इंग्लंडविरुद्ध चालू असलेल्या कसोटी मालिकेतील सलग दुसऱ्या सामन्यात भारताचा पराभव झाला. वास्तविक क्रिकेटमधील थोडे-फार ज्यांना कळते असे कोणीही इंग्लंडमध्ये भारतीय संघ मालिका जिंकेल असे मानत असतील ही शक्यता नाही. भन्नाट गोलंदाज जेम्स अ‍ॅण्डरसन व चेंडूला कलाटणी  (मूव्हमेंट) देण्यात तरबेज असलेला स्टुअर्ट ब्रॉड हे विशेषत: इंग्लंडमधील वातावरणात व तेथील खेळपट्टय़ांवर भारतीय फलंदाजांपुढे समस्या निर्माण करणार हे उघड होते आणि शेवटी झालेही तसेच. परंतु लॉर्ड्स कसोटीच्या दुसऱ्या डावात भारताचे चार फलंदाज शून्यावर बाद झाले आणि भारतावर एक डाव व १५९ धावांनी पराभूत होण्याची नामुष्की ओढावली. थोडक्यात पराभव अपेक्षित असला तरी इतका मानहानिकारक पराभव मात्र अपेक्षित नव्हता.

परंतु दुसऱ्या डावात चार फलंदाज शून्यावर बाद झाल्याने  १९५२ मधील लीड्स कसोटी सामन्यातील भारताच्या दुसऱ्या डावाची आठवण मात्र झाली. त्या वेळी डावाच्या सुरुवातीला भारताची अवस्था ४ बाद ० अशी होती. बाद होणारे फलंदाज होते पंकज रॉय, दत्ताजीराव गायकवाड, माधव मंत्री व विजय मांजरेकर. त्यानंतर महान फलंदाज विजय हजारे व अष्टपैलू दत्तू फडकर यांनी अनुक्रमे ५६ व ६४ धावा करून भारताचा डाव थोडा सावरला. त्या डावात पाच फलंदाज शून्यावर बाद झाले होते. त्यामुळे ६६ वर्षांनी इंग्लंडमध्ये इतिहासाची पुनरावृत्ती झाली आहे, असे वाटते.

Israel, Iran , missile attack
विश्लेषण : इराण-इस्रायल यांच्यात युद्ध भडकणार? परिस्थिती चिघळण्यास अमेरिकेची चूक कशी कारण ठरली?
Loksatta explained What are the reasons for the fall of the rupee against the dollar and what are its consequences
गेल्या १० वर्षांत २८.३ टक्के घसरण… डॉलरपुढे रुपयाची घसरण आणखी कुठपर्यंत? कारणे काय? परिणाम काय?
gaza hunger
Israel-Gaza War: गाझातील लक्षावधी लोकांवर उपासमारीची वेळ; या परिस्थितीला कारणीभूत कोण?
Surya Grahan 2024
४ दिवसांनी हिऱ्यापेक्षाही जास्त चमकणार ‘या’ राशींचे नशीब? ५०० वर्षांनी सूर्यग्रहणाला चार ग्रहांची महायुती होताच मिळू शकतो पैसा

– संजय चिटणीस, मुंबई

गणेशोत्सव साधेपणाने साजरा करावा

गणेश मंडळाच्या खर्चाचा आढावा घेतला तर प्रत्येक मंडळाचा कमीत कमी खर्च सरासरी अंदाजे कमीत कमी दोन लाख रुपये इतका आहे. आपल्या या शहरात आणि तालुक्यात नाही म्हटले तरी सरासरी अंदाजे ६५० मंडळे आहेत. म्हणजे दोन लाख गुणिले ६५०=१३ कोटी इतका गणेशोत्सवाचा खर्च. हा फक्त एका शहरापुरता मर्यादित पकडू म्हणजे. आपल्या संपूर्ण महाराष्ट्रात जवळजवळ ३०० तालुके आहेत. त्याचा खर्च ३९०० करोड रुपये. ते फक्त गणपतीसाठी उधळले जातात.

आज कित्येक जण बेघर आहेत, सुशिक्षित पदवीधर आहेत पण नोकऱ्या नाहीत, गरीब आहेत पण एक वेळचे जेवण त्यांच्या नशिबी नाही. कुणाला शिक्षण हवे असते पण पैशाअभावी ते शक्य नसते. शेतकरी मालाला दर नसल्याकारणाने कर्जबाजारी होऊन आत्महत्या करताहेत. हे कुठे तरी थांबले पाहिजे. या गणेशोत्सवासाठी होणाऱ्या अवाढव्य खर्चातील २५ टक्के खर्च म्हणजे ९७५ कोटी रुपये हा पशुधन विकास, शेतकरी विकास, गोरगरिबांना तसेच त्यांच्या शिक्षणासाठी लावला तर या आपल्या महाराष्ट्रात कुणीच बेरोजगार राहणार नाहीत. कुणीच शिक्षणापासून वंचित राहणार नाहीत आणि आपला शेतकरी राजा कधीच आत्महत्या करणार नाही. यातूनच खरे धार्मिक कार्य केल्यासारखे होईल आणि गणेशोत्सव या सणाला साधेपणाचे स्वरूप प्राप्त होईल. तेव्हा वेळ अजून गेलेली नाही. होणाऱ्या अवाढव्य आणि अवाजवी खर्चाला योग्य तो आळा घालून गणेशोत्सव हा साधेपणाने आणि धार्मिक पद्धतीने साजरा करून त्यावर होणाऱ्या खर्चातील काही भाग शिक्षण, गरिबी, बेरोजगारी आणि शेतकरी यांवर झाला तर महाराष्ट्रात एकही शेतकरी आत्महत्या करणार नाही.

