18 February 2020

News Flash

आडवाटेवरची वारसास्थळे : ब्रह्मेंद्रस्वामींचे धावडशी

सन १६४९ साली विदर्भातील राजूरजवळ असलेल्या दुधेवाडीला त्यांचा जन्म झाला.

शाहू छत्रपती (संभाजी महाराजांचे सुपूत्र), बाळाजी विश्वनाथ पेशवे, कान्होजी आंग्रे आणि अगदी जंजिरेकर सिद्दीचेसुद्धा गुरू असलेले ब्रह्मेंद्रस्वामी हे एक विलक्षण व्यक्तिमत्त्व होते. सन १६४९ साली विदर्भातील राजूरजवळ असलेल्या दुधेवाडीला त्यांचा जन्म झाला. काशीचे श्री ज्ञानेंद्रसरस्वतीनायक यांनी त्यांना परमहंस दीक्षा दिली. तेव्हापासून ते ब्रह्मेंद्रद्रस्वामी म्हणून ओळखले जाऊ लागले. इ.स. १६९८ साली ते कोकणातील परशुरामक्षेत्री वास्तव्याला आले. कान्होजी आंग्रे आणि बाळाजी विश्वनाथ हे त्यांचे निस्सीम भक्त होते. ताराबाई-शाहू कलहात शाहूंच्या पाठीशी या दोघांनाही उभे करण्यात ब्रह्मेंद्रस्वामींचे मोठेच योगदान होते. छत्रपती, पेशवे, त्यांचे सरदार अशा अनेक मातब्बर व्यक्तींचे गुरू असलेल्या ब्रह्मेंद्रस्वामींचे राजकारणातसुद्धा चांगलेच वजन होते. त्यांनी उच्चारलेले शब्द खरे होतात अशी त्यांची कीर्ती होती. त्यांचे प्रस्थ एवढे होते की एकदा जंजिरेकर सिद्दय़ाचा एक सरदार सिद्दी सात याने चिपळूणच्या परशुराम क्षेत्राची नासधूस केली. स्वामींनी त्याचा लढाईत नायनाट होईल असा शाप दिला. जंजिरेकर सिद्दी स्वामींचा भक्त होता. आपल्या सरदाराची चूक त्याला समजली आणि त्याने लुटीची रक्कम तर परत केलीच शिवाय नुकसानभरपाई म्हणून चिपळूणचे परशुराम मंदिर पुन्हा बांधून दिले. पुढे चारच वर्षांनी मराठय़ांशी झालेल्या लढाईत सिद्दी सात मारला गेला. या प्रसंगाने उद्विग्न झालेले स्वामी सातारा या छत्रपतींच्या राजधानीच्या अगदी जवळ असलेल्या धावडशी गावी येऊन स्थायिक झाले. परशुरामाचे निस्सीम भक्त असलेल्या या स्वामींनी धावडशीला दोन लाख रुपये खर्चून भार्गवराम मंदिर उभारले आहे. खास मराठा स्थापत्यशैलीचे धावडशीचे भार्गवराम मंदिर मोठे पाहण्यासारखे आहे.  जनावरे आणि माणसांसाठी पाण्याची स्वतंत्र केलेली सोय आवर्जून पाहावी अशी आहे. मंदिरावरील मूíतकाम सुंदर आहेच, पण त्यातही विष्णूचे दशावतार खास पाहण्याजोगे आहेत. मंदिरात परशुरामाची सुंदर मूर्ती असून एक शिलालेखही पाहायला मिळतो. सन १७४५ मध्ये वीरमाडे या गावी ब्रह्मेंद्रस्वामींचे निधन झाले. झाशीची राणी लक्ष्मीबाई हिचे माहेरचे गाव म्हणजे हेच धावडशी होय. सातारा-वय्रे माग्रे धावडशी हे अंतर जेमतेम २५ कि.मी. इतके भरते. गावच्याच मागे मेरुलिंग नावाचा डोंगर असून त्यावर असलेले मंदिर, कोरीव खांब आणि मंदिरासमोरील कुंड बघण्यासारखे आहे. इथून सातारा, अजिंक्यतारा किल्ला, वेण्णा नदी, मेढा, यवतेश्वर, सज्जनगड, चंदन-वंदन किल्ले, जरंडेश्वर असा सारा परिसर अतिशय रमणीय दिसतो.

आशुतोष बापट ashutosh.treks@gmail.com

First Published on November 23, 2016 5:23 am

Web Title: brahmendra swami temple in satara
Next Stories
1 प्राचीन तेर
2 दुचाकीवरून : सायकलचे प्रयोग
3 वारसास्थळांचा इंडोनेशिया
Just Now!
X