जयपूर, जोधपूर, चितोड अशी नेहमीची पर्यटकप्रिय ठिकाणं भरपूर आहेत. पण मुख्य पर्यटनस्थळांपेक्षा काहीशा आडवाटेवर अनेक ठिकाणं आहेत. जोधपूरपासून ६० किलोमीटरवरचे ओसिया त्यापैकीच एक. येथे शिल्पसौंदर्याने नटलेला पाच मंदिरांचा समूह तर आहेच, पण वाळवंटाच्या किनारी असल्यामुळे वाळवंट सफारीचा आनंददेखील घेता येतो.

Prostitution by pretending of Lotus Spa in Nagpur
नागपुरात ‘लोटस स्पा’च्या आड देहव्यापार…
pune kothrud area fire broke out godown pandal material
कोथरुडमध्ये मंडप साहित्याच्या गोदामाला आग
puppy rescue
माणुसकीला सलाम! दोन भिंतीच्यामध्ये अडकलं कुत्र्याचं पिल्लू; भिंत फोडून काढले बाहेर, पाहा Viral Video
buldhana japan marathi news, japanese language buldhana marathi news
गरिबीच्या अंधारावर मात करत निघाली उगवत्या सूर्याच्या देशात; बकऱ्या वळणाऱ्या रमाई कन्येला जपानमध्ये लाखोंचे ‘पॅकेज’

राजस्थानातील जोधपूरला पाहण्याच्या यादीत क्लॉक टॉवर, मेहरानगढ किल्ला, जसवंतथाडा, मंडोर इत्यादी ठिकाणे असतात. पण स्थानिक रिक्षावाले, हॉटेलवाल्यांशी गप्पा मारतांना ओसिया गावाचे नाव समजते. त्या ठिकाणी सचिया मातेचं मंदिर आहे आणि ओसियापासून जवळच वाळूच्या टेकडय़ा आहेत आणि उंटावरून किंवा जीपमधून तुम्ही त्यावर फिरू शकता. जोधपूरपासून ६० किमीवर अंतरावर ओसिया गाव आहे. बसने गावात पोहोचताच गावाच्या बाहेरच रस्त्यालगत दगडात बांधलेली अप्रतिम मंदिरे दिसू लागतात आणि या गावाच्या नावीन्याची प्रचीती येऊ लागते. बसमधून उतरून थेट मंदिर गाठायचे. नेहमीप्रमाणे पुरातत्त्व खात्याच्या निळ्या फलकाने आपले स्वागत होते. त्या फलकानुसार स्मारक संरक्षित असले तरी त्याला काहीही संरक्षण नव्हते. शेळ्या मेंढय़ांचा मुक्त वावर, तेथेच जवळ गावाची कचराकुंडीही होती.

रस्त्याच्या एका बाजूला तीन आणि दुसऱ्या बाजूला एक मंदिर आहे. रस्त्यालगत असलेल्या मंदिराचा कळस तुटलेला दिसतो. पण त्याचा गजपृष्ठाकृती सभामंडप वैशिष्टय़पूर्ण आहे. दगडात केलेले हे काम पाहण्यासारखे आहे. छतावर आणि खांबांवर कोरीवकाम आहे. गर्भगृहात मूर्ती नाही.

त्याच्या बाजूचे हरिहरचे मंदिर हे शिल्पकामाचा अप्रतिम नमुना आहे. शैव आणि वैष्णव पंथांतील वाद पराकोटीला पोहोचला होता तेंव्हा तो मिटवण्याचा प्रयत्न वेगवेगळ्या पातळ्यांवर केला गेला. त्यातूनच मूर्तिशास्त्रात हरिहर या कल्पनेचा उदय झाला. यात एकाच मूर्तीत उजव्या बाजूला शिव आणि डाव्या बाजूला विष्णू त्यांच्या आयुध, अलंकार आणि वाहनांसह कोरलेले असतात. उजवीकडे शंकराच्या जटा, गळ्यातील रुंडमाळा, हातात डमरू, त्रिशूळ, पायाषी गण आणि नंदी दाखवलेले असतात, तर डाव्या बाजूला विष्णूचा मुकुट, गळ्यात वैजयंती माळा, हातात शंख, चक्र आणि पायाशी गरुड दाखवलेला असतो. या मंदिराच्याही गर्भगृहात मूर्ती नाही. पण मंदिराच्या सभा मंडपातील खांब, छत यावर केलेले कोरीवकाम अप्रतिम आहे. मंदिराच्या बाहेरच्या बाजूला हरिहर, त्रिविक्रम अवतार, नरसिंहावतार, शंकराची केवलमूर्ती, गणपती, महिषासुरमर्दिनीची मूर्ती आणि इतर मूर्ती कोरलेल्या आहेत. मूर्तीच्या वरच्या शिल्पपटावर रामायण, महाभारत आणि पुराणातील कथा आणि काही मथुनशिल्पे कोरलेली आहेत.

