गर्भाशयाच्या गाठीबरोबरच अंडकोशावरही गाठी निर्माण होऊ शकतात. याचेही कारण वैज्ञानिकदृष्टय़ा संप्रेरकाचे असंतुलन. काही वेळेस ज्यांना पॉलीसिस्टीक ओव्हरीज आधी असतात, त्यांच्या अंडकोशात पाणी तयार होण्याचे कार्य सुरू होऊन अंडकोश पाण्याने भरून जड होतात, तसेच वंध्यत्वासाठी इलाज करताना दिल्या जाणाऱ्या औषधाने अंडकोश अतिप्रभावित होऊन त्यात एकाच वेळी अनेक अंडी तयार होताना अंडकोश हे एका द्रव्याने जड होऊ लागतात (ओव्हरस्टिम्युलेशन सिंड्रोम).
काही वेळेस वयाच्या दहाव्या वर्षी आलेल्या मासिकपाळीनंतर संप्रेरकाच्या असंतुलनाद्वारे अंडकोशाची गुल्मे(सिस्ट) आढळून येतात. परंतु वयाच्या २५ ते ४५ वर्षांपर्यंत दरमहा येणाऱ्या रजोदर्शनास कधी कधी प्रतिबंध होतो. मासिकपाळीमधील स्राव हा कमी होतो वा पूर्णपणे बंद होतो वा अधिक होतो अशा वेळेस स्त्रीरोगतज्ज्ञाकडून केलेल्या तपासणीत अंडकोशास सूज वा गुल्मे आढळून येतात. कधी कधी पोटातील वेदनांमुळे केल्या जाणाऱ्या अल्ट्रासोनोग्राफीत अंडकोशाची गुल्मे असल्याचे आढळते.
अंडकोशाच्या वाढीमुळे मासिकपाळीस अवरोध होतो. पोटात कधी कधी असह्य़ दुखते, पोटात पाणी होऊन पोटाचा घेर वाढतो, पायांवर सूज येते, कधी कधी मासिकपाळीच्या वेळी यात बदल होत रहातो म्हणूनच अंडकोशाच्या गुल्मांची तपासणी व निदान लवकरात लवकर होणे महत्त्वाचे ठरते आणि सर्वात महत्वाचे म्हणजे अंडकोशाच्या कर्करोगाचे निदान जेवढे लवकर होईल तेवढेच इलाज लवकर होऊ शकतात. सर्वच अंडकोशाची गुल्मे कर्करोगात परावर्तित होत नाहीत यासाठी रक्ततपासणीही आवश्यक ठरते.
गर्भाशय हे आपल्या ओटीपोटात आतील भागात असल्यामुळे त्याच्या आतील आवरणातील वाढ चटकन समजून येत नाही. काही वेळेस तर रजोनिवृत्ती झाल्यानंतर काही वर्षांनी जेव्हा रक्तस्त्राव होतो तेव्हा हा रक्तस्त्राव अशा गर्भाशयाच्या आवरणात होणाऱ्या वाढीमुळे होतो असं आढळून येतं तर कधी कधी या गाठी योनीमार्गाच्या तोंडापर्यंत आल्याचे निदर्शनास येते. या गाठीचे निदान करणे जरुरीचे ठरते कारण कदाचित अधिक काळ दुर्लक्षित राहिल्यास यात कर्करोगाची संभावना होऊ शकते. म्हणूनच कधीही मासिकपाळीतील त्रास कमी जास्त झाल्यास व अकाली रक्तस्राव होत असेल तर त्याचे संपूर्ण निदान करुन घेणे हे अत्यावश्यक ठरते.
असेच लक्ष आपण एन्डोमेट्रीऑसिसकडे देण्यास हवे. हा अतिशय गुंतागुंतीचा तेवढाच त्रासदायक आजार. हा फक्त स्त्रियांनाच होतो. साधारण कालावधी २५ ते ४० वर्षांपर्यंतचा. पण हल्ली मासिक पाळी वयाच्या दहाव्या वर्षांपासून सुरू होत असल्याने याचा कालावधी निश्चित नाही. दरमहा मासिकपाळी म्हणून होणाऱ्या रक्तस्रावात गर्भाशयाचे आवरण, अफलित बीजांड व रक्तवाहिन्यांचा काही भाग आढळतो. ज्या ज्या वेळेस असा रक्तस्राव होतो, त्या त्या वेळेस गर्भाशयाच्या बाहेर विसावलेल्या आवरणात बदल झाल्यामुळे अंडकोशाची स्थिती बदलून ‘चॉकोलेट सिस्ट’ बनते. कधी कधी अंडनलिकेत आजूबाजूस असलेल्या मोठय़ा आतडय़ाच्या आवरणातील भागावर विखुरलेल्या या आवरणात ही रक्तस्त्राव होतो आणि आजूबाजूच्या आवरणावर हा चिकटद्राव स्रावत राहतो.
अशी परिस्थिती निर्माण झाल्यास अशा स्त्रीरुग्णास मासिकपाळीच्या वेळेस अतिशय वेदना होतात. या वेदना इतक्या असह्य होतात की स्त्री रुग्ण या आजाराने घामाघूम होऊन बेशुद्ध पडू शकते. याचे निदान रक्ततपासणीत व अल्ट्रासोनोग्राफीने अचूक होते. यासाठी औषधे आहेतच पण औषधांनी गुण न आल्यास दुर्बणिीतील शस्त्रक्रिया हाही एक पर्याय आहे. एन्डोमेट्रीऑसिसचे चार प्रकार आहेत. निदानावरुन व चाचणीअंती आढळणाऱ्या त्या आवरणाच्या स्थितीवरुन हे प्रकार केलेले आहेत. प्रकारानुसार उपचारांची दिशा बदलते.
दरवेळेस होणाऱ्या मासिकपाळीच्या वेळेस तर अशा रुग्णाची वेदना अस’ा असते म्हणूनच औषधोपचार करुन वेदना तर कमी होतातच परंतु आजारही आटोक्यात रहातो. अंडकोषाची गुल्मे (सिस्ट), गर्भाशयाच्या आवरणापासून तयार होणारया गाठी व एन्डोमेट्रीऑसिस यावर विविध उपचार वेळीच केल्यास स्त्री रुग्ण वेदनेपासून मुक्त रहातातच पण नंतर त्यांना आरोग्यदायी जीवन जगता येते.
डॉ. रश्मी फडणवीस rashmifadnavis46@gmail.com

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व लोकआरोग्य बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Scrotum tumors and other problems
First published on: 23-04-2016 at 02:28 IST