|| डॉ. अमृता होळकर-गायकवाड, मूळव्याध व भगंदरतज्ज्ञ

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गुदभ्रंश म्हणजे ‘प्रोलॅप्स रेक्टम’. हा देखील लहान मुलांमध्ये आढळणारा एक आजार आहे. या आजारासंबंधी अज्ञान असल्यामुळे याची काही लक्षणे दिसल्यास पालकांमध्ये संभ्रम निर्माण होतो. गुदाच्या आतील गुदवलीचा मांसल भाग अंशत: (पार्टिकल) किंवा पूर्णत: (कम्लिट) गुद्द्वारातून बाहेर येणे यास गुदभ्रंश किंवा ‘प्रोलॅप्स रेक्टम’ असे म्हणतात.

प्रकार

अंशत: गुदभ्रंश : यामध्ये गुदवलीचा म्हणजेच गुदाच्या आतील मांसल भाग अंशत: गुद्द्वारातून बाहेर येतो. याचे प्रमाण लहान मुलांमध्ये अधिक असते. मुख्यत: तीन ते पाच वर्षे वयोगटातील मुले याने त्रस्त असतात.

पूर्णत: गुदभ्रंश

यात गुदाच्या आतील मांसल भाग गुद्द्वारातून पूर्णपणे बाहेर येतो. सुरुवातीला हे केवळ शौचाच्या वेळी जोर केल्याने होते. नंतर मात्र केवळ उभे राहिल्यावर किंवा चालल्यानंतरही हा त्रास होतो. याचे प्रमाण प्रौढांमध्ये अधिक असते.

अंतर्गत गुदभ्रंश

म्हणजेच आंत्रांत्रनिवेश होय. यामध्ये मोठय़ा आतडय़ाचा काही भाग किंवा गुदवलीचा काही भाग एकमेकांवर चढल्याने अशी स्थिती निर्माण होते. लहान मुलांमध्ये याचे प्रमाण अधिक असते.

कारणे

अंशत: गुदभ्रंश हा तीन ते पाच वर्षे वयोगटातील मुलांमध्ये जास्त प्रमाणात आढळतो. याचे एकच निश्चित कारण नाही. मात्र, याच्या कारणांमध्ये अकाली प्रसूत बालके, कमी वजनाची आणि अशक्त बालके, कटींमधील स्नायूंची दुर्बलता, कृमी, वारंवार अतिसार, मलावष्टंभ, शौचाच्या वेळी जास्त कुंथणे ही काही सर्वसाधारण कारणे सांगता येतील.

लक्षणे

अंशत: गुदभ्रंशाच्या लक्षणांमध्ये शौचाच्या वेळी मांसल भाग बाहेर येणे. त्यानंतर तो आपोआप आत जाणे किंवा तो हाताने लोटावे लागणे. शौचाला कडक होणे. जास्त कुंथावे लागणे. गुद्भागी वेदना-दाह ही लक्षणे असतात. या लक्षणांकडे वेळीच लक्ष देऊन उपचार घेणे आवश्यक आहे. मात्र याकडे दुर्लक्ष झाल्यास कधी कधी गुदगत रक्तस्रावासारखी गंभीर लक्षणेही उद्भवण्याची शक्यता असते.

उपचार

बऱ्याच वेळा जसे जसे वय वाढत जाते, तशी तशी लहान मुलांमध्ये अंशत: गुदभ्रंशाची लक्षणे कमी होत जातात. मात्र अशक्त मुलांचे वजन वाढवणे, कटीच्या स्नायूंना बळकटी येण्यासाठी व्यायाम, योगासने, योग्य आहार घेणे गरजेचे असते. आजाराच्या ठरावीक अवस्थेमध्ये आयुर्वेदिक उपचारांचाही खूप फायदा होतो. ठरावीक बस्ती, औषधी तैलयुक्त पिचू व आयुर्वेदिक काढा हे उपयुक्त ठरतात. मुलांना मलावष्टंभ होऊ नये यासाठी त्यांच्या आहारात गाईचे तुपाचे प्रमाण वाढवावे. पालेभाज्या द्याव्यात. पिण्याच्या पाण्याचे प्रमाण योग्य ठेवावे. गरज पडल्यास योग्य वेळी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

amrutalh@gmail.com

मराठीतील सर्व लोकआरोग्य बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prolapse rectum
First published on: 13-11-2018 at 04:32 IST