नयनरम्य समुद्रकिनारे, खाण्यापिण्याची चंगळ अशी गोव्याची ओळख असली तरी हेच गोवा सहा अभयारण्यांनी संपन्न असे आहे.  थोडी वाट वाकडी करून खास ही अभयारण्य पाहण्यासाठी स्वतंत्र सहलच काढावी लागेल

गोव्याचं नाव घेतले की आपल्या डोळ्यासमोर येतात ती चमचमते समुद्र किनारे, देशी-विदेशी पर्यटक, गोव्यात स्वस्त असणारे मद्य आणि त्यासाठी तिथे जाणारे भारतीय पर्यटक. पण यापलीकडेदेखील गोव्यात बरेच काही आहे. टिपिकल पर्यटनाच्या रचनेत वरील सर्व गोष्टी येत असल्या तरी गोव्याला तेवढय़ाच रचनेत बंदिस्त करता येणार नाही.

rain Mumbai,
मुंबईसह ठाण्यात पावसाच्या हलक्या सरींची शक्यता
An advertisement board fell down in Wagholi due to strong winds Pune news
सोसाट्याचा वाऱ्यामुळे वाघोलीत कोसळला जाहिरात फलक
Two more days of hailstrome in Vidarbha Pune news
विदर्भात आणखी दोन दिवस गारपीट; जाणून घ्या, कोणत्या जिल्ह्याना दिला इशारा
Sakkardara flyover, Nagpur,
नागपूर : भरधाव वाहनांसह अपघाताच्या भीतीचे सावट, सक्करदरा उड्डाण पुलावर मागील वर्षात १३ अपघात

अर्थात गोव्याचे हे वेगळे रूप पाहायचं असेल तर मात्र तुम्हाला पर्यटकप्रिय उत्तर गोव्यात जाण्याऐवजी दक्षिण गोव्यात जावे लागेल. ३५०० चौरस किलोमीटर एवढय़ा छोटय़ाशा राज्यात एकूण सहा अभयारण्यं आहेत. पळोलीम बीच हे मुक्कामाचे ठिकाण ठरवून ही अभयारण्यं पाहणं सहज शक्य आहे. दिवसभर जंगलात भटकायचे आणि सायंकाळी पळोलीम बीच गाठायचा. पळोलीम हा तसा कमी वर्दळीचा. अर्थातच टिपिकल भारतीय पर्यटकांपेक्षा येथे परदेशी पर्यटकांचीच वर्दळ दिसते.

पळोलीमपासून फक्त १२ किमीवर कोटींगाव अभयारण्य आहे. अभयारण्यात प्रवेश करतानाच तेथे असलेल्या एका फळ्याकडे हमखास लक्ष जाते. त्या फळ्यावर पर्यटकांनी त्यांना दिसलेल्या प्राणी आणि पक्ष्यांच्या नोंदी करून ठेवलेल्या असतात. आपल्याकडील इतर अभयारण्यांमध्ये असा प्रकार सहसा पाहायला मिळत नाही. पर्यटकांनी केलेल्या अशा नोंदीमुळे अभयरण्याच्या माहिती संकलनात हातभार तर लागतोच, पण त्याचबरोबर नव्याने येणाऱ्या पर्यटकांना आपल्याला कुठे काय पाहायला मिळेल याचा अंदाज बांधता येतो. आम्ही तेथे गेलो तेव्हा तीन दिवस आधी काही पर्यटकांनी काळा बिबटय़ा (ब्लॅक पँथर) दिसल्याची नोंद केली होती. मुंबईतल्या संजय गांधी नॅशनल पार्क एवढय़ा आकाराच्या कोटींगाव या अभयारण्यात पक्षी प्राण्यांची संख्या मात्र भरपूर आहे. मोठय़ा प्राण्यांमध्ये गौर, बिबट्या, काही जातीची हरणे, काळा बिबट्या, शेकरू, उडती खार दिसतात तर भरपूर प्रकारचे पक्षी दिसू शकतात.

साधारणत: पर्यटकांचा असा समज असतो की आपण अभयारण्यात गेल्यावर लगेचच आपल्याला भरपूर पक्षी प्राणी दिसतील, परंतु अशी अपेक्षा करणे काही वेळा अपेक्षाभंगाचे कारण ठरू शकते. अशावेळी आपण काही गोष्टी समजून आणि अपेक्षा न ठेवता गेल्यास दिसलेली प्रत्येक गोष्टीचा आपण आनंद घेऊ शकता. या अभयारण्यात काही पाणवठय़ाच्या ठिकाणी मचाणं बांधली आहेत त्या मचाणांवर शांतपणे बसल्यास कदाचित आपल्याला या जंगलाचा मस्तपकी अनुभव घेता येईल.

पळोलीम पासून साधारण ३०-३५ कि.मीवर नेत्रावली हे अजून एक अभयारण्य आहे जे सह्य़ाद्रीच्या इतर अभयारण्यांना जोडण्याचे काम करते. नेत्रावली अभयारण्य हे उत्तर गोव्यातील भगवान महावीर अभयारण्य आणि दक्षिणेतील अंशी अभयारण्यांना जे कर्नाटकमध्ये आहे यांना जोडण्याचे अतिशय महत्त्वाचे काम करते. गोव्यातील सर्व अभयारण्ये सह्य़ाद्रीच्या कुशीत असल्यामुळे येथील वनसंपदा मुबलक आहे आणि वनसंपदेमुळे येथील वन्यजीवन खूप समृद्ध आहे.

नेत्रावलीचा आकार सुमारे २०० चौरस किलोमीटरचा आहे आणि उत्तर गोव्यातील प्रमुख नदी झुआरी ही या अभयारण्याची जीवनदायिनी आहे. नेत्रावलीमध्ये कोटिंगावप्रमाणेच पक्षी आणि प्राण्यांची विविधता आढळते. नेत्रावलीत जर आपल्याला गोव्यातील निसर्ग समृद्धता अनुभवायची असेल तर किमान एक आठवडय़ाची सुट्टी घेऊन तिकडे वास्तव्यास जायला हवे.

अभयारण्यांबरोबरच आणखीन एक आवर्जून पाहायचं ठिकाण म्हणजे ऑलिव्ह रिडले कासवांचे प्रजनन होणारा अगोंद बीच. मार्च ते एप्रिल या काळात अगोंद बीचवर ऑलिव्ह रिडले प्रजातीची कासवे मध्यरात्री वाळूत खड्डा करून अंडी सोडतात. कालांतराने या अंडय़ातून कासवाची पिल्लं बाहेर येतात आणि समुद्रात निघून जातात. कासवांचे बाहेर येणे आणि तुरुतुरु सरपटत समुद्राकडे जाणे हा एक मोहक प्रकार असतो. तो पाहण्यासाठी अनेक पर्यटक येथे येत असतात. कासवांनी अंडी घातल्यानंतर त्यांचे कुत्रे आणि इतर प्राण्यांपासून संरक्षण व्हावे म्हणून येथे कुंपण घातले आहे. कासवांनी अंडी केव्हा घातली याची नोंद केली जाते. वनखात्याचे कर्मचारी त्या पूर्ण कालावधीत तेथे उपस्थित असतात.

गोव्यातली जंगल भटकंती हा एक स्वतंत्र विषयच आहे. एरवीच्या पर्यटनात एखादं दिवस धावती भेट देता येते. पण जंगल अनुभवयाचे असेल तर मात्र खास वेळ काढून केवळ जंगलांसाठीच येथे जावे लागेल. तरच त्याचा मनमुराद आनंद घेता येईल.

सुदीप आठवले sudeepathavale@gmail.com