21 November 2017

News Flash

बलिदानाचे सार्थक होणार कधी?

आपल्याविरुद्ध लिहिणाऱ्याला, बोलणाऱ्याला जिवे मारले

लोकसत्ता टीम | Updated: September 8, 2017 3:40 AM

आपल्याविरुद्ध लिहिणाऱ्याला, बोलणाऱ्याला जिवे मारले तरी आपल्याला कोणीही पकडू शकत नाही ही खात्री असल्यामुळेच तेच ते मारेकरी पुन:पुन्हा तीच आगळीक करायला धजावू शकतात, हेच पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येने समोर येत आहे. रस्त्यावर चालणाऱ्या महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्रे जितक्या लीलया भर रस्त्यात खेचून समाजकंटक क्षणार्धात पसार होतात, मग त्या दागिन्यांचा तपासही लागत नाही, इतक्या लीलया हे समाजकंटक भराभर हत्या करण्याला चटावले आहेत; इतकी आपली पोलीस यंत्रणा खिळखिळी झाली आहे. असे असल्यावर दाभोलकर काय, कलबुर्गी काय, पानसरे काय आणि गौरी लंकेश काय किंवा कोणीही सामान्य कार्यकर्ता काय.. कोणाचीही हत्या झाली तरी पोलीस आणि सरकारनामक निर्जीव यंत्रणेला काय फरक पडतो?

दाभोलकर यांची हत्या होऊन चार वष्रे झाली, काय झाले? अद्याप तपास प्राथमिक स्तरावरच घुटमळतो आहे. तळेगावचे माहिती-अधिकार कार्यकत्रे सतीश शेट्टी यांच्या हत्येच्या तपासाचे काय झाले? तर काहीही नाही. शेट्टी यांची हत्या १३ जानेवारी २०१० रोजी करण्यात आली, म्हणजे आज सात वष्रे होऊन गेली. त्यांच्या हत्येत तर काही पोलीसच सामील होते, असा ‘सीबीआय’चा प्राथमिक अहवाल आहे. त्यावरून काही पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाईही सुरू झाली होती. अशा हत्या झाल्या की केवळ निषेधातच धन्यता मानून नंतर मूग गिळून हे गप्प बसतात.

समाजकंटकांना त्यांच्या लक्ष्यापर्यंत सहज पोहोचता येईल अशी सदोष व्यवस्था जर निर्माण झाली आहे तर मग हे निषेधाचे सूर आळवणाऱ्यांनी या व्यवस्थेच्या विरुद्ध आवाज उठवायला हवा. तरच काही बदल होण्याची शक्यता आहे. त्यासाठी आणखी काही प्राणांची किंमतही मोजावी लागेल, पण समाज आणि निर्जीव व्यवस्था बदलायची म्हणजे बलिदान करावेच लागणार.

दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी, गौरी लंकेश किंवा सतीश शेट्टी यांनी या निर्जीव व्यवस्थेविरुद्ध अहिसंक लढा दिला. हा लढा असाच निर्भयपणे पुढे नेण्यातच या बलिदानाचे सार्थक आहे. नुसते निषेधात नाही !

– अनिरुद्ध गणेश बर्वे, कल्याण पश्चिम

 

विचारांचे अस्तित्व दोन्ही बाजूंवर ठरते..

पत्रकारितेच्या माध्यमातून जनसामान्यांचा आवाज बनलेल्या गौरी लंकेश यांची मंगळवारी अमानुष व निर्घृण पद्धतीने हत्या करण्यात आली. एखाद्याचे आपल्या विरुद्ध असलेले मत आम्हाला मान्य नाही म्हणून ती व्यक्तीदेखील आम्हाला अमान्य व्हावी? तिचे अस्तित्वच आम्ही संपवून टाकावे ही पराकोटीची असहिष्णुता व मानवतेचीदेखील हत्या आहे. वादविवादाची प्रदीर्घ आणि प्राचीन परंपरा असलेल्या आमच्या भारतीय संस्कृतीत अनेक मतप्रवाह आणि विचारप्रवाह यांची सुरेख गुंफण असलेली दिसून येते मात्र अपरिपक्व आणि वैचारिकतेचे दुíभक्ष्य असलेल्या व्यक्तींकडून या समृद्ध परंपरेचे हनन होते. कोणत्याही परिस्थितीत मानवी हत्या ही निषेधार्हच आहे. मग नियोजनबद्ध दंगलीतील एखाद्या समुदायाविरुद्धची हिंसा असू दे की केरळमधल्या स्वयंसेवकांवरील हल्ले!

