हौस, छंद म्हणून आज सायकलिंग लोकप्रिय होत असलं तरी, किमान सुविधा आणि अत्याधुनिक सायकली नसतानाही  १६ वर्षांपासून काही डोंगरभटके नववर्षांच्या स्वागताला नियमितपणे सह्य़ाद्रीतल्या गडकिल्ल्यांवर जात असतात. त्यांच्या या अनोख्या मोहिमेबद्दल..

काहीतरी अत्रंगीपणा करणे हे डोंगरभटक्यांचे व्यवच्छेदक लक्षणच म्हणावं लागेल. किंबहुना चौकटीबाहेरच्या या विश्वात कायमच काहीतरी नवीन घडत असते. त्यामुळेच १६ वर्षांपूर्वी डोंगरभटक्यांच्या निसर्ग गिरिभ्रमण या संस्थेतील काही तरुणांनी थेट डोंगरावरच सायकली दामटवायचे ठरवले आणि तेव्हापासून त्यांचं नववर्षांचं स्वागत सायकलीवरून डोंगर भटकंतीतच होऊ लागलं. वर्षअखेर आणि वर्षांरंभ साजरा करायचा तो किल्ल्यांवरच आणि तोदेखील सायकलवरून अशा संकल्पनेमुळे आजवर सायकलीवरून या डोंगरभटक्यांनी ७३ किल्ल्यांना भेटी दिल्या आहेत.

सह्य़ाद्रीच्या अंगाखांद्यावर गेल्या ६० वर्षांपासून अनेक डोंगरभटके विविध उपक्रम करत आहेत. पण येथे सायकली दामटवाव्यात ही कल्पना सुचायला जरा वेळच लागला. डोंगरात सायकल चालवणे हे कदाचित आजच्या सायकलिंगच्या जगात फारसं नावीन्याचं वाटणार नाही. पण, आजच्यासारख्या गिअर्सच्या आधुनिक सायकली उपलब्ध नसताना अगदी घोडा सायकली घेऊन डोंगर भटकंतीचा उद्योग या डोंगरवेडय़ांनी केला.

२००१ साली ही सुरुवात झाली ती हरिश्चंद्रगडावर सायकल नेऊन. हरिश्चंद्रगड हा काही तसा सायकलिंगसाठी पूरक वाट असलेला किल्ला नाही. पण कोकणकडय़ावर सायकल न्यायची ही कल्याण-डोंबिवलीतील सुशांत करंदीकर, प्रथमेश मेंहदळे, अमेय आपटे यांची प्रबळ इच्छा. त्या मोहिमेने त्यांना प्रोत्साहन मिळाले आणि पुढच्याच वर्षी राजमाची-ढाकबहिरी-भिमाशंकरच्या वाटेवर सायकली दामटल्या. त्यावर्षी अमित जोशीदेखील त्यात सहभागी झाला. लोणावळ्याहून राजमाचीला जाणारी डोंगरातील सोळा किलोमीटरची वाट, पुढे भीमाशंकरच्या जंगलातील पायवाट जंगल असा सायकलिंगचा मनमुराद आनंद येथे घेता आला. अर्थातच या पूर्ण वाटांवर सलग सायकल चालवणे तसे अवघडच. त्यामुळे जोवर सायकल चालवण्याजोगा रस्ता आहे तोवर चालवायची आणि जेथे नाही तेथे सरळ सायकल उचलून घ्यायची. पण सायकल किल्ल्यावर घेऊन जायची ही त्यांची जिद्द. राजगड-तोरणा ही वाट मात्र त्यांच्यासाठीच जणू काही खास तयार केल्यासारखी होती. पाठीमागे स्वराज्याची पहिली राजधानी, तर पुढे स्वराज्यातील पहिला किल्ला आणि मध्ये सहा-सात किलोमीटरच्या डोंगरसोंडेवरून जाणारी पायवाट. ही सायकल भटकंती धम्माल होती. पुढच्याच वर्षी पन्हाळगड-विशाळगड या ऐतिहासिक वाटेवर कधी शेताच्या बांधावरून तर कधी डांबरी सडकेवरून सायकलिंगसाठी अमृता राजे, कांचन खरे, दीपाली आस्लेकर या मुलीदेखील सहभागी झाल्या. २००५ मध्ये पाचव्या मोहिमेत मग किल्ल्यांची संख्या तर वाढलीच, पण आरोहणासाठी कठीण किल्लेदेखील निवडले गेले. नाशिकजवळच्या सातमाळा डोंगररांगेतील चांदवड, राजधेर, इंद्राई, कंचना, धोडप या किल्ल्यांवर ही मोहीम होती. इंद्राई किल्ल्यावर सायकलिंगचा सर्वाधिक आनंद मिळाला. यावर्षी दिवाकर भाटवडेकर त्यांना येऊन मिळाला तर या सायकलस्वारांचे हे उद्योग कॅमेऱ्यात बंद करण्यासाठी संजय लोकरे आणि हर्षद परब आले होते.