– महेश्वर भिकाजी तेटांबे, परळ (मुंबई)

अस्तित्वाचा सवाल

विचारधारेसाठी एकत्र येत असल्याचा विरोधकांचा दावा फोल असून, अस्तित्व टिकवण्याच्या अपरिहार्यतेतून ते एकत्र येत आहेत, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. बाकीचा तपशील वगळला तरी पंतप्रधानांचे हे विधान पटणारे आहे. मात्र सद्य:परिस्थितीत विरोधी पक्षांचे अस्तित्व टिकवण्यापेक्षा देशाचे अस्तित्व आणि व्यक्तिमत्त्व टिकवण्यासाठी अविचारी विचारधारेस आवर घालणे हा महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यामुळे हा प्राधान्यक्रम लक्षात घेता आणि जनमताचा कल पाहता सर्व विरोधकांची मोट बांधण्याशिवाय अन्य मार्ग उपलब्ध नाही. नरेंद्र मोदींना पर्याय नकोच आहे. त्यांची बदली (रिप्लेसमेंट) आवश्यक आहे. निवडणुकीपूर्वीच पर्याय शोधून त्या पर्यायाच्या खऱ्याखोटय़ा प्रतिमेचे मार्केटिंग करून सत्ता मिळवण्याचा मार्ग भाजपने या वेळी सुरू केला आणि यशस्वी केला. यापूर्वी पंतप्रधानपदासाठी आणि निवडणुकीपूर्वीच्या जाहिरातींसाठी मॉडेलिंग करणाऱ्या पात्राची गरज पडत नव्हती. त्यामुळे पर्याय शोधणे हा मुद्दाच गौण आहे. योग्य पर्याय निवडणुकीच्या निकालानंतर निवडता येईल.

– प्रमोद तावडे, डोंबिवली

दोन लेख : एक (वैयक्तिक?) अनुभव

व्ही. एस. नायपॉल यांच्यावरचा अग्रलेख (१३ ऑगस्ट) वाचून, स्वातंत्र्यानंतर आपल्याकडे जे घडले त्याचा अन्वय लावायला नायपॉल यांचे लेखन वाचावे अशी जाणीव झाली. ‘व्यवस्थेच्या विरोधाची हाळी घालून लक्ष वेधले की लेखक स्वत:च व्यवस्था होऊ लागतात’ हे  या अग्रलेखातील वाक्य आणि त्याच अंकातील ‘उबुंटू- माणुसकीची व्यापक संकल्पना’ हा ओपन सोर्सवरील अमृतांशू नेरुरकरांचा लेख यांत जवळचा दुवा दिसू शकतो हे जाणवून एक प्रकारे आश्चर्यमिश्रित आनंद झाला.

तत्त्वज्ञान आणि त्यातील मूल्यांचे उपयोजन यातले द्वैत प्रत्यक्षात संपू शकेल असे वाटणारा हा लेख आहे.  ‘वैचारिक स्वातंत्र्य, वैयक्तिक योगदानातून केलेले सहयोगात्मक कार्य, समुदायांमधली देवाणघेवाण व त्यातून आलेली सार्वजनिक बांधिलकी अशी मूल्ये जी ओपन सोर्स व्यवस्थेच्या केंद्रस्थानी असतात, त्याच मूल्यांची शिकवण ‘उबुंटू’ संकल्पना देत होती’ हे लेखकाचे म्हणणे आणि नायपॉल यांना लेखनातून ज्या गोष्टी समाजात घडाव्यात असे वाटत असावे यात जवळचा संबंध वाटला. प्रचंड मोठय़ा, प्रस्थापित व्यवस्था झालेल्या सॉफ्टवेअर कंपन्यांना अधिक खुल्या, न्याय्य मूल्यांच्या आधारे मार्क शटलवर्थने यशस्वी आव्हान दिले. त्याने ‘उबुंटू’ हे निवडलेले ब्रँडनेम, वसाहतवादाखाली पिचलेल्या समुदायाच्या नेत्याने पुरस्कार केलेल्या शब्दातूनच आले आहे हे आणखी विशेष म्हणून जाणवले. आणि तो नेता, नेल्सन मंडेला, हेदेखील नोबेल पुरस्कारप्राप्त होते. हा काव्यगत न्याय आहे की नाही हे सांगता येत नाही, पण त्यामुळे ‘उबुंटू’वरचा लेख ही नायपॉल यांना श्रद्धांजली वाटते.

– उमेश जोशी, पुणे

इथे काहीही पेरा..