कोणत्याही विचारांचे अस्तित्व हे त्याच्या विरोधी विचारप्रणालीच्या अस्तित्वावरच अवलंबून असते. कोणत्याही विचारांचा विरोध दर्शवण्यासाठी विचारांचाच आधार घ्यायला हवा. कोणत्याही विचारांचा प्रतिवाद हा  हिंसेने  होऊ शकत नाही. एखाद्याच्या हत्येने त्या  विचारांमध्ये अवरोध होत नाही तर त्याचा प्रसार होतो हे इतिहासावरून स्पष्ट झाले आहे. महात्मा गांधीजींची हत्या हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. कोणताही विवेकी विचार हा कधीच नष्ट करता येत नाही हे तत्त्व जर समजून घेतले तर विचारांना विरोध करण्यासाठी  कोणाचीही हत्या यापुढे होणार नाही. डॉक्टर नरेंद्र दाभोलकर काय, कलबुर्गी काय, कॉम्रेड गोविंद पानसरे काय किंवा गौरी लंकेश काय हे सर्व मानवी समृद्ध विचार-परंपरांचे  वारसदार आहेत. लौकिक दृष्टिकोनातून ते आज आपल्यात नाहीत परंतु त्यांच्या विचारांचे अस्तित्व मात्र अमर आहे.

– प्रा. संदीप चौधरी, औरंगाबाद

 

मारण्याची पद्धत जवळपास सारखीच

अवघ्या चार वर्षांत चार पुरोगामी वैचारिक नेते मारले जाणे आणि यातल्या एकाच्याही खुनाची कसलीही उकल न होणे हे बरेच काही सांगून जाते. हे चौघेही या देशाला हिंदू राष्ट्र करण्याच्या, धार्मिक कट्टरतेच्या विरोधात होते. त्यांना मारण्याची पद्धत जवळपास एकच होती.

एकंदरीत मागील खुनांचा तपास पाहता सरकारच्या इच्छाशक्तीवर नक्कीच प्रश्नचिन्ह उभे राहते. खरे तर लंकेश या कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या सल्लागार समितीत होत्या. तरीही जर अशा व्यक्तीची हत्या होत असेल तर कर्नाटकातील कायदा-सुव्यवस्था किती केविलवाणी आहे याचीच प्रचीती येते. पण हे आजच होत आहे असे नाही. तर यापूर्वीही अशा घटना घडल्याची नोंद आहे. आणि हे फक्त कर्नाटकात होते आहे असेही नाही. निर्वविादपणे आपला देश एका काळरात्रीतून प्रवास करतो आहे. वकिलांच्या, विचारवंतांच्या एकामागून एक विशिष्ट पद्धतीने घडणाऱ्या हत्या, त्यांचे कधीही पूर्ण न होणारे तपास हे एका मोठय़ा कटाकडे अंगुलिनिर्देश करतात. आणि मारणाऱ्यांना निदान हे तरी कळायला पाहिजे की, माणसांना मारता येते पण विचारांना नाही.

– सहदेव निवळकर, सेलू (परभणी)

 

पंतप्रधानांनी ट्विटरवर

‘फॉलो’ करणे ही

खेदाची बाब कशी?

‘पंतप्रधान फॉलो करीत असलेल्या ट्विटर खात्यांवरून द्वेषाचे गरळ’ या बातमीत (लोकसत्ता, ७ सप्टेंबर) काही ट्विटर खात्यांवरून दिल्या गेलेल्या प्रतिक्रियांवर भाष्य करतानाच ‘खेदाची बाब म्हणजे त्यातील काहींना पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ट्विटर वरून फॉलो करीत आहेत,’ असे म्हटले आहे. यात ‘खेदाची बाब’ काय हे मला कळले नाही.