तिसरे मंदिर शंकराचे आहे, ते सध्या पूजेत आहे. या मंदिरावर फारसे शिल्पकाम दिसत नाही. त्यावरील शिळा तुलनेने इतरांपेक्षा अधिक झिजलेल्या आहेत. पण हे मंदिर पुरातत्त्व खात्याने संरक्षित केलेले नाही.

ओसिया हे थर वाळवंटाच्या काठावर असलेले गाव प्राचीन काळापासून व्यापारी मार्गावरचे महत्त्वाचे स्थान होते. आठव्या शतकात या ठिकाणी प्रतिहार घराण्याची सत्ता होती. त्यांनी आठ ते  बाराव्या शतकांच्या दरम्यान या ठिकाणी अनेक हिंदू आणि जैन मंदिरे बांधली. ओसवाल जैनांचे हे महत्त्वाचे धार्मिक क्षेत्र आहे. रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला सूर्य मंदिर आहे. त्यावरील कोरीवकामही सुंदर आहे.

ही तीन मंदिरे पाहून छोटय़ा टेकडीवर असलेल्या सचिया माता मंदिराकडे जाताना आजूबाजूला हारांची, प्रसादांची दुकाने-हॉटेल्स दिसतात. सचिया माता म्हणजे इंद्राची पत्नी इंद्राणी. या ठिकाणी मुख्य मंदिरात सचिया माता व त्याच्या बाजूला चंडी देवी आणि अंबा मातेची मंदिरे आहेत. ही मूळ मंदिरे आठव्या शतकात बांधली असली तरी आज असलेली मंदिरे १२ व्या शतकात बांधलेली आहेत. मंदिराच्या सभामंडपात आणि अंतराळाच्या छतावर केलेले कोरीवकाम सुंदर आहे. मंदिराच्या बाहेरच्या बाजूस दशावतारातले काही अवतार कोरलेले आहेत. येथे अनेक रूपांत कोरलेले व्याल ठळक आणि वैशिष्टय़पूर्ण आहेत.आठव्या शतकात बांधलेले महावीर मंदिर हेसुद्धा शिल्पकलेचा अप्रतिम नमुना आहे. या दोन्ही मंदिरांत सध्या पूजा होते.

ओसियातील मंदिरी पाहायला दोन तास लागतात. त्यानंतर जीप भाडय़ाने घेऊन दहा किमीवर असलेल्या वाळूंच्या टेकडय़ांवर जाऊ शकतो. मुख्य रस्ता सोडून जीप वाळूच्या रस्त्याला लागते आणि उंच सखल टेकडय़ांवरून जाताना रोलर कोस्टरचे थ्रिल अनुभवता येते. या ठिकाणी असलेल्या वाळूच्या सर्वात उंच टेकडीवर पोहोचल्यावर उंट सफारीही करता येते. या भागात काही रिसॉर्ट आहेत. डेझर्ट सफारी, तंबूतील निवास, स्थानिक कलाकारांचे कार्यक्रम अशी पॅकेजेस ते देतात, पण ती खूपच महागडी आहेत. अशा मुद्दाम (कृत्रिमरीत्या) तयार केलेल्या रिसॉर्टमध्ये राहण्यापेक्षा येथील गावात टिपिकल राजस्थानी घरात राहण्याची आणि जेवणाची सोय केली जाते. टेकडय़ांपासून पाच किमीवर असलेल्या खेमसर गावातील सिवरों की ढाणी या वस्तीवर अशी सुविधा आहे. जीपचालकांची गावेदेखील येथेच आहेत. पाच-सहा घरांची वस्ती असलेल्या सीवरों की धानी वस्तीजवळ मोर, नीलगाय आणि हरणांचे दर्शन होऊ शकते. मातीच्या कम्पाऊंडच्या आत तीन गोलकार, गवताने शाकारलेली घरं, त्यातील एक स्वयंपाकघर, दुसरी राहण्याची खोली आणि एक पाहुण्यांसाठी जेवणाची खोली होती. मध्यभागी अंगण होते. बाहेर काही उंट झाडाखाली बांधलेले होते. जीप नसल्यास प्रवासाचे हे दुसरे साधन होते. राजस्थानी पद्धतीचे गरमागरम जेवण जेवून परत ओसिया गाठावे.

ओसियाला येऊन जोधपूरला जाणारी गाडी पकडावी. जोधपूरच्या नऊ किलोमीटर अलीकडे असलेल्या मंदोर गार्डनला उतरावे. सहाव्या शतकातला मंदोर दुर्ग, जोधपूरच्या राजांचे समाधी मंदिर आणि म्युझियम पाहून संध्याकाळी जोधपूरला परतता येते.

 अमित सामंत amitssam9@gmail.com