गेल्या काही वर्षांत सर्वच स्तरातील लोकांचा धार्मिक पर्यटनाकडे ओढा वाढला आहे. पण, मंदिरांच्या स्थापत्याकडे फारसं पाहिलं जात नाही. मंदिराच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या दीपमाळा काहीशा दुर्लक्षितच असतात. म्हणूनच दीपमाळांच्या सौंदर्याची ही खास ओळख..
महाराष्ट्रात मंदिराच्या प्रांगणात मोठय़ा दिमाखात उभ्या असलेल्या दीपमाळा, त्या मंदिराच्या सौंदर्यात मोठी भर घालतात. मंदिराचे पावित्र्य, तिथे अनुभवायला मिळणारी शांतता या सगळ्याला तिथे असणाऱ्या दीपमाळासुद्धा नक्कीच कारणीभूत असतात. शिवालये किंवा देवीच्या देवळासमोर हमखास उभी असलेली दीपमाळ म्हणजे महाराष्ट्रातील देवालयांचे एक ठळक वैशिष्टय़च म्हणावे लागेल. महाराष्ट्रातल्या जवळजवळ प्रत्येक गावी मंदिरांसमोर दीपमाळ असतेच. मंदिरात होणाऱ्या उत्सवात उंच ठिकाणी दिवे लावण्याची प्रथा अगदी पूर्वापार चालू आहे. देवळासमोर हातभार उंचीचे दगडी स्तंभ उभारून त्यावर कापूर जाळायची पद्धत बरीच प्राचीन आहे. दक्षिणेत अशा प्रकारच्या स्तंभांना दीपदंड असे म्हणतात. त्याचसोबत समया आणि दीपलक्ष्मीचे विविध प्रकार दक्षिणेत आहेत. काही समयांची उंची दहा-बारा फूट उंच असते तर काहींना झाडासारखा आकार दिलेला असतो. मराठी दीपमाळेचेच हे दाक्षिणात्य रूप म्हणायला हवे.
मंदिराच्या प्रांगणामध्ये असलेल्या दीपमाळादेखील काही विशिष्ट उद्देशाने बांधल्या गेल्या असे म्हणता येईल. दीपमाळा हे मराठा स्थापत्याचे खास वैशिष्टय़ आहे. त्याआधीच्या यादव काळातील मंदिरात या दीपमाळा पाहायला मिळत नाहीत. खासकरून महाराष्ट्रातील मंदिरांमध्ये असलेल्या दीपमाळा या खूपच आगळ्यावेगळ्या आणि वैशिष्टय़पूर्ण आहेत. मंदिराच्या प्रांगणात असलेल्या दीपमाळा साऱ्या परिसराची शोभा वाढवतात. महाराष्ट्रात जवळजवळ सगळीकडेच अत्यंत सुंदर आणि कलात्मक दीपमाळा पाहायला मिळतात. दीपमाळांमध्ये खोबणी करून त्यामध्ये दिवे ठेवण्याची व्यवस्था केलेली असते, तर काही दीपमाळांना पणत्या किंवा दिवे ठेवण्यासाठी काही प्रोजेक्शन्स केलेली आढळतात. त्यांना ‘हात’ असा शब्द आहे. दीपमाळेच्या सर्वात वर नक्षीदार गोल खोलगट भाग असतो; ज्यात तेलात भिजवलेली मोठी त्रिपुरवात जाळली जाते. हा वरचा भाग अनेक ठिकाणी मोठा आकर्षक घडवलेला असतो. दगडी पाकळ्या असलेला गोलसर भाग लांबूनसुद्धा उठून दिसतो. मुख्यत्वे शंकराच्या मंदिरात असलेल्या दीपमाळा या त्रिपुरी पौर्णिमेच्या दिवशी दिव्यांनी उजळलेल्या दिसतात. त्रिपुरी पौर्णिमेला या दीपमाळांवर त्रिपुरवात लावणे यालाच कोकणात टिपर पाजळणे असे म्हटले जाते. पुण्याच्या जवळ असलेल्या चास या गावची दीपमाळ अशीच भव्य, देखणी आणि आगळीवेगळी आहे. इथे या दीपमाळेला २५६ हात असून प्रत्येक हातावर एकेक दिवा लावला जातो. सर्वत्र अंधार आणि मंदिराच्या प्रांगणात तेवत असलेली ही दीपमाळ यामुळे सगळे वातावरण प्रसन्न होते. अशीच भव्य दीपमाळा शिखर शिंगणापूर इथे असलेल्या मंदिराच्या प्रांगणामध्ये पाहायला मिळते.