‘फॉलो’ याचा डिक्शनरीतील एक अर्थ ‘treat as a teacher or guide’ (एखाद्याचा अनुयायी बनणे) असाही असला तरी ट्विटरने त्यांच्या संदर्भात दिलेला अधिकृत अर्थ ‘Following someone means you’ve chosen to subscribe to their Twitter  updates’  असा आहे. येथे ‘विचार अनुसरणे’ असा अर्थ मुळीच अभिप्रेत नाही.

ट्विटर हे अतिशय महत्त्वाचे समाजमाध्यम असून जगातील जवळपास सर्वच क्षेत्रांतील महत्त्वाचे तसेच सामान्य लोक विचार व्यक्त करण्यासाठी या माध्यमाचा वापर करतात. विचार व्यक्त करतानाच इतरांचे (यात विरोधी विचारांच्या व्यक्तींचेही आले) म्हणणे कळण्यासाठी त्यांचे अकाऊंट ‘फॉलो’ करणे हे अगदी स्वाभाविकच असून सर्वच नेते त्यांच्या कट्टर राजकीय विरोधकांचेसुद्धा ‘फॉलोअर’ असल्याचे दिसून येईल.

या पत्राचा रोख केवळ बातमी देण्याच्या पद्धतीबद्दल असून संबंधित घटना वा त्याबद्दलची मते यांच्यासंदर्भात नाही.

– दीपक गोखले, पुणे

 

आता पुरोगाम्यांचाच राग येतो..

खरं तर मला आज काल स्वत:ला वैचारिक, पुरोगामी म्हणवणाऱ्या लोकांचाच राग येत आहे. आता माझा समज होत आहे  की दाभोळकर, पानसरे, कलबुर्गी आणि आता गौरी लंकेश यांच्या हत्यांचे जबाबदार हीच मंडळी आहेत. ही मंडळी फक्त माणूस मेल्यावरच एकत्र ऐतात, बाहेर तर सोडाच एरवी अगदी समाजमाध्यमांवर देखील एकमेकांचे विचार शेअर, कमेंट तर नाहीच साधं ‘लाइक’ करायलाही स्वत:च्या ‘स्टेटस’चा विचार करतात.. ती हीच  मंडळी जी स्वत:ला पुरोगामी समजतात. हा संघर्ष इथपासून सुरू होतो.

मात्र पुढे कोणाची हत्या झाली की मगच एकत्र येतात आणि म्हणतात, ‘‘मी ह्य—ह्य संघटनेच्या/ पक्षाच्या वतीने निषेध व्यक्त करतो’’आणि निषेध संपला, आणि पुढे असंही म्हणतात, ‘माणुस मारता येते विचार नाही’! मग माझा सवाल आहे आणखी किती माणसं मरू देणार आहात? आणि असे एक—एक करत सगळेच संपवले तर तुमचा कोणता विचार राहील?माणूस म्हणून माणसासाठी कोणीही एकत्र येणार नाही का?

हे उघड—उघड आहे  : कोणीही सांगू शकेल कोण मारत आहे, कोणताही गरीब, कामगार,किंवा विद्यार्थ्यांचा हात यात नसणार, हे कोणीही सांगेल, राहिले  बोटाएवढे लोक आणि तेच एका—एकाला संपवत आहेत, हे नक्की आहे.  जर हे असंच चालत राहिलं तर उद्या माझा नाहीतर तुमचा नंबर असू असेल. आज तर्काची, सत्याची, विज्ञानाची सत्ता असती तर हे बघायला मिळाले नसते. ती खरी गरज आहे. प्रामाणिकपणे स्वार्थ, घमेंड त्यागून भविष्यासाठी एकत्र येण्याची  वेळ गेलेली नाही. नाहीतर, प्रामाणिकपणाची उमेद निघून गेल्यावर  सत्ता आली तरीही काही अर्थ राहणार नाही. हे करायचे असेल, जर समाजात आपल्या येणाऱ्या  पिढीसाठी एक चांगलं जग देण्याचा विचार असेल तर ठीकच.  तरीही कंटाळा भीती वाटत असेल तर आपली बुद्धी पैसेवाल्याच्या दावणीला बांधा.

मी निषेध सरकारचा करणार  नाही,  का ते सांगायची गरज नाही. मी निषेध करतो त्या सगळ्या लोकांचा जे स्वत:ला वैचारिक आणि पुरोगामी समजतात पण  बूड सोडायला तयार नाहीत. आणि त्याही लोकांचं निषेध करतो जे हे सगळं बघतात, ऐकतात आणि तरीसुद्धा काहीच माहिती नाही अशा थाटात वावरतात.