‘नकाराचा भाष्यकार’ हा अग्रलेख (१३ ऑगस्ट) आवडला. व्ही. एस. नायपॉल हे अतिशय स्पष्टवक्ते होते. सुमारे तीस वर्षांपूर्वी, ‘इंडियन सॉइल इज बेसिकली करप्ट’ (भारतीय भूमी मुळातच भ्रष्ट आहे) असे नायपॉल एका लेखात म्हणाल्याचे वाचले होते. (म्हणजे इथे काहीही पेरा, त्याला भ्रष्टाचार हेच फळ येते, असे त्यांना म्हणायचे होते.), हेही यानिमित्ताने आठवले.

– यशवंत भागवत, पुणे

नायपॉल यांचा मोठेपणा स्पष्ट करणारा अग्रलेख

‘इस्लाम समजून घेताना जो खोटा निधर्मीवाद अंगीकारला गेला त्याची प्रतिक्षिप्त क्रिया म्हणजे बाबरी मशीद पाडली जाणे..’ – व्ही. एस. नायपॉल यांचे हे जळजळीत वाक्य नोंदवणारा ‘नकाराचा भाष्यकार’ हा अग्रलेख (१३ ऑगस्ट) त्यांचा यथार्थ मोठेपणा अधोरेखित करणारा आहे.

– प्रभाकर भाटलेकर, ठाणे</strong>

आयआयटीने निधी घेण्यासंबंधी विचार करावा

‘मोदींना हे कधी कळणार?’ या पत्रातील (लोकमानस, १३ ऑगस्ट) म्हणणे अगदी खरे आहे. मोदींना येणाऱ्या निवडणुकीच्या भुताने पछाडले आहे. संसदेत त्यांच्या भाषणातले शब्द काढून टाकले जाण्याइतपत त्यांच्या भाषणाचा दर्जा घसरला आहे. आयआयटीच्या दीक्षान्त समारंभातील भाषणही प्रचार सभेतील भाषण वाटावे इतकेच लांब व दर्जाहीन वाटले. संस्थेला १००० कोटी देणार हे त्या व्यासपीठावरून सांगणे खरेच ‘चीप’ (अशोभनीय) वाटले. खरे तर आयआयटीला त्याची मुळीच गरज नाही, कारण माजी विद्यार्थी संस्थेला दर वर्षी प्रचंड प्रमाणात निधी पाठवतात त्यातूनच नवीन होस्टेल्स व डिपार्टमेंट्स बांधली जातात. कदाचित याच निधीवर सरकारचा डोळा असणार. प्रा. मुरली मनोहर जोशींनी तसा प्रयत्न केला होता. पण माजी विद्यार्थी संघाचे निधी पाठविण्याचे बंद करणार म्हटल्यावर ते गप्प बसले. तेव्हा जर १००० कोटी चुकवून मिळालेच तर (कारण मोदी सरकार हे केवळ घोषणा करण्यात तरबेज, प्रत्यक्षात ठण ठण गोपाळ असे आहे) ते घ्यायचे का नाही त्याचा संस्थेने विचार करावा. नाही तर आवळा देऊन कोहळा काढला असे होईल.

– द. ना. फडके (माजी आयआयटीयन), डोंबिवली

शब्दांची भुरळ, पण वैचारिक गोंधळ

‘जितनी गहरी जडें..’ हा लेख (रविवार विशेष, १२ ऑगस्ट) वाचून प्रश्न असा पडला की,  ‘वसुधैव कुटुम्बकम’ आणि ‘सर्वेपि सुखिन: संतु’ हेच जर आपल्या बाबतीत खरे असेल तर मग हिंदू या संकुचित शब्दाचा एवढा आग्रह कशाला? हे विश्वच माझे घर असेल तर कोणीच परके नाही; मग हे ‘अभारतीय’ वगैरे शब्द अर्थहीन ठरतात.. मग ‘मुसलमानी’ राज्य असले किंवा  ‘ब्रिटिश’ राज्य असले तर काय फरक पडत होता?  तसेच साम्यवाद ‘अभारतीय’ म्हणून का त्याज्य ठरवायचा? जे जे भारतीय ते ते ग्राह्य़ आणि जे भारतीय नाही ते त्याज्य किंवा गर्हणीय असे का?  गोरक्षकांचा धुमाकूळ हा अभारतीय शिक्षण पद्धतीचा परिपाक आहे नक्कीच कोणी म्हणू शकत नाही. उलट या लेखातून संदिग्धपणे असे सुचवले जात आहे की प्राचीन हिंदू विचारप्रणाली, जीवनशैली परिपूर्ण असून तीच जागतिक व्हावी, हजारो वर्षे जुनी जीवनशैली व विचारधारा तपासून आधुनिक जगाला किंवा जगण्याला सुसंगत सयुक्तिक आहे की नाही हे ठरविणे योग्य नाही. हिंदू मानसिकतेवरील शब्दांची भुरळ आणि वैचारिक गोंधळ आणि तोही प्रचंड हे मात्र लेखातून स्पष्ट जाणवते.

– रघुनाथ बोराडकर, पुणे