पुढे किल्ल्यांची काठीण्यपातळी वाढू लागली. चढाईसाठी कठीण अशा अलग मदन कुलंगवरदेखील सायकली चढवल्या आणि अलंगच्या माथ्यावर मनसोक्त सायकलिंग केले. तर सह्य़ाद्रीतला सर्वोच्च किल्ला साल्हेरवरदेखील हे सायकलवीर जाऊन आले.

त्यांच्या या सायकलवरच्या डोंगर भटकंतीने अनेकांना वेड लावले. जवळपास पंचवीस वेगवेगळ्या सायकलस्वारांनी आजवरच्या १६ मोहिमांमध्ये भाग घेतला आहे. काही नियमित आले तर काहीजण एकदाच, पण सुशांत करंदीकर हा गेली १६ वर्षे नियमितपणे या सायकलिंग मोहिमांमध्ये सहभागी होत आहे. यावर्षी तर कोणीच जोडीदार नसल्यामुळे तो एकटाच किल्ल्यांची सायकलवारी करून आला. एकटाच असल्यामुळे गिरिदुर्गाऐवजी सागरी किल्ल्यांकडे मोर्चा वळवला आहे. रत्नदुर्ग, पुर्णगड, यशवंतदुर्ग, विजयदुर्ग, देवगड, भरतगड, आंबोळगड, सोनगड आणि रामगड या किल्ल्यांना सायकलीवरून भेट देऊन तो नुकताच परत आलाय. त्याच्या या सातत्यामुळे सायकलवरुन भेट दिलेल्या किल्ल्यांची संख्या ७३ झाली आहे. लवकरच तो सायकलींवरुन भेट दिलेल्या किल्ल्यांचे शतक पूर्ण करेलच.

सायकलिंगच्या परिभाषेत याला माऊंटन बाईकिंग म्हणावे लागेल. पण हा प्रकार पूर्णपणे माऊंटन बाईकिंगच्या व्याख्येला न्याय देणारा नाही. मुळातच आपल्याकडे सायकलिंग एक खेळ म्हणून आता आता लोकप्रिय होऊ लागले आहे. तसं सायकलिंग काही आपल्यासाठी नवीन नव्हते, पण हौस आणि छंद म्हणून सायकलिंगचा कल वाढला तो गेल्या पाच-सात वर्षांतच. त्यातही धोपटमार्गाने सायकलिंगकडेच आपला सर्व ओढा. काही चुकार भटके आडवाटांवर भटकतात. पण थेट माऊंटन बाईकिंग हा प्रकार तुलनेने कमीच म्हणावा लागेल. त्यामुळे माऊंटन बाईकिंग या संकल्पनेला अपेक्षित असे मार्ग आपल्याकडे विकसितच झालेले नाहीत. खास डोंगरात चालवता येईल अशी माऊंटन बाईक गेल्या सहा-सात वर्षांत आपल्याकडे परवडणाऱ्या किमतीत मिळू लागली आहे. पण या माऊंटन बाईकची कमतरता भासू न देता जिद्दीने या डोंगरभटक्यांनी माऊंटन बाईकिंगची बीजं १६ वर्षांपूर्वीच सह्य़ाद्रीत रुजवली हे मात्र नाकारता येणार नाही. प्रत्येक किल्ल्यावर जाताना कदाचित अगदी माऊंटन बाईकिंगच्या संकल्पनेला पूर्ण न्याय मिळेलच असे नाही. पण डोंगरात सायकली दामटवण्याची त्यांची जिद्द, उर्मी वाखाणण्याजोगी म्हणावी लागेल. महत्त्वाचे म्हणजे यामध्ये असलेलं सातत्य. हे सातत्य टिकून राहिलं ते गिर्यारोहणातील संस्थात्मक रचनेमुळे आणि सुशांतच्या जिद्दीमुळे. निसर्गगिरिभ्रमण संस्थेने गेली १३ वर्षे सातत्याने या उपक्रमाला पाठिंबा दिला, तर आता सुशांतची वाइल्ड व्हिजन ही संस्था हेच काम पुढे नेत आहे.

सायकलिंगकडे सध्या पर्यटनातील एक घटक म्हणूनदेखील पाहिलं जाते. डोंगरभटकंतीत पर्यटनाने केव्हाच शिरकाव केला आहे. पण असे जरी असले तरी या सर्वातून मिळणारा आनंद हाच त्यातील गाभा आहे आणि हा गाभा या डोंगरभटक्यांनी सह्य़ाद्रीतल्या सायकलिंगने प्रेमाने जपला आहे आणि जपत आहेत हे महत्त्वाचे.

सुहास जोशी suhas.joshi@expressindia.com