– सी. हनुमान.

 

प्रबोधनाविरुद्ध दांडगाई

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांना संपवणाऱ्यांची मुख्य पोटदुखी कोणती होती, तर ती ‘जादूटोणाविरोधी विधेयक.’ ते जर का मंजूर झाले असते तर यांच्या दुकानदारीला मोठमोठी कुलपे लागणार होती. असल्या नीच कारणास्तव या भ्याड लोकांनी एका विवेकवादी अनमोल माणसाचा मुडदा पाडला, पण विचार अमर असतात, हे महाराष्ट्र सरकारने ते जादूटोणाविरोधी बिल मंजूर करून दाखवून दिले. कॉम्रेड पानसरे यांचेदेखील तेच. त्यांची चूक एवढीच की; त्यांनी छत्रपती शिवरायांचा खरा इतिहास समोर आणणाऱ्या  ‘शिवाजी कोण होता?’मधून केली; जी आपल्याकडच्या कडवट ‘हिंदुस्थानी तालिबान्यां’ना खटकली. कर्नाटकातील कलबुर्गी यांचा पिंडदेखील प्रबोधनाचाच. त्यांचाही मुडदा या अविचारी दांडगट मंडळीने पाडला.

गौरी लंकेश यांना मारताना आपण एका स्त्रीला मारतो आहोत एवढे समजण्याइतपत पुरुषत्व त्या भ्याड नामर्द मंडळीत नव्हते. लंकेश यांची चूक काय, तर त्या ‘लंकेश पत्रिके’तून पुरोगामी विचारांची पेरणी करत होत्या. त्यांनी नक्षलवादी मंडळीला मुख्य प्रवाहात आणण्याचा आग्रह धरला. कडवट हिंदुत्वाचा आग्रह त्यांना मान्य नव्हता. म्हणून काय एका स्त्रीवर गोळ्या झाडून तिला संपवायचे? या देशाला निर्भीड लेखणीची थोर परंपरा लाभली आहे. पण बंदूक चालवणाऱ्या भ्याड मंडळीला हे कधीच उमगू शकणार नाही.. कारण या भ्याड लोकांचा वैचारिक उथळपणा हा कमालीचा असतो. जर  खरोखरच विनोबाजींचे हिंदुत्व त्यांना कळले असते; तर त्यांनी ही भ्याड गुन्हा केलाच नसता.

केवळ मेणबत्ती जाळून किंवा शोकसभा भरवून लंकेश यांचे मारेकरी सापडणार नाहीत. चौकशी झाल्याखेरीज त्यांना न्याय मिळणार नाही. अन्यथा प्रबोधनाचा आणखी एखादा मुडदा पडल्यास बेगडी शोक व्यक्त करण्याशिवाय हाती काही राहणार नाही.

– किरण राजेभाऊराव डोंबे, परभणी

 

संघ स्वयंसेवकांच्या हत्यांचा असाच निषेध का होत नाही?

पत्रकार गौरी लंकेश यांची हत्या ही तीव्र निषेधार्ह आहे यात शंकाच नाही. पण ती हत्या अमुकअमुक लोकांनीच केली हे गृहीत धरून निषेध होताना दिसत आहे. शिवाय ज्या तत्परतेने मोर्चा वगरे निघाले हे पाहता कौतुकच केले पाहिजे. पण १५ दिवसांपूर्वी जेव्हा  मुस्लीम लेखिका तस्लिमा यांना औरंगाबाद शहरात प्रवेश करू दिला गेला नाही, तेव्हा तीदेखील त्यांची मुस्कटदाबीच होती हे निषेधकत्रे सोयीस्कर विसरलेले दिसतात. कदाचित, प्रवेश करण्यास विरोध करणारे लोक हे मुस्लीम संघटनेचे असल्याने निषेधकत्रे गप्प  बसले असावेत. तसेच नुकतीच केरळमध्ये रा. स्व. संघाच्या काही जणांची हत्या केली तेव्हा कोणी निषेध केल्याचे आढळलेले नाही. काही महिन्यांपूर्वी बेंगळूरु शहरात दोन संघ स्वयंसेवकांची हत्या केली गेली. त्याचाही कोणी निषेध केल्याचे ऐकिवात नाही. तेव्हा  कोणतीही आणि कोणाचीही हत्या या निश्चित निषेधार्ह आहेतच. पण कुणाची हत्या आणि कोण करतो यावर निषेध अवलंबून आहे असे दुर्दैवी दृश्य दिसते.