काहीशी निराळी अशी एक दीपमाळ आहे ती म्हणजे नगर जिल्ह्यतल्या कर्जत तालुक्यातील राशीन या गावातल्या भवानी/जगदंबा मंदिरातली. राशीन हे पेशवाईतले मुत्सद्दी अंताजी माणकेश्वर यांचे गाव. त्यांचे पाच शिलालेख इथल्या मंदिरात पाहायला मिळतात. इथे अत्यंत डौलदार अशा दोन दीपमाळा आहेत. यांचे वैशिष्टय़ म्हणजे या चक्क हलतात. त्यांचे बांधकाम खाली दगडाचे आणि वर विटांचे आहे. वर जाण्यासाठी बाहेरून आणि आतून जिने केलेले आहेत. वर गेल्यावर एक लाकडी दांडा आहे तो धरून हलवला की दीपमाळ हलते. हा चमत्कार आश्चर्यकारक नक्कीच आहे.
बीड जिल्ह्यतील रेणापूर, शिरूरजवळील कर्डे इथेही अशाच डोलणाऱ्या दीपमाळा आहेत. कोकणातल्या दीपमाळा या चिरे वापरून केलेल्या आढळतात. त्यावर वेगळे हात काढले नसून बांधतानाच ठरावीक उंचीवर चौकोनी चिरे काहीसे बाहेर काढून दिवे लावायची सोय केलेली असते. राजापूर तालुक्यातील देवाचे गोठणे या गावी असलेल्या भार्गवराम मंदिरातील दीपमाळ अशीच पाहण्याजोगी आहे. इथे ही दीपमाळ खूपच वेगळ्या पद्धतीने बांधलेली आहे. आधी चौकोनी, मग वरती काहीशी गोल अशा पद्धतीची ही दीपमाळ आहे. देवाचे गोठणे हे गाव कान्होजी आंग्रे यांनी त्यांचे गुरू ब्रrोंद्रस्वामी यांना इनाम म्हणून दिले होते. कोकणात विजयदुर्गजवळील गिर्ये गावात असलेल्या रामेश्वर मंदिरातली दीपमाळ किंवा मीठगव्हाणे या गावचे दैवत असलेल्या अंजनेश्वर मंदिरातील दीपमाळ या अगदी देखण्या दीपमाळा आहेत. गोव्यात नार्वे इथे असलेल्या सप्तकोटीश्वर मंदिरासमोर असलेली दीपमाळ ही काहीशी वेगळ्या धाटणीची दिसते. कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरातली किंवा वाई इथल्या काशीविश्वेश्वर मंदिरातली दीपमाळ अतिशय उंच, देखणी आणि डौलदार आहे.
पेशवे काळात दगडी दीपमाळांच्या बरोबरीने विटांनी बांधलेल्या दीपमाळासुद्धा आढळून येतात. जेजुरीजवळ असलेल्या पांडेश्वर इथल्या मंदिरासमोर असलेली दीपमाळ ही विटांची बांधलेली आहे. यांची रचना अगदी मिनारांसारखी आहे. आतून पोकळ असलेल्या या दीपमाळेमधून वरती जाण्यासाठी जिना आहे. या दीपमाळांवर बाहेरच्या बाजूने चुन्यात अंकित केलेली काही शिल्पे दिसतात. तिथेच जवळ असलेल्या लोणी भापकर या गावी असलेल्या भैरवनाथ मंदिरातील दीपमाळा अशाच उंच आणि अत्यंत देखण्या आहेत. मंदिरांसमोर दीपमाळा उभारणे हे पुण्यकृत्य समजले गेले आहे. काही लोक नवस फेडण्यासाठीसुद्धा देवळात दीपमाळा उभारतात.
उत्सवाच्या प्रसंगी या दीपमाळा अनेक दिव्यांनी उजळून निघतात. शांत, सौम्य अशा उजेडाने सारा मंदिर परिसर प्रसन्न होतो. मंदिराच्या सौंदर्यात भरच घालणाऱ्या या दीपमाळा कायम प्रकाशाचीच वाट दाखवतात.
आशुतोष बापट ashutosh.treks@gmail.com

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Web Title: Temple in maharashtra
First published on: 10-08-2016 at 02:55 IST