18 November 2017

News Flash

लोक पर्यटन : कचारगड गुंफा

कचारगड गुंफा ही आदिवासींमध्ये श्रद्धेचे ठिकाण असल्यामुळे दूरदूरच्या ठिकाणांहून येथे आदिवासी येतात. 

श्याम रघुते | Updated: August 16, 2017 2:00 AM

गोंदिया जिल्हा म्हटले की डोळ्यासमोर नक्षलग्रस्त प्रदेशाचे चित्र उभे राहते. पण जैवविविध्यतेने संपन्न अशा मिश्र जंगलांनी वेढलेल्या या भागात एक नैसर्गिक आश्चर्यही वसलेले आहे. कचारगड गुंफा. आदिवासींची देवता असल्यामुळे नक्षलग्रस्त भागात जरी ही गुंफा असली तरी काही प्रमाणात येथे वर्दळ असते ती माघी पौर्णिमेला होणाऱ्या वार्षिक यात्रेच्या वेळी. गोंदिया-दुर्ग रेल्वे मार्गावर सालेकसावरून दरेकसा मार्गावर सात किलोमीटरवर असलेल्या धनेगाव येथून कचारगडसाठी चढाई सुरू होते. सालेकसातील गर्द वनराईमुळे एकूणच येथील वातावरण फेब्रुवारीदेखील मस्त थंड असते. यात्रेसाठी पंचक्रोशीतून आलेल्या भाविकांनी सारा परिसर फुलून गेलेला असतो. कचारगड गुंफा ही आदिवासींमध्ये श्रद्धेचे ठिकाण असल्यामुळे दूरदूरच्या ठिकाणांहून येथे आदिवासी येतात.

चढण सुरू झाल्यावर सुमारे दोन किमीचा हा टप्पा माथ्याकडे नजर टाकल्यास कठीण वाटायला लागतो. जागोजागी नक्षलवादविरोधी पथकाचे जवान पहारा देत असतात. साहजिकच मनावर एक प्रकारचा ताण येतो. सुमारे अर्धा तास चढण संपल्यावर डोंगरावर जाणाऱ्या दोन मार्गाच्या टोकांवर गुंफा पाहून हायसे वाटते. माथा जवळ येऊ लागतो तसे मार्गातील खडकांचा आकार वाढू लागतो. पावसाळ्यात येथे चढणे नक्कीच कठीण असणार. गुंफेच्या जवळ पोहोचू तसे वटवाघळांच्या विष्ठेचा कुबट वास व हवेतील वाढलेल्या धुलीकणांचे प्रमाण प्रकर्षांने जाणवते. सुमारे १० फूट उंच आणि १२ फूट बाय २० फूट गुंफेच्या छतातून राखसदृश धुलीकणांचा रिमझिम पाऊस पडत होता. या गुंफेतून उजवीकडील डोंगरातील गुंफा स्पष्टपणे दिसते. तेथे झुडपातून जाण्याचा विचार करू नये, तर सरळ पायवाटेने खालील ओढय़ात उतरून दुसऱ्या गुंफेची चढण चढावी. याच ओढय़ाच्या काठावर काही वर्षांपूर्वी येथील मानद वन्यजीव संरक्षक यांनी शेवाळाची एक नवीन प्रजाती सापडल्याचे सांगितले होते. खडकाळ चढण चढताच वर साधारणत: ४० फुटांचे तोंड असलेली विस्तीर्ण गुंफा दिसू लागते. गुहेचा अंदाज बाहेरून येत नाही. मात्र आतमध्ये जाताच गुंफेच्या विस्ताराने डोळे विस्फारले. सुमारे २५ फूट उंच आणि ६० बाय १०० फूट अशी त्याची रचना. डोंगरातून झिरपणाऱ्या प्रवाहांमुळे पडलेल्या छिद्रातून पाण्याच्या धारेसह प्रकाशाचा झोत काही ठिकाणी गुहेत शिरकाव करतो. तेथील आदिवासी झिरपणाऱ्या पाण्याच्या धारेखाली जाऊन ते पाणी तीर्थ म्हणून प्राशन करतात.

First Published on August 16, 2017 2:00 am

Web Title: kachargad gufha in gondia
टॅग Kachargad Gufha