लक्षात राहण्यासारखे काही क्षण कधी कधी अगदी अचानकपणे येतात. असे क्षण मला मिळाले ते गांधारी नदी किनारी भटकताना. कल्याणसारख्या सहा-सात लाख लोकवस्तीच्या शहरापासून जेमतेम पाच-सहा किमीवर असलेल्या गांधारीच्या इनमीन एक चौरस किमीच्या परिसरात तब्बल १५० हून अधिक पक्ष्यांची नोंद झाली आहे. हीच गोष्ट मुळी मनाला सुखावणारी आहे. पक्षी पाहायला कायमच जंगलात जायची गरज नसते हेच गांधारी सांगत असते.

सप्टेंबरच्या एका सकाळी मी आणि माझी पक्षीमैत्रीण संगीता धनुका असेच रपेट मारत होतो. पावसाळा संपल्यानंतर बऱ्यापैकी गवत वाढले होते. एरव्ही मुबलक दिसणारे पक्षी त्या दिवशी मात्र अजिबात दिसत नव्हते. एवढय़ात दूरवरच्या एका लालचुटूक ठिपक्याने आमचे लक्ष वेधून घेतले. तो लाल मुनिया होता. तसा हा काही दुर्मीळ पक्षी नाही. शक्यतो शहराच्या बाहेर वेशीवरती नदीकाठी आढळणारा. पण तसा सहज दिसणारादेखील नाही. कुठेही दिसतोच असे पण नाही. बहुधा समुहाने राहणारा. आणि भयंकर चंचल असा हा लाल मुनिया.

विणीच्या काळातला लाल मुनियाचा नर त्याच्या लाल रंगामुळे लांबूनच चटकन ओळखता आला. त्याची प्रचंड लगबग सुरू होती. ती पण अत्यंत सावध. लांब कुठेतरी जाऊन परत आमच्याकडील बाजूच्या एका झुडुपावर येऊन बसायचा. एक-दोन सेकंद बसून खाली जायचा, एक काडी घ्यायचा, परत झुडुपावर एक-दोन सेकंद बसायचा आणि परत घरटे बांधणीच्या ठिकाणी जात होता. आम्ही थोडे लांबूनच त्याच्या हालचालीच्या वारंवारतेचा अंदाज लावला आणि मग त्याचे छायाचित्र घेण्यासाठी प्रयत्न करायचे ठरवले. मनुष्याच्या हालचालींचा पक्ष्यांवर चटकन परिणाम होतो. त्यामुळे त्यांच्यासमोर कमीत कमी हालचाली करून आम्हाला त्या झुडुपाच्या जवळ मात्र पक्ष्यासाठी सुरक्षित अंतरावर जायचे होते. जेव्हा जेव्हा घरटे बांधणीच्या ठिकाणी दूर जायचा तेव्हा आम्ही थोडे पुढे जायचो. अशा रितीने आम्ही जवळ मात्र सुरक्षित अंतरावर जाऊन थांबलो आणि छायाचित्र टिपू लागलो. तो किती वेळात परत येणार याचा अंदाज लावला होताच, त्यामुळे आम्ही मधल्या वेळेत कॅमेऱ्याचे सेटिंग्ज वगैरे तपासून पाहायचो. सप्टेंबरमुळे भरपूर रान माजले होते. त्यामुळे मुनिया अगदी स्पष्ट दिसेपर्यंत आम्हाला प्रतीक्षा करावी लागणार होती. मुनियाच्या पाच-सहा खेपांनतर योग्य ती संधी मिळाली आणि हे छायाचित्र मिळाले.

पक्षी कॅमेऱ्यात टिपायचा म्हणजे उपकरणे, प्रकाश याबरोबरच आपल्या अंगी प्रचंड सहनशीलता हवी. किंवा जर तुमच्या अंगी सहनशीलता बाणवायची असेल तर पक्षीनिरीक्षणाचा छंद जोपासावा. कदाचित दरवेळी तुम्हाला सुंदर छायाचित्र मिळेलच असे नाही, मात्र मनावर कायम कोरले जाणारे क्षण हमखास मिळतील हे नक्की!

अभिजीत आवळसकर abhijit.avalaskar@gmail.com