15 December 2017

News Flash

वन पर्यटन : अंबाबरवा अभयारण्य

भाविकांच्या दृष्टीनेही अंबाबरवा अभयारण्याचे महत्त्व अनन्यसाधारण असे आहे.

डॉ. सुरेखा म. मुळे | Updated: August 9, 2017 4:54 AM

भाविकांच्या दृष्टीनेही अंबाबरवा अभयारण्याचे महत्त्व अनन्यसाधारण असे आहे.

महाराष्ट्रातील वनवैभवाचा आपण विचार करतो तेव्हा विदर्भाला अमाप वनसंपत्ती लाभली असल्याचे आपल्याला दिसून येते. अनेक वने, जंगले, प्राणी, पक्षी आणि खनिज संपत्तीने नटलेल्या, बहरलेल्या विदर्भावर निसर्गाने मुक्तहस्ताने उधळण केली आहे.

महाराष्ट्रात एकूण सहा व्याघ्र प्रकल्प आहेत. त्यातील पाच विदर्भात आहेत. हे पाच आणि इतर राज्यांतील आठ व्याघ्र प्रकल्प मिळून एकूण १३ व्याघ्र प्रकल्प विदर्भाच्या ३०० चौरस किलोमीटरच्या या परिक्षेत्रात आहेत. त्यामुळेच विदर्भाला देशाची व्याघ्र राजधानी म्हटले जाते. ‘स्टेटस ऑफ टायगर्स इन इंडिया’च्या अहवालानुसार महाराष्ट्रातील वाघांची संख्या सध्या १९० इतकी आहे.

गुगामल राष्ट्रीय उद्यान, मेळघाट वन्यजीव अभयारण्य, नरनाळा वन्यजीव अभयारण्य, वान वन्यजीव अभयारण्य आणि अंबाबरवा वन्यजीव अभयारण्य मिळून मेळघाट व्याघ्र प्रकल्प अस्तित्वात आला आहे. महाराष्ट्र शासनाने ९ एप्रिल १९९७ च्या आदेशान्वये अंबाबरवा वनक्षेत्राला अभयारण्याचा दर्जा दिला. १२७.११० चौरस किलोमीटरचे डोंगरदऱ्यांनी व्यापलेले हे क्षेत्र संरक्षित झाल्याने येथील समृद्ध जैवविविधता जपली गेली. बुलडाणा जिल्ह्य़ाच्या उत्तर पूर्वेला सातपुडय़ाच्या कुशीत विसावलेले अंबाबरवा अभयारण्य पारखी निसर्ग पर्यटकाने अभयारण्यात पाऊल टाकल्यानंतर त्याला मोहून टाकते आणि त्याला परत परत तिथे येण्यास भाग पाडते.

भाविकांच्या दृष्टीनेही अंबाबरवा अभयारण्याचे महत्त्व अनन्यसाधारण असे आहे. अभयारण्यात मांगेरी या ठिकाणी डाव्या बाजूला उंच असा दुर्गम डोंगर दिसतो. यालाच मांगरी महादेवाचा डोंगर असे नाव आहे. सातपुडय़ाच्या हिरव्यागार पर्वतरांगेमध्ये वसलेले आणि नावाप्रमाणे महाशिखरावर विराजमान झालेले महादेवाचे मंदिर हे या अभयारण्यातले आणखी एक आकर्षणाचे ठिकाण आहे. शिखरावरची चढाई अंगावर थरार आणणारी आहे, तर निसर्गाला सर्वात जवळून अनुभवण्याचे हे एक उत्तम ठिकाण आहे. सातपुडा पर्यटन करणाऱ्या ट्रेकर्सनी येथे चढाईचा आनंद घेण्यासाठी अवश्य भेट द्यावी असे हे ठिकाण आहे. या ठिकाणी दगडाची भली मोठी कडा कोरून मंदिराची निर्मिती केली आहे.आसपास विस्तीर्ण वनराई आणि शांत सुंदर परिसर मनाला खूप प्रसन्न करून जातो. अभयारण्यात आणखी अनेक खोरे आणि दऱ्या असून प्रत्येकांची विशेषता वेगळी आहे. जळकाकुंड, पिंपलडोह खोरा, चिमानखोरा अशी  ठिकाणं साहसी पर्यटकांना आकर्षित करतात.  या वनवैभवास एकदा तरी भेट द्यायला हवी.

डॉ. सुरेखा म. मुळे drsurekha.mulay@gmail.com

First Published on August 9, 2017 4:54 am

Web Title: amba barva wildlife sanctuary