29 February 2020

News Flash

आडवाटेवरची वारसास्थळे : उनपदेव आणि उनकेश्वर

श्रीरामाने एक बाण मारून उष्ण पाणी निर्माण केले. त्या पाण्यात स्नान केल्यावर ऋषींचा रोग बरा झाला.

महाराष्ट्रात निसर्गचमत्कार अनेक ठिकाणी दिसतात. कोकणातले पाण्यातून येणारे बुडबुडे, हरिहरेश्वरची खडकातील जाळीदार नक्षी, गुळंचवाडीचा शिलासेतू, बोरीची टेफ्रा असे अनेक निसर्गचमत्कार आपल्याला जागोजागी आढळतात. त्यातलेच एक नवल असलेले ठिकाण म्हणजे गरम पाण्याचे औषधी कुंड. कोकणातदेखील गरम पाण्याची कुंडे आढळतात. परंतु, जळगाव जिल्ह्यातील उनपदेवच्या कुंडाला पौराणिक पाश्र्वभूमी लाभलेली आहे. उनपदेव म्हणजे गरम पाणी. खानदेशातील भाषेत वुनदेव म्हणजे ज्याने हे उष्ण पाणी निर्माण केले तो देव. जळगाव जिल्ह्यात चोपडा तालुक्यात सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी हे आगळेवेगळे ठिकाण आहे. याची कथा अशी की शरभंग ऋषींच्या अंगाला अनेक छिद्रे पडून त्यातून रक्त, दरुगधी येत होती. श्रीराम वनवासात असताना या शरभंग ऋषींच्या आश्रमात आले. शरभंग ऋषींनी प्रभू रामचंद्रांची पूजा केली. श्रीरामाने एक बाण मारून उष्ण पाणी निर्माण केले. त्या पाण्यात स्नान केल्यावर ऋषींचा रोग बरा झाला. या ठिकाणी पौष महिन्यात यात्रा भरते. त्या वेळी या पाण्यात गंधकाचे प्रमाण जास्त होते. चोपडा इथून अडावदजवळ हे स्थान असून मंदिराचे आवार तटबंदीयुक्त आहे. मध्यावर एक मोठे कुंड असून, त्याला असलेल्या गोमुखातून गरम पाणी प्रवाहित होत असते. इथे सदासर्वकाळ पाण्याची धार पडत असते. पाण्याचे तापमानदेखील कमीजास्त होत नाही. जवळजवळ ५६ अंश इतके इथले तापमान असते. शेजारी एक १२ फूट खोल गुहा असून, या गुहेला शरभंग ऋषींचा आश्रम म्हणतात. इथे एक मोठी धर्मशाळासुद्धा आहे. जवळच आवारात एक यादवकालीन मंदिराचे अवशेष पाहायला मिळतात. त्या मंदिरात शिवपार्वतीची देखणी मूर्ती स्थापित केलेली आहे.

अशीच कथा आणि असेच एक स्थान नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यात श्रीउनकेश्वर म्हणून प्रसिद्ध आहे. इथे गरम पाण्याच्या कुंडाशेजारीच गार पाण्याचेसुद्धा कुंड आहे. तेसुद्धा प्रभू रामचंद्रानेच निर्माण केले असे सांगण्यात येते. जवळच उनकेश्वर महादेवाचे मंदिर आहे. इथल्या शिविपडीवर हातात धनुष्यबाण घेतलेल्या रामाची मूर्ती कोरली आहे तर गर्भगृहात शरभंग ऋषींच्या पादुका कोरलेल्या दिसतात. तिथे इ.स.१२७९ मधील एक शिलालेख असून त्यावर मातापूरच्या शरणूनायकाचा पुत्र मेघदेव याने उनकदेव मंदिर बांधल्याचा उल्लेख आहे. हा देवगिरीच्या रामदेवरायाचा मांडलिक होता. गरम पाण्याच्या कुंडात उतरताना एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची ती म्हणजे इथे कधीही रिकाम्यापोटी पाण्यात उतरू नये. अन्यथा गंधकामुळे चक्कर येण्याची शक्यता असते.

ashutosh.treks@gmail.com

First Published on December 7, 2016 5:11 am

Web Title: ancient temple in maharashtra
Next Stories
1 ज्वालामुखीच्या विवराकाठी
2 आडवाटेवरची वारसास्थळे : १५ मोटांची विहीर-लिंबशेरी
3 जायचं, पण कुठं? : खरोसा लेणी
X
Just Now!
X