सह्य़ाद्रीत हिवाळा आणि पावसाळ्यात मोठय़ा प्रमाणात ट्रेकिंग केले जाते. ट्रेकिंगला जाताना हवामानानुसार पेहरावात बदल करावा लागतो. ट्रॅक पँट व त्यावर पूर्ण बाह्य़ांचा टी-शर्ट असावा. त्याला कॉलर असावी. कॉलरमुळे मानेकडील भाग सूर्यकिरणांमुळे जळत नाही. पूर्ण बाह्य़ांमुळे हाताचा जास्तीत जास्त भाग सूर्यकिरणांपासून सुरक्षित राहतो. जास्तीत जास्त शरीराचा भाग झाकला गेल्यामुळे निवडुंग, काटेरी झुडपे, मधमाशा यांपासून शरीराचे संरक्षण होते. ट्रॅक पँट व टी शर्ट दोन्ही स्ट्रेचेबल आणि सल असावेत. त्यामुळे हवा खेळती राहील. कपडय़ांची रंगसंगती कशी असावी, याबाबत मतमतांतरे आहेत. काहींच्या मते रंगसंगती निसर्गाशी मिळतीजुळती म्हणजे भडक नसावी. राखीव जंगलातून पर्यटन करताना किंवा पक्षीनिरीक्षण करताना निसर्गाशी मिळतीजुळती रंगसंगती उपयोगी ठरू शकते. दुर्गम भागांत ट्रेक करणाऱ्या ट्रेकरच्या कपडय़ांचा रंग उठावदार असावा. दिवसभर उन्हात ट्रेक केल्यामुळे दिवसा घातलेले कपडे मळलेले व घामेजलेले असतात. त्यामुळे दिवसा व रात्री घालण्यासाठी कपडय़ाच्या वेगवेगळ्या जोडय़ा ठेवाव्यात. झोपताना घालण्यासाठीच्या कपडय़ांची जोडी वेगळी ठेवावी.

पेहराव निवडताना हे लक्षात घ्या

वजनाने हलके : वजनाने हलक्या कपडय़ांची निवड करावी. यामुळे सॅकमधील वजनाचा भार कमी होईल.

स्ट्रेचेबल : ट्रॅक पँट व टी-शर्ट्स स्ट्रेचेबल निवडावेत.

तापमान : कोणत्या तापमानात आपण ट्रेक करणार आहोत त्याप्रमाणे कपडे निवडावेत.

कालावधी : ट्रेकिंग किती दिवसांचे आहे, यावर कपडयांची संख्या ठरवता येते. काही ट्रेक रूटवर वेळ मिळाल्यास व पाणी उपलब्ध असल्यास मुक्कामाच्या ठिकाणी कपडे धुऊन पुन्हा वापरता येऊ शकतात. अशा ठिकाणी कपडय़ांच्या जोडय़ा कमी घेतल्यास चालू शकते.

ashok19patil65@gmail.com