सायकल शहरात चालवायची असो वा शहराबाहेर, सुरक्षेच्या दृष्टीने काही गोष्टी ध्यानात ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे सायकल चालवताना चालवणाऱ्याच्या सुरक्षेसोबतच रस्त्यावर चालणाऱ्या पादचाऱ्यांची सुरक्षाही तेवढीच महत्त्वाची आहे. त्यामुळे एक जबाबदार नागरिक म्हणून पर्यावरणाच्या संवर्धनासाठी सायकलचा वापर करताना जबाबदारीने चालवणेदेखील गरजेचं आहे. सर्वसामान्यपणे हेल्मेट, घंटी, चेन, गिअर्स, मडगार्ड, स्पोक्स, टायर, सीट, पेडल, समोरचा आणि मागचा रिफ्लेक्टर लाइट, पुढच्या आणि मागच्या चाकामधील रिफ्लेक्टर लाइट, पेडल रिफ्लेक्टर लाइट, इ. मूलभूत गोष्टी सुरक्षेच्या दृष्टीने व्यवस्थित असणे आवश्यक आहे.

शहरात सायकल चालवताना

  • सायकलवर बसण्यापूर्वी सायकलच्या दोन्ही टायरमध्ये पुरेशी हवा आहे की नाही आणि ब्रेक्स नीट काम करत आहेत, याची खात्री करून घेणे.
  • हेल्मेट घालणे आवश्यक.
  • स्वत:च्या आणि इतरांच्या सुरक्षेच्या दृष्टीने सायकलला घंटी असावी आणि तिचा गरजेनुसार वापर करावा.
  • शहरात सायकल चालवताना सायकलला आरसा लावल्यास त्याचा चांगला उपयोग होऊ  शकतो.
  • ज्या दिशेने वाहतूक जात आहे, त्याच दिशेने सायकल चालवावी.
  • सायकल चालवताना चालत्या वाहनांना पकडू नये.
  • हेडफोन्सद्वारे मोठय़ा आवाजात गाणी ऐकणे किंवा फोनवर बोलणे टाळावे.
  • नेहमी वाहतुकीच्या नियमांचे (सिग्नल, उजवीकडे, डावीकडे वळणे) पालन करावे.
  • साधारणपणे एक सरळ लेन पकडूनच सायकल चालवावी. सतत लेन बदलू नये, त्यामुळे इतर वाहने गोंधळण्याची शक्यता असते आणि अपघातालाही निमंत्रण मिळू शकते.
  • आपल्याकडे शहरांमध्ये सायकलींसाठी वेगळे रस्ते किंवा लेन नाहीत, त्यामुळे रस्त्याच्या डाव्या बाजूने किंवा सव्‍‌र्हिस रोडवरून सायकल चालवणे योग्य.
  • साधारणपणे मोठय़ा गाडय़ा (बस, ट्रक) यांच्या अतिशय जवळून सायकल चालवू नये.
  • फुटपाथवरून सायकल कधीच चालवू नये.
  • सायकल चालवताना रस्त्याच्या मध्ये अचानक थांबू नये. तशीच गरज पडल्यास हात वर करून मागच्या वाहनांना सिग्नल द्यावा आणि सायकल एका बाजूला न्यावी.
  • सायकलचे पार्किंग नेहमी रस्त्याच्या कडेलाच करावे. त्यासाठी सायकलला स्टँड असल्यास उत्तम.
  • दोन सायकलस्वारांपेक्षा जास्त सायकलस्वारांनी एका सरळ रेषेत सायकल चालवू नये.

शहराबाहेर सायकल चालवताना

  • सायकलिंगला निघण्यापूर्वी सायकलचे सर्व भाग व्यवस्थित आहेत की नाहीत याची खातरजमा करून घेणं आवश्यक आहे. एखादा भाग निकामी झाला असेल किंवा होण्याच्या मार्गावर असेल तर तो नवीन बसवून घ्यावा.
  • लांबच्या प्रवासात शक्यतो पायात शूज घालावेत.
  • रात्री सायकलिंग करताना उजळ आणि प्रकाश पडल्यावर चमकतील असे कपडे किंवा जॅकेट वापरावे.
  • रात्री सायकलिंग करताना हेल्मेटला मागच्या बाजूस छोटासा लाइट (इंडिकेटर) जरूर लावावा.
  • सायकलला मागे कॅरिअरला लाल रंगाचा दिवा लावावा.
  • सायकलवरील सामान व्यवस्थितपणे बांधलेले असावे, जेणेकरून वेगात किंवा खराब रस्त्यांवरून जाताना ते पडणार नाही. त्याच्या मागच्या बाजूस रिफ्लेक्टर्स असावेत.
  • सायकलिंग करताना फोटोग्राफी किंवा व्हिडीओग्राफी करणे टाळावे. तसे करायचेच असल्यास तुम्ही गो-प्रोसारखा कॅमेरा किवा सायकलला हँडलवर बसवता येणाऱ्या स्टँडचा वापर करावा.
  • सायकल चालवताना शक्यतो चांगल्या रस्त्यावरून चालवावी. कारण नसताना खड्डय़ांमध्ये किंवा खराब रस्त्यांवरून सायकल नेऊ  नये. त्यामुळे तुम्हाला शारीरिक इजा होऊ  शकते आणि सायकलही खराब होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
  • ग्रुपने सायकलिंग करताना एका सरळ रेषेत सायकलिंग करावे आणि काही विशिष्ट अंतरावर सायकलस्वारांची गणती घेऊन सर्वाच्या सुरक्षेची खातरजमा करून घ्यावी.
  • प्रथमोपचार पेटी नेहमी जवळ बाळगावी.

prashant.nanaware@expressindia.com