हळदाणीचा घाट चढल्यापासून बारा-तेरा दिवस सह्यद्रीच्या पठारावरून दक्षिणेकडे चालत होतो. या भागात सह्यद्री पठार टप्प्याटप्प्याने पश्चिम किनारपट्टीकडे उतरत जातं. त्यामुळे पठाराच्या कडेनेच चालत असलो तरी सह्यद्रीचा पश्चिम कडा नजरेत भरावा असा काही फारसा दिसला नव्हता. पण, इगतपुरीहून कुलंग गडाच्या पायथ्याशी असलेल्या कुरुंगवाडीला पोहोचलो आणि कोकणपट्टीत उभे उतरणारे पठाराचे कडे दिसायला लागले. आता अक्षरश: घाटाच्या कडेवरून चालत होतो. ‘वॉकिंग ऑन द एज.’

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कुरुंगवाडीतून चालायला सुरुवात केल्यानंतर डोळ्याचं पारणं फेडणाऱ्या डोंगरातून मार्ग काढू लागलो. आधी कळसुबाई-अलंग-कुलंगची रांग, मग रतनगडाजवळून कात्राबाईची खिंड आणि २३ एप्रिलला पाचनईमार्गे हरिश्चंद्रगड. मोहिमेचा एक महत्त्वाचा टप्पा सर केला. २४ एप्रिलला सकाळी हरिश्चंद्रगडाच्या कोकणकडय़ावर गेलो होतो. तिथल्या खोबण्यात पाय सोडून बसलो. खालचं दृश्य पाहत असताना मनात आलं की, आज चालण्याचा तिसावा दिवस. महाराष्ट्राच्या उत्तर टोकापासून दक्षिण टोकापर्यंत घाटमाथ्याने चालत जाण्याच्या ६० दिवसांच्या मोहिमेचा हा मध्यबिंदू. पाहता-पाहता एक महिना झालासुद्धा. क्षणार्थात या मोहिमेच्या तयारीचा काळ डोळ्यासमोर तरळून गेला.

Web Title: On the edge of sahyadris
First published on: 26-04-2017 at 04:35 IST