– दिलीप लिमये, पुणे

 

गांधीहत्येवरून हिंदुत्त्ववाद्यांना झोडपण्याचे केव्हा थांबणार ?

‘अपप्रचाराचे औषध’ हा ‘अन्वयार्थ’ आणि  ‘देशकाल’ सदरातील योगेंद्र यादव यांचा ‘गौरी लंकेश यांची हत्या कुणी केली?’ हा लेख, (दोन्ही ७ सप्टेंबर) वाचले. दोन्हींचा सूर – ती हत्या सनातनी हिंदुत्त्ववाद्यांनी केली – हे जणू काही पुराव्यानिशी सिद्धच झाले असल्यासारखा वाटतो. या संबंधात काही मुद्दे :

 

(१) पहिले म्हणजे, हत्येपूर्वी अगदी काही तासच  अगोदर, स्वत गौरी लंकेश यांनी जे ट्वीट केले, त्याकडे या दोन्ही लेखांचे दुर्लक्ष झालेले दिसते. हे जे ट्वीट आहे, त्याचा रोख निश्चितपणे नक्षलवादी किंवा इतर डावे उग्रवादी गट यांच्याकडेच असल्याचे सूचित होत असल्याने, या हत्येत नक्षलवादी हात असण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे पोलीसानीही आता म्हटले आहे. असे असूनही, अन्वयार्थ मध्ये मात्र ‘‘डाव्यांनीच खून केला’ – असा विखारी, उन्मादी अपप्रचार’ भाजप, व हिंदुत्त्ववादी यांच्याकडून सुरू झाल्याचे म्हटले आहे.

(२) योगेंद्र यादव यांच्या लेखात त्यांनी थेट गांधी हत्येपर्यंत जाऊन, ‘हिंदू जातीयवाद्यांनी च गांधीजींची हत्या केल्याची’ जुनीपुराणी घिसीपिटी रेकॉर्ड पुन्हा वाजवली आहे. गांधी हत्येच्या खटल्यात हे निर्वविादपणे सिद्ध झालेले आहे, की त्या हत्येमागे कोणतीही हिंदुत्त्ववादी संघटना वगरे नव्हती, ते केवळ एका व्यक्तीचे आततायी दुष्कृत्य  होते. तरीही उठसूट गांधीहत्येवरून हिंदुत्त्ववाद्यांना झोडपण्याचे केव्हा थांबणार?

(३) योगेंद्र यादव यांच्या लेखाचा शेवटचा परिच्छेद तर चक्क भरकटल्यासारखा झाला आहे.

अशा तऱ्हेच्या हत्या जितक्या निंदनीय, तितकाच अशा तरहेची कोणतीही हत्या झाली, की लगेचच (पोलीस तपास सुरूही व्हायच्या आधीच) हिंदुत्त्ववाद्यांना त्यासाठी जबाबदार ठरवून मोकळे होण्याचा प्रकारही निंदनीय आहे, हे लक्षात घ्यायला हवे. केरळात रा.स्व.संघाच्या कार्यकर्त्यांच्या अगणित हत्या झाल्या. ते साधे कार्यकत्रे होते, कोणी बुद्धीजीवी पत्रकार, कलाकार वगरे नव्हते, म्हणून त्या हत्या दुर्लक्षणीय मानायच्या ?

गौरी लंकेश ही व्यक्ती नव्हती, तो ‘विचार’ होता. अगदी बरोबर. पण जेव्हा रा.स्व.संघासारख्या संघटनेचा सामान्य कार्यकर्ता मारला जातो, तेव्हा तो काय एखाद्या व्यक्तिगत वैमनस्याचा किंवा गुंडांच्या टोळी युद्धाचा परिणाम असतो? निश्चितच नाही. ती हत्या सुद्धा वैचारिक विरोधातूनच झालेली असते. मरणाऱ्या स्वयंसेवकाच्या मागे ही “विचार”च असतो. फक्त तेव्हा हे सगळे मेणबत्ती पंथीय जणू काही झालेच नाही, अशा थाटात गप्प बसून असतात.

