीत त्वचेखालील रक्तवाहिन्या आकुंचन पावतात आणि मोठय़ा रक्तवाहिन्यांवरील दाब वाढतो. उच्च रक्तदाबाचा त्रास होणाऱ्या रुग्णांची संख्याही थंडीत वाढते. त्यामुळे या दिवसांत उच्च रक्तदाबाच्या रुग्णांनी आधीपासूनच काळजी घेतलेली चांगली. त्यासाठी आपली ‘बीपी’ची औषधे कधीही चुकवू नयेत. आहारात मिठाचा वापर कमी ठेवावा. थंडी फारसे पाणी प्यायले जात नाही. त्यामुळे लक्षात ठेवून पुरेसे पाणी पिणे गरजेचेच.
पोटाचे विकार
हिवाळ्यात शौचाला आव पडणे, वारंवार शौचास जावे लागणे असे पोटाचे आजारही वाढलेले दिसतात. पोटाचे आजार टाळण्यासाठी आहारात स्निग्ध, पण हलक्या पदार्थाचा समावेश असावा. ताक हा यातीलच एक पदार्थ आहे. त्यामुळे जेवणात ताज्या ताकाचा अंतर्भाव करण्यास काही हरकत नसावी. पदार्थामध्ये हिंग, जिरे अशा पदार्थाचा वापर या दिवसांत थोडा वाढवता येईल.
मूळव्याध
अनेकांचा मूळव्याधीचा आजार हिवाळ्यात वाढतो किंवा नव्याने मूळव्याध जडते. शौचाच्या जागी आग होणे, वेदना होणे, रक्त पडणे अशी लक्षणे त्यात दिसू शकतात. अशा आजारामध्ये योग्य वेळी डॉक्टरांचा सल्ला घेणे चांगले. पण मूळव्याध होणे टाळण्यासाठी मलबद्धता टाळायला हवी. त्यासाठी गरजेपेक्षा फार कमी खाणे टाळावे. उपवास या दिवसांत शक्यतो नकोच. रात्रीच्या जेवणात वाफवलेल्या भाज्यांचा समावेश केल्यासही फायदा होऊ शकेल.
थंडीत काय करावे? काय टाळावे?
* हल्ली आपल्या आहारात तेलबियांचा वापर फार कमी झाला आहे. पण हिवाळ्यात त्यांची गरज असते. तीळ, जवस अशा तेलबियांची चटणी रोजच्या जेवणात घेता येईल. काही जण जवस व बडीशेप भाजून ठेवून जेवणानंतर खातात.
* द्विदल धान्ये शक्यतो कमी खावीत.
* कपडे उबदार हवेत. जाड कॉटनचे, सिल्क वा लोकरीचे कपडे या दिवसांत चांगले.
* पुरेसे पाणी प्यायला हवे.
वैद्य राहुल सराफ
(शब्दांकन- संपदा सोवनी)