अभिव्यक्तीस्वातंत्र्य, विचारस्वातंत्र्य, या सगळ्या उच्च संकल्पना निस्संशय चांगल्याच आहेत. पण त्या सर्वामध्ये ‘निष्पक्षता’ ही महत्त्वाची आहे. तुमचे ते विचारस्वातंत्र्य, नि आमचा तो मागासलेपणा – हे सोयीस्कर तत्त्वज्ञान बरोबर नाही.

– श्रीकांत पटवर्धन, कांदिवली पूर्व (मुंबई)

 

एकविसाव्या शतकातील धर्मवेड

देशभर संताप, निषेध (पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येचे तीव्र पडसाद) ही बातमी वाचली. अनेक पाश्चात्त्य विचारवंतांच्या मते, ज्याला ‘हिंदू तत्त्वज्ञान’ म्हणतात. ते म्हणजे हिंदूंच्या धार्मिक श्रद्धांचा व विश्वासाचा केवळ समुच्चय आहे, तत्त्वज्ञानाला मात्र तीक्ष्ण धारदार व तर्कशुद्ध विचार करण्याची क्षमता लागते व ती हिंदूंच्या ठिकाणी नाही म्हणून ते केवळ भावनिक, खोटय़ा श्रद्धेचे लोक आहेत, असे या पाश्चात्त्य टीकाकारांना म्हणायचे आहे (संदर्भ – प्रा. डॉ.गजनन नारायण जोशी लिखित भारतीय तत्त्वज्ञानाचा बृहद इतिहास, खंड एक- ‘वेद उपनिषदे व भौतिक वाद, पान क्र. ७ ).  वरील टीकेचे खंडन विद्वान करतीलच, परंतु या हत्येने संबंधितांनी त्यांच्या धर्मवेडय़ा श्रद्धेचे प्रदर्शन घडवून आणले आहे. तूर्तास तरी तसेच मानावे लागेल.

महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राजा राममोहन रॉय, प्रबोधनकार ठाकरे अशा व्यक्तींनी जेव्हा वेळोवेळी धार्मिक रूढी-परंपरांना आपल्या लिखाणातून सडेतोड टीका केली (ज्या काळी व्यक्तिस्वातंत्र, लोकशाही यांचा नामोल्लेखही नव्हता.) अशा परिस्थितीत कधी त्यांच्यावरती असा प्रसंग ओढवला नाही. आणि मग एकविसाव्या शतकात आपल्या मानसिकतेला काय होत आहे याचेदेखील तर्कशुद्ध, वैज्ञानिक विचारांनी आत्मपरीक्षण करायला हवे .!!

– अविनाश विलासराव येडे

 

युरोपात हेच घडले,  पण मध्य युगात..

‘लंकेश पत्रिके’च्या संपादक आणि सांप्रदायिक, जातीयवादी शक्तींविरोधात मोहीम चालविणाऱ्या पत्रकार गौरी लंकेश यांची हत्या झाली. ही घटना समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्याय आणि धर्मनिरपेक्षता या मूल्यांवर आधारित नवीन समाजव्यवस्था निर्माण करण्याचा हेतू बाळगून वाटचाल करीत असलेल्या समाजावरचा खूप मोठा आघात आहे. युरोपात प्रबोधन काळापूर्वी- म्हणजे ‘मध्य युगा’त पुरोगामींच्या हत्या व्हायच्या; मात्र भारतासारख्या देशात आजही ते घडत आहे. जेव्हा विचारांनी विचारांना जिंकता येत नाही तेव्हा या देशात अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा गळा दाबला जातो किंवा तुरुंगात तरी डांबले जाते किंवा हत्या तरी केली जाते, हे आज पुन्हा सिद्ध झाले आहे.

– अक्षय ज्ञा. कोटजवळे, शंकरपूर, (ता. कळंब, जि. यवतमाळ)

 

First Published on September 8, 2017 3:40 am

Web Title: loksatta readers letter part 81